नवीन लेखन...

विश लिस्ट

हॅलो .. ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर…  कॅन्सर वॉर्ड, हेड नर्स प्रमिला बोलते आहे ! मी आपली काय मदत करू शकते? ” फोनची रिंग वाजताच रिसीवर कानाला लावत नेहमीच्याच यांत्रिक पद्धतीने प्रमिला मावशींनी उत्तर दिलं… पण समोरून कोण बोलतंय हे समजताच तो यांत्रिक पणा नाहीसा झाला, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य पसरलं आणि अत्यंत प्रेमळ स्वरात त्यांनी विचारपूस केली ” अंजली? ?? कश्या आहात तुम्ही? ”

” हो हो… काल रात्रीच अविनाश सरांचा फोन आला होता, आणि सगळं साहित्य आज सकाळीच त्यांनी पाठवून दिलंय ..ऑफिस मधल्या माणसा सोबत..

काही काळजी करु नका… आम्ही सगळी तयारी करू… दुपारीच डेकोरेशन करून घेऊ…हो… वॉर्ड बॉय पण आहेत मदतीला…चालेल..!

नाही… केक तुम्ही आणणार असं अविनाश सरांनी सांगितलं, काका? ? ते ठीक आहेत ..आज जरा थकल्या सारखे वाटत आहेत, अहो काल किमो होती ना सहावी, मग त्रास होणारच !  बाकी सगळं ठीक आहे… या मग तुम्ही पाच वाजता … बाय ….गुड डे..”

असे संवाद झाले आणि फोन ठेवून प्रमिला मावशी वॉर्ड मध्ये राऊंड मारायला गेल्या …

मध्ये मध्ये बाकीच्या नर्स, वॉर्ड बॉय यांना सूचना देत होत्या, पेशंटस् ची विचारपूस करीत होत्या …! आणि मग चार वाजल्या पासूनच ..त्या खास वॉर्ड मध्ये सजावट सुरू झाली, फुगे …रिबिनी लावण्यात आल्या काही उत्साही मंडळींनी बर्थ डे पार्टीच्या त्रिकोणी टोप्या आणल्या होत्या … कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी निकराची लढाई करणाऱ्या या सगळ्या वीरांच्या… नेहमी सुतकी आणि गंभीर वातावरण असलेल्या या ” कॅन्सर वॉर्ड” मध्ये आज वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं, एक निराळा उत्साह जाणवत होता ..आणि त्याचं कारण ही सर्वांना ठाऊक होतं. वयाने सर्वात ज्येष्ठ, पण मनाने चिरतरुण असलेल्या सदा हसतमुख.. अंजली ने ‘ लाफिंग बुद्ध ‘ असं नाव पाडलेल्या ” मनोहर काकांचा ” वाढदिवस !! पाच वाजता तर तिथला उत्साह, ते चैतन्य अगदी शिगेला पोहोचलं होतं.. अविनाश, अंजली इतर चार पाच जण भला मोठा केक घेऊन तिथे आले ! बाकीचे पेशंट देखील मग मनोहर काकांच्या पलंगा भोवती गोळा झाले, आणि या खास प्रसंगासाठी आवर्जून निमंत्रित… मनोहर काकांचे खास मित्र आणि एके काळचे ऑफिस सहकारी जयवंत साने देखील तिथे आले …एक जण चाकू घेऊन आला . अंजली ने चटकन एक त्रिकोणी टोपी काकांच्या डोक्यावर ठेवली…काका किलकिल्या डोळ्यांनी तो केक पाहू लागले … औषधं आणि कीमो थेरपी यामुळे फु्फुसांच्या कॅन्सर ने ग्रस्त मनोहर काका आता थकून गेले होते पण स्वभावातला मिश्किल पणा व विनोद बुद्धी मात्र तशीच शाबूत होती….

” अरे काय रे हे? ?? फक्त केक आणलाय पोरांनो.. माझं गिफ्ट कुठाय? ” एक डोळा बारीक करीत ते गमतीने म्हणाले…

” काका… मी तर केक घेऊन आले बघा.. यांनीच गिफ्ट आणलं नाही ” काकांच्या लाडिक आरोपांना अविनाश कडे वळवत अंजलीने स्वतः ची बाजू मांडत सुटका करून घेतली.

” अहो काका… असं काही नाही हं….. मी ऑफिस मधून डायरेक्ट इकडं आलो बघा, त्यामुळे…. ” अविनाश स्पष्टीकरण देऊ लागला..

” अरे असू दे पोरांनो .. गंमत केली मी… कसलं गिफ्ट घेणार आता…” मनोहर काका म्हणाले..

” हां …. नो नो. तसं नाही बरं.. गिफ्ट नाही हे कोण म्हणलं?? तुमचं सर्वात स्पेशल गिफ्ट आज तुम्हाला मी देणार आहे आज …तुमच्या विश लिस्ट मधलं नंबर वन…. ” अतिशय प्रसन्न पणाने हसत …मनोहर काकांचे हात हातात घेत अविनाश म्हणाला..

” रियली? ? काय म्हणतोस? ? म्हणजे लंडन? ??खरं की काय?  आशुतोष चा फोन आला होता? ? ” प्रचंड अविश्र्वासाने मनोहर काका विचारते झाले. कित्येक दिवसात न दिसलेली एक वेगळीच चमक आत्ता त्यांच्या डोळ्यात दिसत होती… प्रमिला मावशी देखील आश्चर्याने पहात होत्या..

” येस… अगदी बरोबर ! यू आर गोईंग टू लंडन .. व्हिसा चं काम दोन एक दिवसात होईल ..आणि मग ” हाताने विमान हवेत उडाल्या सारखं दर्शवत अविनाश म्हणाला आणि काकांच्या चमकत्या डोळ्यात टचकन पाणी आलं….

” अरे पण मला फोन का नाही केला आशुतोष ने ..? साधं विश पण नाही केलं सख्खा मुलगा असून ” काका आता किंचित व्यथित झाले होते…

अविनाश ने गडबडून अंजली कडे पाहिलं आणि पुन्हा त्यांची गाडी रुळावर आणत म्हणाला ” अहो.. आला होता की फोन ..पण इथे हॉस्पिटल मधला फोन तिकडे लांब ..या प्रमिला मावशी च्या डेस्क वर.. शिवाय तुम्ही झोपला होता…मग तिथे कसे जाणार? म्हणून मग माझ्या मोबाईल वर केला होता फोन त्याने …. थांबा मी त्याला करतो फोन..बोला तुम्ही ” असं म्हणत अविनाश ने खिशातून फोन काढला…

” हो रे त्या मेल्या इंजेक्शन ने झोप फार येते..” चुटपुट करीत काका उत्तरले..

अविनाश ने फोन लावून दिला आणि मनोहर काका बोलू लागले….. आता बोलताना त्यांना दम लागत होता… आवाज कापरा होत होता…” व्यवस्थित ऐकू येतं नाही रे !! नेटवर्क कमी आहे का पहा जरा ” असं म्हणत फोन पुन्हा अविनाश कडे दिला…आणि सर्वांसमक्ष शर्ट च्या बाहीला डोळे पुसले..

आता पुन्हा वातावरण बदल आवश्यक होता..कारण सगळेच जरासे भावनावश झाले होते..मग अंजली ने सूत्रं हातात घेतली ” काका बास झाली रडारड .. लाफिंग बुध्द हसतानाच बरा वाटतो…केक कापा बघू आता ..खूप भूक लागली आहे ” आणि मस्त पैकी हश्या पिकला तिथे..

काका ही मग हसत हसत चाकू घेऊन केक कापण्यासाठी सज्ज झाले..

पण तेव्हढ्यात अविनाश ….अंजलीला चिडवत मिश्किल पणाने म्हणाला …

” हे बघा काका… ह्या अंजली ने केक वर लावलेल्या मेणबत्ती चा आकडा… बहात्तर…!

??? अंजली… काका काय एव्हढे म्हातारे वाटतात तुला? ? आणि पुन्हा एकदा सगळी मंडळी हसायला लागली…

” अरे त्यात काय अविनाश… एज इज जस्ट अ नंबर… हे पहा ” असं म्हणत गालातल्या गालात हसत काकांनी सात आणि दोन या आकड्यांच्या मेणबत्त्यां ची आदला बदल केली आणि तिथे सत्तावीस चा आकडा तयार झाला…

आणि सर्वांनी जोरदार हसत टाळ्या वाजवल्या… शिट्ट्या मारल्या…हॅप्पी बर्थडे च गीत गायलं गेलं …

आणि एका वेगळ्याच उत्साहात …ती जगा वेगळी पार्टी पार पडली सात सव्वा सात ला पांगापांग झाली… अंजली व अविनाश हॉस्पिटल मधून बाहेर पडले, प्रमिला मावशी नेहमी प्रमाणेच डेस्क वर पोहोचल्या ….आणि तो वॉर्ड पुन्हा एकदा मूळ स्वरूपात आला.

शांत .. स्तब्ध !!!

त्यानंतर साधारण आठवड्या भराचां कालावधी लोटला असेल.. दरम्यान एकदा अविनाश हॉस्पिटल मध्ये जाऊन मनोहर काकांवर उपचार करणाऱ्या डॉ. परांजपे ना भेटून काकांच्या विमान प्रवास करण्याच्या क्षमते बद्दल चाचपणी करून आला होता..

.रात्री उशिरा ….. अर्थात मध्यरात्री सुमारे अडीच वाजता अविनाश चा मोबाईल खणखणला.. डोळे चोळत त्याने स्क्रीन वर पाहिलं तर ” प्रमिला मावशी – ग्लोबल ” हा नंबर झळकला. त्याला एकदम आठवलं की ‘ या आठवड्यात प्रमिला मावशींची नाईट शिफ्ट आहे ‘ क्षणभर डोळे मिटून त्याने कॉल उचलला…आणि बाकी काहीही न बोलता शांतपणे विचारलं ” हां मावशी …किती वाजता? ”

याला काय एखादं कर्ण पिशाच्च वगैरे तर वश नाही ना? असं वाटून प्रमिला मावशी एकदम दचकून म्हणाल्या… ” दहा मिनिटं झाली सर…पण, पण तुम्हाला कसं…..? ”

त्यावर शांतपणाने अविनाश ने उत्तर दिलं ” अहो साहजिक आहे मावशी..रात्री अडीच तीन वाजता तुम्ही काही ख्यालखुशाली विचारायला तर फोन नाही ना करणार? आणि इन्फॅक्ट बुधवारी डॉ परांजपेनी मला तशी कल्पना दिली होती काकांबद्दल, एनी वे ..आम्ही निघतोच ” आणि त्यानंतर शार्प पंचविसाव्या मिनिटाला, ग्लोबल हॉस्पिटल च्यां पार्कींग स्लॉट मध्ये गाडी पार्क करून अविनाश आणि अंजली आत जात होते, लिफ्ट ची वाट न पाहता झरझर पायऱ्या चढून ते वर गेले..

मनोहर काकांच्या पार्थिवा भोवती नर्सेस, ऑन ड्युटी डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी उभे होते, अविनाश आणि अंजलीला पहाताच प्रमिला मावशी चटकन पुढे आल्या ..

” आज सकाळ नंतर त्यांनी काहीच खाल्ल नव्हतं ! गोळ्या, इंजेक्शन काही नको म्हणाले .. या तुमच्या इंजेक्शन मुळे मला झोप लागत नाही ! आज मला एकदम गाढ झोपायच आहे …अशी तंबीच स्टाफ ला देऊन टाकली होती त्यांनी ” रुमालाने डोळे पुसत प्रमिला मावशी सांगत होत्या….

मनोहर काकांचा कॅन्सर आता ” बियोंड क्युअर ” झाला होता हे.  डॉ परांजपेनी सांगून टाकलं होतच.. पण अर्थात एखाद्याचा मृत्यू हा किती ही गृहीत किंवा पूर्व कल्पित असला तरीही जात्या जीवाचा वियोग हा नेहमीच चटका लावून जाणारा असतो… तसच अवघ्या दीड दोन महिन्यांच्या ऋणानुबंधा नंतर या हसतमुख मनोहर काकांचं जाणं धक्कादायक नसलं तरी ही चटका लावून जाणारं नक्कीच होतं….

पण आतून प्रचंड वेदना सोसणाऱ्या या अंजली च्या ” लाफिंग बुद्धाच्या ” चेहऱ्यावर मात्र आत्ता ही ते तसच मिश्किल स्मित दिसत होतं..ते पाहून डोळ्यात पाणी तरारालं असलं तरीही अंजलीच्या ओठांवर नकळत एक वेगळच स्मित उमटलं….

हॉस्पिटल चे सगळे सोपस्कार उरकून सकाळी सात वाजता अंतिम विधी साठी पार्थिव ‘ वैकुंठ ‘ ला न्यायचं ठरलं…

त्या प्रमाणे मग अंॅबुलन्स च्या पाठोपाठ ..जाण्यासाठी अविनाश आणि अंजली गाडीत बसले तेव्हढ्यात युनिफॉर्म बदलून प्रमिला मावशी आल्या ” सर मी पण येते…तुमच्या सोबत ”

” नो प्रोब्लेम मावशी .आम्ही मॅनेज करू…ऑफिस मधल्या चार पाच जणांना मी तिकडे बोलावलंय…” अविनाश त्यांना समजावत म्हणाला..

” तसं नाही सर..पण काकांसाठी तुम्ही जेव्हढं केलंय ..आणि करताय ते मला नसेल जमलं पण निदान त्यांच्या शेवटच्या प्रवासात तरी….. ”

” ओह् !! सॉरी ….ठीक आहे मावशी …. बसा….” त्यांच्या साठी कारचा दरवाजा उघडत अविनाश म्हणाला….आणि गाडी सुरू केली थोडा वेळ एक विचित्र जीवघेण्या शांततेत गेल्या वर प्रमिला ताई बोलू लागल्या…

” अविनाश सर, अंजली सध्याच्या युगात कोणी सख्ख्या आई बापासाठी जेवढं करीत नाही तेवढं तुम्ही काकां साठी केलं…

तुमच्या मुळे शेवटचे काही दिवस तरी ते आनंदात आणि समाधानात जगले… लंडन ला जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं खरं पण मनातून मात्र ते कधीच ती हवाई सफर करून आले होते…” त्यावर गाडी चालवत चालवत ..किंचित हसून अविनाश ने उत्तर दिलं ” अहो ते कामच आहे आमचं …आणि आपल्या छोट्याश्या कृतींनी एखाद्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एखादं स्मित उमटलं तर ती किती मोलाची गोष्ट..?”

कधी मनोहर काका ..तर कधी एखाद्या यशोदा काकू… नाही तर मग ते इरफान चाचा किंवा आठ वर्षांचा प्रतीक असेल…..

प्रमिला मावशी ..अहो मनोहर काकांनी आयुष्य भर बँकेत इमाने इतबारे चाकरी केली, आयुष्य उत्तरार्धात… मनासारखं जगता यावे या साठी व्ही आर एस घेतली .. सगळं कसं ठीक चालू होतं, एकुलता एक मुलगा आशुतोष इंग्लंड मध्ये नोकरीस गेला तो तिकडेच स्थायिक झाला कायमचा ! बरं “मी एकदा स्थिर स्थावर झालो की मग तुम्हाला दोघांना तिकडे बोलावून घेतो…”  या त्याच्या वचनाला भुलून काकांनी आयुष्य भराची जमापुंजी त्याला देऊन टाकली आणि मग कधी नोकरी मुळे ..तर कधी सुट्टी नाही मिळत… अशी टोलवाटोलवी करून त्याने मनोहर काकांना झुलवत ठेवल…काकांनी हे सगळं पण त्यांच्या स्वभावानुसार हसत खेळत सहन केलं…

कदाचित त्यांना स्वतः सोबत घेऊन जाणारा कॅन्सर देखील त्यांनी त्या मानाने सहज पचवला, पण खऱ्या अर्थाने ते तुटले …. खचले ते दहा वर्षांपू्वी ..जेव्हा त्यांची अर्धांगिनी…सोबती व आधार असलेल्या प्रभा काकू अचानक त्यांना या जगात एकटं सोडून गेल्या तेव्हा… हा धक्का मात्र तर काही पचवू शकले नाहीत… कॅन्सर तर एक निमित्त होतं, पण हे एकटेपण त्यांना आतून पोखरत होतं… पण कधी तरी आशुतोष मला लंडन ला घेऊन जाईल या आशेवर ते शेवटच्या घटका मोजत होते … लंडन दौरा ही त्यांच्या विश लिस्ट मधील टॉप विश होती….

हे सगळं ऐकून प्रमिला मावशी स्तब्ध झाल्या.. आणि पुन्हा एकदा गाडीत ती जीवघेणी शांतता.

” अहो पण त्या दिवशी तर आशुतोष..म्हणजे त्यांच्या मुलाशी ते बोलले ना..त्यांच्या वाढ दिवशी? ” प्रमिला ताईंनी आश्चर्य वाटून शांतता भंग करीत प्रश्न केला . अंजली आणि अविनाश नी एकमेका कडे पाहिलं आणि या वेळेस अंजली ने त्यांचं शंका निरसन केलं ” आता काय सांगणार मावशी..?. काकांना थोडं कमी ऐकू येतं याचा गैर फायदा आम्ही घेतला आणि तोही त्यांना वाईट वाटू नये म्हणून ….” पण अजून ही प्रमिला मावशी च्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह कायम होतं…

” म्हणजे? मला नाही समजलं ” त्या विचारत्या झाल्या…

” अहो आशुतोष गेले कित्येक वर्ष त्यांच्याशी बोलला नाहीये.. इन फॅक्ट आमच्या कडे त्याचा नंबर पण नाहीये …

आशुतोष म्हणून आमच्या ऑफिस मधला संदीप त्यांच्या शी बोलला…त्या दिवशी !!! त्यांना जरा बरं वाटलं …. बस् तेव्हढाच काय तो हेतू होता..” अविनाश ने उलगडा केला… आता गाडीत मागच्या सीट वर मान मागे टेकवून प्रमिला ताई विचार करू लागल्या….आणि म्हणाल्या ” अविनाश… अंजली धन्य आहात तुम्ही ..अतिशय पुण्याचं कार्य करीत आहात … पण हे सगळं तुम्ही कसं करता…??

आय मीन स्वतः चे नोकरी…व्यवसाय हे सगळं सांभाळून.. कसं जमवता हे? ???

बरेच दिवस मनात असलेलं कुतूहल शमावण्याचा प्रयत्न करीत प्रमिला ताईंनी विचारलंच….

” मावशी..अहो प्रत्येक व्यक्ती च्या मनात काही सुप्त इच्छा असतातच .. बस त्याची तीव्रता प्रत्येकाच्या स्वभावा नुसार कमी जास्त असते ..आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू डोळ्या समोर दिसत असतो… तेव्हा हातात शिल्लक राहिलेल्या किंवा मग हातातून निसटून जाऊ पाहणाऱ्या मोजक्या क्षणात त्याला खूप जगायचं असतं..” विश लिस्ट ” मधील टॉप विश पूर्ण करायची असते…. आणि ती जर पूर्ण झाली तर ते सुख .. तो आनंद डोळ्यात साठवून … मृत्यूच दुःख थोडस हलक करून तो या जगाचा निरोप घेतो….

आणि हेच कार्य करण्या साठी आम्ही ही संस्था स्थापन केली आणि त्याला नाव दिलं ” विश लिस्ट अनलिमिटेड ” …. आमच्या या संस्थेत कोणी कोणाचा बॉस नाही आणि कोणी कोणाचा नोकर नाही … कोणी पगार मागत नाही अन् कोणाला फायर केलं जात नाही….उलट कधी तरी स्वतः च्या खिशातून पैसे द्यावे लागतात तर कधी काही दानशूर व्यक्ती… सामाजिक संस्था ..आर्थिक मदत देतात… आपापले नोकरी..व्यवसाय आणि संसार सांभाळून ..अर्धा शनिवार व रविवार ह्या कार्या साठी आम्ही सगळे वाहून देतो…

मग वेगवेगळ्या हॉस्पिटल किंवा संस्था अथवा व्यक्तींकडून .. कॅन्सर, थॅलेसेमीया…सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त काही रुग्णांबद्दल माहिती आम्हाला मिळते …आणि मग जमेल तसं या रुग्णांची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो…

अशीच सगळी ही  ध्येय वेडी मंडळी म्हणजे आमचं भांडवल आणि ह्या मृत्यू शय्येवर पहुडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य आणि आशीर्वाद हे आमचे बोनस आणि प्रॉफिट !!!  मग आम्ही एका यशोदा मोहिते काकूंना शेवटची इच्छा म्हणून काश्मीर ला नेऊन आणलं…तर कॅन्सर च्या माऱ्या पुढे क्लीन बोल्ड होण्या आधी प्रतीक या लहान मुलाला चक्क सचिन तेंडुलकर ची भेट घडवली…

इरफान शेख आयुष्य भर मक्का मदिना जाण्यासाठी झुरत होते त्यांची ती सोय करून दिली आणि त्या हज यात्रे हून परतत असतानाच त्यांनी विमानात प्राण सोडले…

असे अनेक प्रसंग … अनुभव गाठीशी आहेत……मावशी एखाद्याच्या मृत्यू नंतर ते पिंडाला कावळा शिवणे वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही.. अहो त्या पेक्षा जिवंत पणी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना? ?”

अविनाशचं हे सगळं बोलणं ऐकता ऐकता वैकुंठ च्या कमानीतून गाडी आत कधी शिरली हे समजलच नाही…

मग तिथले सगळे विधी संपवून परत निघे पर्यंत नऊ वाजून गेले होते…सगळेच थकले होते… प्रमिला मावशींना त्यांच्या घरी सोडून अविनाश आणि अंजली पुढे गेले… अर्थात तो पर्यंत हे सगळं अचाट ऐकुन त्यावर कस व्यक्त व्हायचं ? हे प्रमिला मावशींना समजत नव्हतं…त्या शांत पणाने घरी गेल्या…

मग शांती निकेतन कॉलनीत कुंदन अपार्टमेंट च्या गेट पाशी .. म्हणजे अंजलीच्या घरापाशी गाडी थांबली…..आणि तिला निरोप देता देता अविनाश म्हणाला ” बाय अंजली… सी यू..

आणि हो !! आज ऑफिस ला नाही आलीस तरी चालेल…. शनिवार असला तरीही….. ”

” पण अविनाश….” अंजली च वाक्य पूर्ण होण्या आधीच अविनाश हसून म्हणाला ” आय नो… आज तुमची वेडिंग अनिव्हर्सरी आहे… एन्जॉय युवर डे आणि राघव ला पण शुभेच्छा सांग . माझ्या कडून..” ” थॅंक यू …. इन फॅक्ट आय सजेस्ट ..इथ पर्यंत आला आहात तर वर चला …मस्त कॉफी करते ..यू रीयली निड वन कॉफी ..

आणि राघव पण घरीच आहे …त्याच्या शी ही भेटणं होईल… प्लीज… ! ” अंजली आग्रह करीत म्हणाली..

” धन्यवाद या आमंत्रणा साठी …पण आज नको… मी असाच थोडा वेळ ऑफिस मध्ये जाऊन जरा बसणार आहे…मुक्तांगण संस्थेचे पराडकर येणार आहेत… आणि नंतर ‘ होम मिनिस्टर ड्युटी….’ रेल्वे स्टेशन ला जायचयं …सासू बाई यायच्या आहेत…

” चेहऱ्यावर खोटे खोटे रडू दाखवत अविनाश म्हणाला आणि दोघे ही खळखळून हसले…..

दुसरे दिवशी रविवार …. बऱ्याच दिवसांनी ” विश लिस्ट अनलिमिटेड ” ची जवळ जवळ सगळी टीम ऑफिस मध्ये जमली होती, काही नवीन केसेस आल्या होत्या त्यावर चर्चा सुरू होती तेव्हढ्यात …अविनाश आणि अंजली ची चौकशी करत जयवंत साने काका तिथे आले ..आणि गळ्यातल्या शबनम पिशवी तून एक पाकीट काढून अविनाश कडे सोपवले ” काय आहे हे काका? ” ते पाकीट न्याहाळत अविनाश ने विचारलं ” अहो… तीन दिवसांपूर्वी मनोहर ने मला दवाखान्यात बोलावून घेतलं, त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून आता मात्र त्याने कॅन्सर समोर शस्त्र म्यान केली होती हे समजलं होतं… ” येताना माझं चेक बुक पण आण रे जया ” अशी सूचना ही केली होती…

मग दोन चेक फाडून सही करून माझ्याकडे देत तो म्हणाला ” हा चेक ठेव … माझा दवाखान्याचा खर्च यातून दे …आणि हा दुसरा चेक अविनाश ..अंजली च्या संस्थेला देऊन टाक …माझ्या वाढदिवसाच्या पार्टीचे रिटर्न गिफ्ट रे ! ..असो.. माझी लंडन वारी तर अवघड दिसत्ये आता..पण या पैशातून दुसऱ्या कोणाची तरी.  ” विश ” पुरी करा म्हणावे…” तो चेक हातात घेऊन अविनाश ने पाहिलं आणि आश्चर्याने त्यानें डोळे मोठे केले…

पाच लाखाची रक्कम त्यात लिहिली होती…

बाकी अश्याच आशिर्वाद आणि ऋणानुबंध यांच्या भांडवलावर ” विश लिस्ट अनलिमिटेड ” चे काम व्यवस्थित चालू होते .

आणि नंतर असच पुढील शनिवारी संध्याकाळी ही सगळी टीम ऑफिस मध्ये बसली असताना …. प्रीतम आणि संदीप आले त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते….

” काय रे बाबांनो ..काय झालं? तुम्ही शाश्वत हॉस्पिटल ला जाणार होतात ना? ..”

त्यांचे चेहरे न्याहाळत अविनाश ने विचारलं ” होय सर … तिकडूनच येतोय आम्ही…” प्रीतम ने उत्तर दिलं.. तो तसा नवखा होता या संस्थेत…

” सर आम्ही त्या रागिणी देसाई काकूंना भेटलो ! चार दिवसांपूर्वीच तिसरा अटॅक येऊन गेलाय त्यांना ! एक वॉल्व पूर्ण कामातून गेलाय … शिवाय स्थूल पणा आणि मधुमेह आहेच …हृदय फक्त पंचवीस टक्के क्षमतेने कार्य करतय.”

प्रीतम ने धडाधड अहवाल सादर केला..

” ओह.. सो सॅड ! ” चुटपुट व्यक्त करीत अविनाश ने विचारलं…

” मग काय विश आहे त्यांची? ” ” जरा अवघड आहे सर ” भाबडे पणाने प्रीतम म्हणाला तसं सगळ्यांनी त्याच्या कडे रोखून पाहिलं….

” अरे सांग तरी…” अविनाश ने अधीर पणे विचारलं..

” सर त्या म्हणताहेत .. हवं तर मी माझा सगळा बँक बॅलन्स .. राहतं घर तुमच्या नावे करते पण मरण्या पूर्वी मला ” त्यांच्या ” सोबत डिनर डेट वर जायचयं ….”

वातावरणात अजून ही सस्पेन्स कायम होता..

” पण कोणासोबत डिनर डेट वर जायचयं त्यांना? ” आता अंजली ला राहवेना….

सगळ्यांची तोंड आळी पाळीने पहात प्रीतम शांत पणे उत्तरला .

” सुपरस्टार रजनीकांत सोबत “….

Avatar
About सागर जोशी 11 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..