ठिबक सिंचन ही अत्याधुनिक सिंचनप्रणाली आहे. झाडाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देऊन अगदी कमी पाण्यात पीक पोषण करण्याच्या पद्धतील ठिबक पद्धत म्हणतात. पारंपरिक पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीमुळे अडीच ते तीनपट जास्त क्षेत्रावर सिंचन होते म्हणून शेती शास्त्रातला हा एक चमत्कार समजला जातो.
प्रवाही पद्धतीत सिंचनाच्या दोन पाळ्यांत आठ-दहा दिवसांचे अंतर असते. सिंचनानंतर जमीन पाण्याने संपृक्त होते. ज्या खोलीपर्यंत पाणी भरले तिथली हवा वातावरणात निघून जाते. निर्वात स्थितीत पिकांच्या मुळांशी दमकोंडी होते आणि ती अकार्यक्षम होतात. परिणामी झाडांचे कार्य थांबते. ही स्थिती दोन-तीन दिवस टिकते. सिंचनाची दुसरी पाळी द्यायच्या अगोदर दोन-तीन दिवस ओलावा कमी झाल्यामुळे पिकाला ताण बसतो. या काळातसुद्धा वाढ खुंटते. अती पाणी आणि ताणाच्या हिंदोळ्यात पिकांचे भरपूर नुकसान होते. होणारे नुकसान दृश्य नसते म्हणून कोणी त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही.
ठिबक पद्धतीत झाडाची एक-दोन दिवसांची गरज भागेल एवढेच पाणी दिले जाते. पाणी कमी दिल्यामुळे मुळांजवळची वापसा मोडत नाही. मुळांभोवती हवा आणि पाण्याचे संतुलन राहते. कमी-अधिक ओलाव्याचे चढउतार होत नाहीत म्हणून पीक रुजल्यापासून पक्व होईपर्यंत त्याच्या वाढीचा जोम कायम राहतो, उत्पादन वाढते, मालाचा दर्जा उत्तम मिळतो आणि पीक लवकर तयार होते.
पारंपरिक पद्धतीत पीक वाढीच्या काळात एक किंवा फार तर दोन वेळा खते दिली जातात. काही खते जमिनीत खोलवर झिरपून वाया जातात. काही पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून जातात तर काही वायुरूपात वातावरणात मिसळतात, अशा कारणांनी खते वापराची कार्यक्षमता खूप कमी होते. ठिबक सिंचनाद्वारे खते देता येतात. पाणी गाळण यंत्राजवळ खते द्यायचे साधन ठेवलेले असते. त्याद्वारे रोजच्या रोज लागणारी अन्नद्रव्ये देता येतात. खतांची बचत होते आणि उत्पन्नात ४० ते ६० टक्के वाढ होते.
प्रा. बापू अडकिने, परभणी
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार
Leave a Reply