आपला नेहमीचा अनुभव लक्षात घ्या. खिडक्या-दरवाज्यांचे पडदे पहा, खासकरुन त्यांची बाहेरील बाजू पहा. तिथला रंग कापडाच्या मूळ रंगापेक्षा फिका झालेला असणार. हाच परिणाम जिथे फर्निचरच्या सनमायकावर सकाळचे किंवा सायंकाळचे ऊन पडते, तेव्हा त्याचाही रंग उतरतो. म्हणूनच म्हणतात की, रंगाच्या टिकाउपणाबाबात एक अडचण आहे ती सूर्य प्रकाशाची.
आपल्या डोळ्यांना दिसणारा रंग आणि प्रकाश ह्यांचा एकमेकांशी फार घनिष्ठ संबंध आहे. जास्त प्रकाशात रंग उठून दिसतो तर अंधूक प्रकाशात रंग नीट समजणे कठीण होते. कोणत्याही वस्तूचा भासमान रंग हा वस्तुत: त्या पदार्थाचा गुणधर्म नव्हे; त्या वस्तूपासून परावर्तित झालेल्या प्रकाश किरणांमुळे जी प्रतिमा दिसते, तिचा तो रंग आपल्याला दिसणाऱ्या वस्तूचा वाटणारा रंग होय. एखाद्या वस्तूपासून सौरवण पटातील सर्व रंग योग्य प्रमाणात परावर्तित झाल्यास ती वस्तू पांढरीशुभ्र दिसेल. याउलट, त्या वस्तूपासून कोणतेच किरण परावर्तित न झाल्यास ती वस्तू काळी दिसेल. पण ज्यावेळी वर्ण पटातील काही रंग परावर्तित होतात आणि काही रंग त्या वस्तूत शोषून घेतले जातात, त्यावेळी आपल्याला परावर्तित रंग ले दिसतात. यापैकी शोषून घेतलेले रंगच प्रकाशामुळे फिकेपणा यायला कारणीभूत असतात.
शोषलेल्या रंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात. अर्थात, हा परिणाम वेगवेगळा असतो, इतकेच नव्हे, तर रंगांच्या प्रकारानुसारही तो बदलतो. थेट रंगाच्या बाबतीत जास्त परिणाम आढळतो तर तंतूंबरोबर रासायनिक क्रिया करणारे रंग वापरले असतील तर त्याबाबतीत तो खूप कमी असतो, असे म्हणता येईल.
याच कारणाने रंगीत कपडे उन्हात वाळत घालू नयेत. थेट सूर्यप्रकाश त्यावर पडू नये म्हणून ते सावलीत वाळत घालावेत, अशी सूचना सर्वांना दिली जाते.
दिलिप हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply