निवृत्तीचे मिळालेले सर्व पैसे आपल्या मुला/ मुलींच्या नावावर केल्यावर पश्चाताप करणारे बरेच वडीलधारी व्यक्तींबाबत आपण वर्तमानपत्र/ चित्रपट/ नातेवाइक/ शेजारी/ प्रवासात भेटणारी व्यक्ती इतकेच नाही तर काही नाटक आणि टीव्ही वरील मालिकांमध्येसुद्धा आपणास पाहण्यात/ वाचण्यात/ ऐकण्यात येतात, त्याचे प्रमुख कारण आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्याची संख्यासुद्धा आपल्याकडे कमी नाही. तरीही प्रत्येक व्यक्तीला असेच वाटत असते की, मला इच्छापत्र/ मृत्युपत्र करण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये इच्छापत्र का/ कोण/ कसे करावे या बाबत माहितीपर लेख आपल्यासाठी.
प्रश्न २९) इच्छापत्र/मृत्युपत्र/विल का करावे?
उत्तर: इच्छापत्र करण्याचे कारण आपल्याला पुढील उदाहरणाद्वारे समजण्यास मदत होईल. सुरेश परांजपे (सर्व नावे काल्पनिक) यांना ३ मुले होती. धाकटा मुलगा प्रकाश हा नेहमी दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मानत असल्याने त्याच्या वर्तणुकीमुळे सुरेश यांना त्यांच्या प्रकाश या मुलाला काहीही देण्याची इच्छा नव्हती. ते तसे बोलूनसुद्धा दाखवत. परतु, एकेदिवशी सुरेश यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि ३ मुले. पत्नी आणि २ मुले यांनी प्रकाशला हिस्सा न देण्याचे ठरवले. तेव्हा प्रकाशने न्यायालयात जाऊन हिस्सा सिद्ध केला. महिनाअखेरीस सुरेश परांजपे याची पत्नी यांचा मृत्यू झाला. प्रकाशचे दोन्ही भाऊ त्याच्या त्रासदेण्याच्या वृत्तीने घर सोडून देतात. जेणेकरून वडिलांचा प्रकाशाला त्यांच्या मिळकतीतून काही देण्याची इच्छा नसतानाही सदर मिळकतीवर प्रकाशाचा ताबा राहिला. जर सुरेश परांजपे यांनी वेळीच इच्छापत्र केले असते आणि स्वमिळकतीची यांच्या पश्यात कशी विल्हेवाट लावावी हे नमूद केले असते तर ही वेळ सुरेश यांच्या प्रकाश व्यतिरिक्त दोन भावांवर आली नसती. सुरेश यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळकत देता आली असती तसेच पुढे मिळकतीबाबत होणारे वाद टाळता आले असते.
प्रश्न ३०) इच्छापत्र म्हणजे काय? कोण करू शकते? कोणत्या मिळकतीबाबत करू शकते?
उत्तर: स्व मिळकत मृत्यू नंतर चल/ अचल मिळकत यांचे वाटप कसे व्हावे ह्यासाठी बनवलेले दस्त म्हणजे ‘इच्छापत्र’. यालाच ‘मृत्युपत्र’ किंवा ‘विल’ म्हणतात. वय वर्षे १८ पूर्ण झालेला कोणताही सज्ञान व्यक्तीने समजून उमजून, सदसद विवेकबुद्धीने करू शकतो. धाकाने, जीवाच्या भीतीने किंवा दबावाखाली केलेले इच्छापत्र बेकायदेशीर मानले जाते. मिळकतीचे दोन प्रकारात वर्गीकरण होते चल (दागिने/रोकड/रोखे) आणि अचल (दुकान/घर/जमीन). सदर मिळकत स्वअर्जित असावी.
प्रश्न ३१) इच्छापत्र कोणाच्या लाभात करता येते?
उत्तर: स्व मिळकतीचे वाटप कोणालाही करता येते. कायदेशीर वारस म्हणजेच (स्वत:ची मुले/मुली, रक्ताचे नातेवाइक) सज्ञान/अज्ञान किंवा यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही त्रयस्त व्यक्ती, सामाजिक कार्ये, धर्मादाय संस्था, मानसिक अस्थिर मुलाच्या पालन पोषण तसेच भविष्यासाठी तरतूद म्हणून. तसेच विवाहापूर्वी किंवा विवाहबाह्य संबधातून जन्माला आलेल्या अपत्यांच्या नावे अशा कोणत्याही व्यक्तीला/संस्थेला तुमच्या मिळकतीचे वाटप करता येते.
प्रश्न ३२) इच्छापत्र नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे का?
उत्तर: इच्छापत्र नोंदणी करणे बंधनकारक नाही. परंतु, केलेले कधीही चांगले असते. इच्छापत्र व्यक्तीच्या मृत्युनंतरही नोदणी करता येते.
प्रश्न ३३) इच्छापत्र कसे करावे?
उत्तर: आपल्या मिळकतीचा आणि कायदेशीर वारस व कायदेशीर तरतुदी यांचा कायदे सल्लागारांचा सल्ला घेऊन इच्छापत्र बनवल्यास सदर इच्छापत्राला आव्हान देणे सहज शक्य होणार नाही. सदर इच्छापत्र करताना आई-वडिलांची, मुला-मुलींची, पतीला पत्नीची आणि पत्नीला पतीची संमती घ्यावी लागत नाही. मूक-बधीर, दृष्टीहीन व्यक्तीसुद्धा इच्छापत्र बनवू शकतात. इच्छापत्र कधीही, कितीही वेळा बदलता येते. अविवाहीत व्यक्तीचे इच्छापत्र विवाहानंतर संपृष्टात येते. इच्छापत्र लिखित असावे. साक्षीदार (दोन) व्यक्तीच्या सह्या तारीख, वार, वेळ, आणि ठिकाण याची नोंद असावी. साक्षीदार वयाने तरुण असावेत जेणेकरून भविष्यात साक्ष देण्याची गरज पडल्यास उपलब्ध होतील. इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा साक्षीदार यांच्यासमोर सह्या कराव्यात. साक्षीदार लाभाकीत नसावेत. त्यांना इच्छापत्र काय केले आहे याची महिती असणे गरजेचे नाही.
– अॅड. विशाल लांजेकर.
Leave a Reply