लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो. रात्री ज्याला झोप येईल तसा वरच्या माळ्यावर नाहीतर ओटीवर नाहीतर सारवलेल्या अंगणात गाद्या, चटया, सतरंज्या नाहीतर घोंगड्या अंथरुन झोपायचे. पंचवीस तीस जणांना पुरतील एवढ्या सुती गोधड्या आणि ज्याला जास्त थंडी वाजत असेल त्याला गोधडीवर लोकरीची घोंगडी घेऊन झोपायला लागायचे.
सकाळी सकाळी लाटांचा येणार मंद आवाज ऐकता ऐकता अंग गारठवणाऱ्या थंडीत गोधडी बाहेर पडायची इच्छाच व्हायची नाही. मोठ्या मामाने शेकोटी पेटवली असेल आणि एक एक करून तिथे शेकोटी जवळ जमा होऊन त्या शेकोटीत पाला पाचोळा काटक्या कुटक्या टाकायची मजा घेत सगळे शेकत बसले असतील म्हणून हुड हुड करत घराबाहेर पाऊल आपसूकच निघत असे. घरा बाहेर पडताना चुलीजवळ पितळी तपेल्यात पाणी तापत असलेले दिसायचे. चिंचेच्या झाडाखाली शेकोटी मध्ये टाकायला रस्त्यावर असलेल्या वडाच्या झाडाचा, चिंचेच्या आणि जांभळीच्या झाडांचा सुका पाला पाचोळा गोळा करून ठेवलेला असायचा. सोबतीला काट्या कुटक्यांचा ढीग असायचाच.
वड, चिंच आणि जांभूळ यांच्या पाल्या पाचोळ्या मुळे शेकोटीतून निघणाऱ्या धूराला एक वेगळाच सुगंध यायचा. शेकोटीची ऊब आणि धुराच्या वासामुळे तासभर बसून देखील शेकोटिसमोरून हलावेसे वाटत नसे. चिंचेच्या झाडावर लागलेल्या गाभुळलेल्या चिंचा लांब बांबूच्या आकडीने कोणीतरी पाडायचा आणि त्या शेकोटीत भाजायला टाकल्या जायच्या. गाभुळलेल्या चिंचा भाजल्यावर त्यांना जो फ्लेवर यायचा की हल्ली नुसतं आठवले तरी तोंडाला पाणी सुटतं.
समुद्रकिनारी असल्यामुळे रात्री उशिरार्यंत मांडव्याला थंडी फारशी जाणवत नसे. पण जसं जशी मध्यरात्र सरुन पहाट व्हायला सुरुवात व्हायची तसतशी थंडीची हुडहुडी वाढायला लागत असे. समुद्राच्या पाणी पहाटे थंडगार दुपार उलटली तरी गारच पण जसजशी संध्याकाळ उलटून रात्र होत असे तोपर्यंत समुद्राचे पाणी कोमट राहते. त्यामुळेच रात्रभर थंडी कमी आणि पहाटे पहाटे गारठवणारी होत जाते.
जानेवारी संपत आला की मांडव्याची बोरे पिकायला लागायची. शेताच्या बांधावर वेगवेगळ्या प्रकारची आणि चवीची बोरे पिकायला नुकतीच सुरुवात झालेली असायची. अर्धवट पिकलेली कच्ची पक्की पडलेली बोरे गोळा करायला चहा नाश्ता झाला की सगळेजण निघायचे. दुपारी भरपूर ऊन पडल्यावर मग सगळे समुद्रात पोहायला जायचे. दुपारी जेवायला येईपर्यंत समुद्राच्या गार पाण्यात तास दीड तास पोहलो तरी मन काही भरत नसायचे. घरात माघी गणपती असल्याने मीठ आणि मसाला लावलेली वांगी, बटाटे ,कांदे आणि अलीबागच्या सुप्रसिद्ध वालाच्या शेंगांची पोपटी संध्याकाळी लावली जायची. गरमागरम बटाटे आणि वालाच्या शेंगा खाऊन खाऊन रात्री कोणाची जेवायची पण इच्छा होत नसे. पोपटीची चवच अशी असते की नंतर काही खायची इच्छाच होत नाही. अलिबागमध्ये केवळ दवावर होणाऱ्या वालाच्या शेंगा खूपच चविष्ट असतात.
पुढे अकरावी बारावीला अलिबागमध्ये राहायला असताना जे एस एम कॉलेज मध्ये एडमिशन घेतली. हिराकोट तलावाच्या समोर असणाऱ्या गवर्नमेंट क्वार्टर मध्ये चार वर्षे राहायला मिळाले. थंडीत हिराकोट तलावाच्या पाण्यावर सकाळी सकाळी धुक्याची चादर ओढलेली दिसायची. त्या चादरेतून बाहेर डोकावणारे लाल आणि पांढरी कमळाची फुले आळस देत जागी होत असल्याचा भास व्हायचा. कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टरचा बंगला आणि त्या पलीकडून येणारे समुद्राची गार हवा सकाळी सकाळी वेड लावून जायची. हीराकोट किल्ल्याचे भक्कम बुरूज बघत बघत सकाळी सकाळी सायकल वर क्लासला निघाल्यावर अलीबागच्या तेव्हा अस्तित्वात असलेल्या नारळाच्या मनमोहक वाड्यांमधून डोकावणारे सूर्याचे सोनेरी किरण आजही नजरेसमोर येतात. अलीबागच्या एस टी स्टँड समोरील सार्वजनिक व्यायामशाळे बाहेरील बॉडी बिल्डरचा स्टॅच्यु हल्ली स्टॅण्डवरून दिसत नसला तरीपण त्या व्यायामशाळेत मार्गदर्शन करणारे नागावचे राणे सर आजही सगळ्यांच्या लक्षात असतीलच.
वरसोली च्या सुरूच्या बनात सकाळी सकाळी गेल्यावर अनुभवायला मिळणारे आल्हाददायक आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवताना एक वेगळाच फिल येतो. वड आणि आंब्यांच्या गर्द झाडीतून आणि नारळाच्या वाड्यांमधून जाणारे रस्ते सकाळी सकाळी धुक्या आड गेलेले बघताना जाणवणारा गारवा खूप हवाहवासा वाटतो.
प्रत्येक अलिबागकर रोजच अलीबागच्या गुलाबी कम जादुई थंडीचा अनुभव नक्कीच अनुभवत असेल.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply