विन्स्टन चर्चिलचा जन्म ३० नोव्हेंबर १८७४ रोजी झाला.
१९४० ते १९४५ आणि १९५१ ते १९५५ दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान राहिलेले विन्स्टन चर्चिल यांची कारकीर्द गाजली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान कठीण कालखंडात इंग्लंडला नाझींच्या जर्मनीवर विजय मिळवून देण्यात विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्त्वाची भूमिका निर्णायक ठरली होती. विन्स्टन चर्चिल हे नोबेल पारितोषिक विजेते होते. चित्रकार, लेखक, नौदल अधिकारी, पत्रकार, भाषाजाणकार अशी विन्स्टन चर्चिल यांची ख्याती होती. इंग्रजीचा अर्धा शब्दकोष त्यांना पाठ होता असं म्हणत. ते इंग्रजी साम्राज्याचे घट्ट पुरस्कर्ते होते. ते नेहमी भारत स्वातंत्र्य मिळायच्या लायकीचा नाही असं म्हणत.
विन्स्टन चर्चिल हे महात्मा गांधीजीना नंगा फकीर म्हणत. विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे दोनदा पंतप्रधान झाले. त्यांनी दोन महायुद्ध पाहिली, अनुभवली, व त्याचे नेतृत्व केलं. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून देण्यात मोठा वाटा विन्स्टन चर्चिल यांनी उचलला होता. चर्चिल यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं होतं. त्यांच्या आयुष्याला विरोधाभासी किनार होती आणि त्याचवेळी समकालीनांच्या तुलनेत त्यांचं व्यक्तिमत्व भव्य भासतं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट आणि चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धातील विजयाचे शिल्पकार मानले जातात.
दुसऱ्या महायुद्धातील या दोघांचा वारसा कोणता? या प्रश्नाला ‘अवर वर्ल्ड फ्रीडम’ म्हणजे आज आपण राहत असलेले ‘स्वतंत्र जग’ असे उत्तर दिले जाते. चर्चिल यांचे व्यक्तिमत्व बहुपेडी होते. ते उत्तम वक्ते होते. आपल्या लेखनासाठी ‘नोबेल’ मिळवणारे लेखक होते, चित्रकार होते; द्रष्टे अन् चारित्र्यवान राज्यकर्ते होते. चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापूर्वी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेव्हिल चेंबरलेन ब्रिटनचे पंतप्रधान होते. जर्मनीबाबत सावध राहण्याचा सल्ला चर्चिल यांनी देऊनही चेंबरलेन १९३८ मध्ये हिटलरला जर्मनीतील म्युनिक शहरात भेटून आले. ‘मी शांतता घेऊन आलोय,’ असे आश्वासन त्यांनी त्यानंतर पार्लमेंटला दिले. मात्र, ही एक वल्गना ठरली; कारण नंतर लगेचच हिटलरने पोलंडवर हल्ला करून तो देश ताब्यात घेतला.
ब्रिटनने ३ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. पराभव आणि युद्धपरिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीबद्दल झालेली टीका, यामुळे चेंबरलेन यांनी १० मे १९३९ या दिवशी म्हणजेच हिटरलने फ्रान्सवर आक्रमण करण्याचा काही तास आधी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. (त्याच वर्षी चेंबरलेन नोव्हेंबर महिन्यात मृत्यू पावले.) त्यानंतर चर्चिल पंतप्रधान बनले. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. चर्चिल यांनी संयुक्त मंत्रिमंडळ बनवले, त्यात मजूर पक्षाचे ॲटलीही एक मंत्री होते.
चर्चिल यांनी पंतप्रधानपदाव्यतिरिक्त संरक्षण खातेपण स्वतःकडे घेतले. पंतप्रधान होताच चर्चिल यांनी पराभव, तडजोड, तह या गोष्टींना स्पष्ट नकार दिला. यामुळे ब्रिटीश प्रतिकाराला बळ मिळाले, प्रेरणा मिळाली. महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटन आणि ब्रिटिश साम्राज्यातील देश एकटेच हिटलरशी सामना करीत होते. आपल्या भाषणांतून आणि दृढ निर्धारातून त्यांनी ‘ब्रिटन हे युद्ध जिंकेलच,’ अशी आशा ब्रिटिशांत निर्माण केली. या आश्वासकतेमुळेच नव्हे, तर भाषा सौंदर्यामुळे, विचारांमुळे त्यांची भाषणे मनाचा ठाव घेत. एकदा ते म्हणाले होते, ‘ब्रिटनचे युद्ध आता सुरू होणार आहे. या युद्धाच्या निकालावर ख्रिश्चन संस्कृतीचे टिकणे अवलंबून आहे. आपण हिटलरचा पाडाव करू शकलो तर संपूर्ण युरोप स्वतंत्र होईल. सर्व जग सूर्यप्रकाशाने प्रकाशित अशा उजळ उंच प्रदेशात प्रवेश करेल.’ पंतप्रधान म्हणून संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात ते म्हणाले, ‘माझ्याजवळ रक्त, श्रम, अश्रू आणि घाम यांशिवाय देण्याजोगे दुसरे काहीही नाही.’ या वाक्याचा संसद सदस्यांवर अंगातून वीज जावी असा परिणाम झाला. डंकर्कहून ब्रिटनने माघार घेतल्यावर घेतल्यावर हिटलरला वाटले, की ब्रिटन तहाची याचना करेल; पण उलट युद्ध सुरू ठेवण्याचा निर्धार चर्चिलनी व्यक्त केला. त्यांच्या दुसऱ्या एका गाजलेल्या या भाषणात ते म्हणाले, ‘आपण आपल्या कर्तव्याला चिकटून राहू आणि असे वागू की जर ब्रिटिश साम्राज्य आणि कॉमनवेल्थ एक हजार वर्षे टिकले तर लोक म्हणतील. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वेळ (फायनेस्ट अवर) होती.’ आणखी एका युद्धपर्व भाषणात ते म्हणाले होते, ‘आम्ही फ्रान्समध्ये लढू, समुद्रावर आणि महासागरावर लढू. आम्ही हवेत वाढत्या विश्वासने आणि वाढत्या ताकदीने लढू, आम्ही आमच्या बेटाचे रक्षण करू. मग काहीही किंमत मोजावी लागो. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर लढू, शेतातून लढू, रस्त्यात लढू, आम्ही टेकड्यांवर लढू, आम्ही कधीही शरण जाणार नाही.’ केवढा हा आत्मविश्वास! या युद्धात जर्मन विमानांनी लंडनवर बॉम्बफेक केली. त्यात संसदेच्या प्रतिनिधिगृहाचे खूप नुकसान झाले. रोज सरासरी दोनशे विमाने लंडनवर हल्ला करण्यासाठी येत असत. इतके हल्ले सोसावे लागूनही ब्रिटिश लोकांचे मनोधैर्य कमी झाले नाही. ब्रिटनचे एकूण विमान उत्पादनही (संख्यने) जर्मनीपेक्षा जास्त होते, विमान हल्ले यशस्वी होण्यासाठी नाविक दलाची मदत लागते. जर्मनीचे नाविक दल तशी मदत घेऊ शकले नाही. ब्रिटनचे आरमारी सामर्थ्य प्राबल्य वादातीत होते; शिवाय ब्रिटिश फायटर पायलटनी जर्मन विमानांना उत्तम तोंड दिले. या पायलटचे कौतुक करतांना चर्चिल म्हणाले, ‘इतके खूप लोक (सर्व ब्रिटिश जनता) इतक्या थोड्या लोकांना (पायलटना) एवढे मोठे ऋण पूर्वी कधीच देणे लागले नसतील.’
युद्धाच्या समाप्तीनंतर जुलै १९४५ मधील निवडणुकीत मजूर पक्षाची सरशी झाली. चर्चिल यांचा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष पराभूत झाला आणि मजूर पक्षाचे क्लेमंट ॲटली ब्रिटनचे पंतप्रधान झाले. युद्धोत्तर शांततेच्या काळात ब्रिटिशांना चर्चिल नको वाटले असतील. सव्वा सहा वर्षांनंतर पुन्हा चर्चिल यांचा पक्ष निवडून आला आणि चर्चिल दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. ‘मी पुन्हा पंतप्रधान का झालो,’ या प्रश्नाचे चर्चिल यांनी त्यावेळी दिलेले उत्तर ‘लंडन टाइम्स’ने २७ ऑक्टोबर २०१४च्या अंकात दिले होते. ‘मला प्रामाणिकपणे वाटते की तिसरे महायुद्ध टाळण्याच्या कामात मी मदत करू शकेन; आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या कामातही,’ असे चर्चिल म्हणाले होते. त्यांच्या दुसऱ्या पंतप्रधानपदाच्या काळात जनतेला हवी असणारी एक गोष्ट घडली. चर्चिलना राणीने ‘सर’ हा किताब जाहीर केला आणि तो देण्याचा समारंभ १४ जून १९५३ या दिवशी विंडसर पॅलेसमध्ये घेण्यात आला. ते ‘सर विन्स्टन चर्चिल’ झाले आणि त्यांच्या पत्नी लेडी क्लेमिंटाइन चर्चिल झाल्या. पंतप्रधानपदावर असतांना ‘सर’ हा हुद्दा मिळवणारे चर्चिल हे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या पंतप्रधान पदाची मुदत १९५७ मध्ये संपणार होती. १९५५ मध्ये स्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांनी संसदेत बॅकबेंचर म्हणून बसणे पसंत केले. त्यांच्याच पक्षाचे अँथनी ईडन पंतप्रधान झाले.
युद्धकाळात चर्चिल यांनी ज्या जागेतून काम केले त्या खोल्यांना ‘चर्चिलच्या वॉर रुम्स’ असे म्हणतात. लंडनमध्ये पार्लमेंटपासून जवळच जी व्हाइट हॉल नावाची इमारत आहे, त्या इमारतीच्या तळघरात या खोल्या आहेत. इथेच मंत्रिमंडळाच्या सभा व्हायच्या. चर्चिल यांचे कुटुंब जवळचे सल्लागार यांच्यासाठी एक फ्लॅट होता. चर्चिल यांच्या खासगी खोल्याही होत्या. आता या गोष्टीचे रूपांतर चर्चिल यांच्या स्मरणार्थ एका म्युझियममध्ये करण्यात आले आहे. चर्चिल यांचा मौल्यवान लेखनसंग्रह जतन करण्यासाठी ब्रिटनच्या हेरिटेज लॉटरी फंडाने १९९५ मध्ये त्यांच्या कुटुंबीयांना १.१५ कोटी पौंड एवढी रक्कम दिली. त्यावेळी हा संग्रह जतन करण्याचे काम केंब्रिज विद्यापीठाच्या चर्चिल कॉलेजकडे देण्यात आले. या कागदपत्रांची २७ जुलै १९४५ पर्यंतची आणि त्यानंतरची अशी दोन विभागात विभागणी करण्यात आली.
चर्चिल प्रत्येक कागद जपून ठेवीत. त्यांचा पत्रव्यवहार, शालेय अहवाल, बालपणातील पत्रे, सचिवांना पाठवलेली पत्रे, तारा, टिपणे, असे पंधरा लाख कागद वैयक्तिक संग्रहात आहेत. चर्चिल यांचे रुझवेल्ट यांच्याशी घनिष्ट संबंध होते. १९६३ मध्ये एक कायदा करून चर्चिलना अमेरिकेचे सन्माननीय नागरिकत्व देण्यात आले. त्यावर जॉन केनेडी यांची सही होती. हार्वर्ड, रॉचेस्टर यासारख्या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या अर्पण केल्या. बीबीसीने २००२ मध्ये घेतलेल्या ‘१०० सर्वश्रेष्ठ ब्रिटन्स’ या जनमत चाचणीत चर्चिल यांनाच पहिल्या क्रमांकाची मते मिळाले. सर्वेक्षणानुसार चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकलं होते.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. यांपैकी चार भागांतील ‘द हिस्टरी ऑफ इंग्लिश स्पिकींग पीपल’ या पुस्तकाबद्दल १९५३ मध्ये त्यांना वाङ्मयाचे नोबेल पारितोषिक मिळाले. दुसऱ्या महायुद्धावर त्यांनी सहा खंडांचे पुस्तक लिहिले.
विन्स्टन चर्चिल यांचे २४ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
— प्रा.एन. डी. आपटे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply