नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे. दोन हायड्रोजन आणि एक ओजिन मिळून बनतो पाण्याचा रेणू! पैकी हायड्रोजन आहे धन भारित आणि ऑक्सिजन ऋण भारित. दोन्ही विद्युतभार विरुद्ध टोकांना असल्यामुळे पाण्याचा रेणू पोलार झाला आहे. त्यामुळे इतर कोणतेही भारित रेणू पाण्याच्या रेणूशी सौम्य विद्युत बंधनात अडकतात, जेणेकरून तो पदार्थ विरघळतो. दुसरी बाब म्हणजे पाण्याच्या रेणूचा आकार इतर द्रावकांपेक्षा लहान आहे. मुळे पाण्याचे रेणू दुसऱ्या पदार्थांच्या रेणूत शिरून त्याला घेरून टाकतात, त्यामुळे तो विरघळतो. पाण्यात कित्येक कार्बनी तसेच अकार्बनी पदार्थही सहज विरघळतात.
पाण्याचे भारित रेणू हे अत्यंत वेगाने आजूबाजूला फिरत एकमेकांना टक्कर देत असतात. त्याला ब्राऊनिअन हालचाली म्हणतात. या टकरीमुळेदेखील अनेक पदार्थांचे कण पाण्यात तरंगत राहतात. अशा (द्रावणांना कलिल (कोलॉइड) द्रावण म्हणतात. कलिल कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. शिवाय कलिल द्रावणातील कण अतिशय लहान असल्यामुळे साध्या डोळ्यांनी द्रावणात वेगळे दिसत नाहीत.
उदाहरणार्थ आपले रक्त, गाईचे दूध. मात्र अधिक भारित पदार्थ टाकताच ही कलिल द्रावणे मोडून पडतात. जसे मीठ टाकल्याने दूध फाटते.
पाण्याचा रेणू मिठाच्या रेणूला वेगळं करून विरघळवतो. मात्र काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. जसे तेल, वाळू, धूळ वगैरे. त्यांना पाण्यात विरघळण्यासाठी साबण वा डिटर्जंटचा उपयोग करावा लागतो. साबणाचे रेणू हे भारित असतात. ते तेलाच्या कणाभोवती चिकटून त्याला भारित बनवतात . आणि त्यामुळे तेलाचा कण पाण्यात मिसळून जातो, पण विरघळत नाही. यालाच ‘इमल्शन’ म्हणतात, औषधे, घराचे रंग ही इमल्शने आहेत.
पाण्याची द्रावणे, कलिल (कोलॉइड) आणि इमल्शने आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगाची आहेत.
-डॉ. कमलेश कुशलकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply