डांबरी रस्ते तयार करताना सर्वात खालील जमीन रोलरने पुरेशी दाबून घ्यावी लागते. यासाठी चांगला मुरुम आणि चिकण मातीची गरज असते. या मातीच्या एकसारख्या थरावर १५ ते २२ सें. मी. जाडीच्या मजबूत दगडांचा थर घालून तो १० टन वजनाच्या रोलरने सात ते आठवेळा व्यवस्थित दाबून घ्यावा लागतो. त्यामध्ये मग ३० ते ४० ग्रेडच्या गरम द्रवरुपी डांबराचे प्रेशर ग्राउटिंग करुन त्यावर बारीक खडी पसरुन रोलरने दाबून घ्यावे लागते.मग त्यावर १० ते १२ सें. मी. जाडीचा ४ ते ६ सें. मी. खडीचा थर घालून रोलिंग करुन डांबराने ग्राउटिंग करावे लागते. त्यानंतर दाबून झालेला पाच सें. मी. थर डांबर-खडी मिश्रीत काँक्रिटचा थर द्यावा लागतो. नंतर रोलिंग करुन घ्यावे लागते.
शेवटी त्यावर दीड सें. मी. जाडीची बारीक खडी व डांबर यांच्या मिश्रणाचा थर देऊन रोलर फिरवावा लागतो.रस्त्याचा पृष्ठभाग मध्यावर उंच (कॅबर) व कडेला उतार द्यावा. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. एवढे केल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी खोलगट गटारे असणे जरुर आहे. गटारे जाळीने झाकलेली असावीत आणि नेहमी स्वच्छ असावीत. अशा पद्धतीने रस्ता बनवला नाही तर जागोजाग खड्डे पडतात.पाण्याचा निचरा झाला नाही तर ते पाणी रस्त्याच्य जाडीतून झिरपून जाऊन रस्त्याखाली जमा होते आणि रस्ता कमजोर होऊन खचतो.
रस्त्याच्या कडेने केबल, पाण्याचे पाईप यांच्यासाठी चर खोदून ते नीट बुजवले नाहीत तर कडेचा भाग खचतो व मग तो हळुहळू मध्यभागीही खचतो. डांबर, खडी, दगड यांचा दर्जा चांगला नसेल तर रस्ता रहदारीचे वजन पेलू शकत नाही. रस्ता बनवण्याचे तंत्रज्ञान व यंत्रसामग्री यात आता खूप प्रगती झाली असूनही रस्त्याला खड्डे पडतात कारण रस्त्याचे बांधकाम नीट होत नाही. हिणकस माल, कामात टाळाटाळी करणारे मजूर आणि देखरेखीचा अभाव यामुळे रस्त्यांना खड्डे पडतात.
Leave a Reply