रंगीत चित्र किंवा छायाचित्र हे मूळ चार रंगात छापले जाते. प्रथम छायाचित्र स्कॅनर उपकरणावर लावून ते संगणकावर घेतले जाते. पूर्ण पानातल्या चारपैकी प्रत्येक रंगाचा भाग निरनिराळा केला जातो. उदाहरणार्थ पान क्र. एकवरील लाल शीर्षक, जाहिरातीमधील लाल रंगाचा भाग, एखादे केशरी रंगाचे फूल असेल तर त्यातला पिवळ्या रंगाचा हिस्सा न घेता लाल रंग वगैरीची प्रतिमा, काळया रंगातली प्रामुख्याने मजकुरातली अक्षरे, छायाचित्रातल्या काळ्या रंगाचा हिस्सा घेऊन या प्रमाणे चार रंगाच्या चार प्रतिमा तयार करण्याला रंग विभागणी करणे म्हणतात. या चार रंगांच्या प्रतिमांवरुन चार ऑफसेट फ्लेट्स बनविल्या जातात. छपाई यंत्रावर या चार रंगांची छपाई त्यांच्या मूळ जागेवर, एकावर एक बरोबर करणे याला रजिस्ट्रेशन करणे असे म्हणतात. हे रजिस्ट्रेशन चुकले तर छपाई बोथट व छायाचित्र हलल्यासारखे दिसते. दहा डोक्यांचा रावण चाळीस डोक्यांचा दिसतो.
वेळा काही छपाईतील मजकूर पुसट दिसतो किंवा कोऱ्या भागात काळपटपणाची छटा येते. ऑफसेट छपाईत पाणी व शाई यांचे योग्य प्रमाण फ्लेटला द्यावे लागते. यंत्र चालविणाऱ्या माणसाचे कसब यावेळी पणाला लागते. पाण्याचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक असेल शाई कमी होऊन छपाई पुसट दिसते. त्यामुळे कागदाची चमकही जाते. पाण्याचे प्रमाण कमी होऊन शाई वाढल्यास कोऱ्या भागातही थोडी शाई पसरते आणि तेथे काळपट छटा दिसते.
शाई सिलेंडरच्या प्रत्येक फेरीत प्लेटला जेवढी लागेल तेवढी ती संपूर्णपणे ब्लॅकेटवर त्याच फेरीत यावी लागते व त्याच फेरीत कागदावर पूर्ण उतरावयास हवी. ती तशी आली नाही तर ती ब्लँकेटवर जमा होत जाते व नंतर त्याचा काळा पट्टा कागदावर दिसावयास लागतो. हा शाईचा दोषही असू शकतो. कागदाचे रीळ यंत्रावर बरोबर मध्यभागी बसवले नाही तर कागदाची घडी मध्यावर न पडता एका बाजूला पडते, हे व्यवधानही सांभाळावे लागते. नाहीतर वाचकाला वेडयावाकड्या घडया पडलेले वर्तमानपत्र हातात धरावे लागते.
Leave a Reply