नवीन सुती कापड खरेदी करुन आणले आणि त्या कोऱ्या कापडापासून कपडे शिवले तर पहिल्यावेळी कपडे धुतल्यानंतर ते आपल्याला आटलेले आढळतात, उंचीला कमी होतात असा अनुभव येतो याचे कारण काय असेल याचा शोध घ्यायचा, तर थोडी कापडनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल.
कापडाच्या लांबीच्या दिशेने असलेले धागे ते उभे धागे (ताणा) आणि आडवे धागे (बाणा) असे काटकोनात एकमेकात गुंतवलेले असतात. त्यापैकी उभ्या धाग्याची एका बाजूला मांडणी करुन ते एका मोठ्या रिळावर ज्याला बीम म्हणतात-गुंडाळले जातात. उभे धागे एकेरी असतील तर कांजीची प्रक्रिया केली जाते, पण तेच दुहेरी उभे धागे असतील तर त्याची गरज पडत नाही.
त्यानंतर हे बीम मागावर (हातमाग किंवा यंत्रमाग ) लावले जातात. त्यापासून जे कापड विणायचे असेल, त्यानुसार त्याची रचना केली जाते. मग मागावर धोट्याच्या (शटल) मदतीने आडवा धागा गुंतवला जातो आणि हे करताना उभ्या धाग्याचे किमान दोन भाग करतात म्हणजे उभ्या धाग्याचा एक संच आणि आडव्या धाग्याच्या वर असतो, तर दुसरा संच खाली असतो. यानंतर उभ्या धाग्याच्या संचाची अदलाबदल होते आणि दुसरा आडवा धागा त्यामध्ये गुंतवला जातो. प्रक्रिया सतत व एकामागोमाग सुरू राहते, तेव्हा कापड तयार होते. अशी वीण नीट साध्य करण्यासठी उभ्या धाग्याचे दोन संच योग्य तऱ्हेने होणे गरजेचे असते, म्हणून आवश्यक तेवढा ताण दिला जातो.
विणलेले कापड एका रोलवर गुंडाळले जाते. ह्या कापडापैकी उभ्या धाग्यावर जो ताण दिलेला असतो तो, कापड पाण्यात भिजवल्यावर कमी होतो. त्यामुळे उभ्या धाग्याच्या दिशेने म्हणजे कापडाच्या लांबीच्या दिशेने कापड आटते.
यामुळेच सुती कापड विकत आणल्यास, ते प्रथम पाण्यात रात्रभर भिजवून मग वाळवून त्याचे कपडे शिवायला दिले जातात. मानवनिर्मित तंतूच्या कापडावर एका प्रक्रिया आधीच केली जाते, त्यामुळे ही अडचण येत नाही.
दिलीप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply