नवीन लेखन...

चष्मा का लागतो?

अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन टीव्ही बघतात. कारण त्यांना लांबून टीव्ही दिसत नाही. म्हणजे जवळून टीव्ही बघितल्यामुळे चष्मा लागतो, असे म्हणता येत नाही. तर चष्म्याचा नंबर असल्यामुळे टीव्ही जवळून बघितला जातो. एकदा त्यांना चष्मा लावायला दिला, की ते व्यवस्थित अंतरावरून टीव्ही बघतात. सिद्ध झालेले नसले तरी बहुतेक नेत्रतज्ज्ञांच्या मते- आधुनिक बैठी जीवनशैली आणि चष्मा यांचे नाते असू शकेल. सिंगापूर व जपानमध्ये झालेल्या पाहणीत काही वर्षांपूर्वीच्या मानाने तेथील सध्याच्या मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षाही जास्त वाढले आहे. त्यांत घरात राहून बैठे खेळ खेळणे, कुठल्यातरी स्क्रीन (टीव्ही-कॉम्प्युटर)समोर नजर सतत खिळवून ठेवणे, या अशा शहरी जीवनशैलीचा परिणाम असण्याची शक्यलता सांगितली आहे. ‘अ’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी निश्चि तच चांगले असते; परंतु चष्म्याचा नंबर ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येत नाही. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांवर इतर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कितीही पालेभाज्या खाल्ल्या, गाजर खाल्ले तरी चष्म्याचा नंबर कमी होत नाही. काही लोकांमध्ये असाही एक गैरसमज असतो, की सारखा चष्मा वापरला, की चष्म्याचा नंबर कमी होतो; परंतु असे काही नसते. चष्मा वापरणे व नंबर कमी अथवा जास्त होणे, या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चष्मा कायम घातला तरी नंबर जर वाढायचा असेल, तर वाढतोच.

नंबरांचे वर्गीकरण
चष्म्याच्या नंबरांच्या प्रकाराचे वर्गीकरण ऱ्हस्वदृष्टिदोष, दीर्घदृष्टिदोष व चाळिशीनंतर लागणारा चष्मा, असे करता येईल.
ऱ्हस्व दृष्टिदोष – अशा रुग्णांचा डोळा आकाराने मोठा असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघतो, त्याची प्रतिमा डोळ्याच्या रेटिनाच्या पुढे तयार होते. या रुग्णांना लांबचे दिसत नाही; जवळचे मात्र दिसते. लांबचे न दिसल्यामुळे हे रुग्ण टीव्ही जवळ जाऊन बघणे, पुस्तक डोळ्यांच्या जवळ घेऊन बघणे, असे करतात. ऋण (मायनस) नंबरचा चष्मा अथवा कॉन्टॅक्टय लेन्स वापरून या रुग्णांची नजर सुधारते. सर्वसामान्यपणे लहान वयात ऱ्हस्वदृष्टी चष्मा लागल्यावर शरीराची वाढ होते; त्या प्रमाणात नंबरही वाढत जातो. वाढ पूर्ण झाल्यावर नंबर वाढण्याचे प्रमाणही थांबते; परंतु काही रुग्णांमध्ये त्यानंतरही नंबर वाढू शकतो. त्यांच्या आधीच्या पिढीतील नातेवाइकांचा नंबर कसा व किती आहे, यावर बरेचसे अवलंबून असते.

काही ऱ्हस्वदृष्टिदोष असलेल्या रुग्णांमध्ये डोळ्यांचा रेटिना नावाचा भाग काही ठिकाणी झिरझिरीत झालेला आढळून येतो. जास्त जाड चष्मा असलेल्या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. झिरझिरीत- पातळ झालेल्या भागात जर भोक पडले, तर त्यातून नेत्रपटल अथवा रेटिना आपल्या जागेवरून सरकण्याची शक्यळता असू शकते. असे झाल्यास एकाएकी दृष्टी एकदम कमी होते किंवा नजरेसमोर पडदा आल्यासारखे वाटून फक्त वरच्या भागातले दिसणे किंवा कुठल्या तरी एकाच भागातले दिसणे, असे होऊ शकते. उदाहरणार्थ- समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचे फक्त डोके व मान दिसते. खालचा भाग दिसत नाही किंवा फक्त खालचे शरीर दिसते; वरचा भाग दिसत नाही. एखाद्या रुग्णाला कपबशीतील फक्त कप दिसतो; बशी दिसत नाही, असे घडते. नेत्रपटल जागेवरून सरकलेले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करणे गरजेचे असते.

जाड चष्मा असलेल्या सर्व रुग्णांनी आपल्या डोळ्याचा रेटिना वर्षातून एकदा तपासून घ्यावा. त्यात जर काही झिरझिरीत अथवा भोके असलेला भाग दिसला, तर त्यावर लेझर उपचार करून पुढील संभाव्य धोका व त्यावरील मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. ज्यांच्या कुटुंबांमध्ये (आई-वडील-बहीण-भाऊ इत्यादी) असा प्रकार आधी झालेला आहे, त्यांना हा धोका जास्त असतो. असे घडल्यास करावी लागणारी शस्त्रक्रिया ही जवळ जवळ तातडीची शस्त्रक्रियाच समजली जाते; जितक्या् लवकर करू, तेवढी ती यशस्वी होण्याची शक्य्ता वाढते. जाड मायनस नंबरचा चष्मा असलेल्या रुग्णांनी त्यांना जर डोळ्याच्या आत वीज चमकल्यासारखी वाटली, तर डॉक्ट.रना लगेच दाखवावे. रेटीनाला भोक पडले असल्यास, असे होऊ शकते. अशा वेळी आधी सांगितल्याप्रमाणे लेझर उपचार केल्यास पुढचा धोका टाळता येऊ शकतो.

डोळ्यांच्या उपचारांमध्ये लेझर वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतात. लेझर म्हणजे फक्त काही विशिष्ट पद्धतीचे लाईटचे किरण डोळ्यातील हव्या त्या भागावर केंद्रित करतात. अगदी पाच ते दहा मिनिटांत हे काम होते. कुठल्याही प्रकारचे इंजेक्शकन, शस्त्रक्रिया यात नसते.

दीर्घदृष्टिदोष या रुग्णांचा डोळा आकाराने लहान असतो. त्यामुळे ज्या वस्तूकडे बघायचे तिची प्रतिमा रेटिनाच्या मागच्या भागात तयार होते. प्रत्यक्ष रेटिनावर धूसर प्रतिमा दिसते. या रुग्णांना मुख्यत्वे जवळचे बघायला त्रास होतो. लांबचे चष्मा न लावल्यासही दिसते; परंतु जास्त नंबर असल्यास डोके दुखणे – डोळे दुखणे असे होऊ लागते. त्यामुळे लांबचे बघतानासुद्धा चष्मा लावावा. ऱ्हस्वदृष्टिदोषाप्रमाणे दीर्घदृष्टिदोषाच्या रुग्णांमध्ये शरीराच्या वाढीनुसार नंबर वाढत नाही. रेटिनाही बहुतांश रुग्णांत चांगला असतो. त्यामुळे त्यामानाने नेत्रपटल सरकण्याचा प्रकार कमी असतो.

प्रेसबायोपिया म्हणजेच चाळिशीनंतर येणारा चष्म्याचा नंबर! चाळिशीआधी आपल्या डोळ्याचे स्नायू लवचिक असतात. त्यामुळे डोळ्यापासून जवळच्या अंतरावर, लांब अंतरावर व त्यामधील कुठल्याही अंतरावर आपल्याला नजर केंद्रित करता येते; परंतु चाळिशीनंतर स्नायूंची लवचिकता कमी होते, त्यामुळे लांबची नजर फारशी खराब होत नाही. मात्र जवळचे अंधुक दिसू लागते. पेपर जरा लांब धरल्यावर चांगला दिसतो. वयाप्रमाणे काही प्रमाणात हा नंबर वाढतो. त्यामुळे चाळिशीनंतर बायफोकल अथवा प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा लांबचा व जवळचा वेगवेगळा, असे दोन चष्मे करावे लागतात. ज्यांना आधीपासून मायनस नंबरचा चष्मा आहे, त्यांना लांबचा चष्मा काढून जवळचे चांगले वाचता येते; परंतु तरीही जवळचा नंबर वेगळा काढणे व त्यानुसार वेगळा चष्मा करणे चांगले. कॉम्प्युटरवर ज्यांना जास्त वेळ काम करावे लागते, त्यांना कॉम्प्युटरच्या अंतरासाठी वेगळा नंबर वापरल्यास डोळ्यांवर ताण येत नाही.
सिलिंड्रिकल नंबरचा चष्मा असणे बऱ्याच रुग्णांची सिलिंड्रिकल नंबर आहे म्हटल्यावर ‘काही तरी भयंकर आजार आहे’, अशी भावना होते. खरे असे काहीच नाही. नंबरचा तो एक प्रकार आहे, एवढेच. कॉनियाचा पृष्ठभाग सर्व भागांत सारखाच गोलाकार नसेल, तर सिलिंड्रिकल नंबर लागतो. उदाहरणार्थ- उभा भाग जास्त गोलाकार असणे किंवा तिरपा भाग (१४० अंश-१२० अंश इत्यादी) जास्त गोलाकार असणे, असे. अशावेळी सर्व भागांत सारखाच गोलाकार असणारा नंबर देता येत नाही. सिलिंड्रिकल नंबरची काच हव्या त्या भागात कमी-जास्त गोलाकार करून घेता येते. सिलिंड्रिकल नंबर प्लस किंवा मायनस किंवा दोन्हींचे मिश्रणही असू शकतो. हा फारसा वाढत नाही; मात्र चष्मा न घातल्यास पेशंटना डोळे दुखणे, डोके दुखणे असे त्रास सुरू होतात. कोणता का नंबर असेना, डोळ्यांना त्रास होत असेल तर चष्मा वापरणे हितावह आहेच.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.- संतोष शेणई

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on चष्मा का लागतो?

  1. फार महत्त्वाची माहिती मिळाली मी तुमचा आभारी आहे सर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..