आज सकाळीच सोसायटीच्या मैदानावर, झेंडावदनाची तयारी चालू झालेली दिसली. ते पाहून मला माझे शाळेचे दिवस आठवले. पहिली ते चौथी, मी सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेत होतो. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला, सकाळी सात वाजता गणवेशामध्ये झेंडावंदन होत असे. कार्यक्रम संपल्यावर मुलांना चाॅकलेट्स वाटली जात असत. शाळेच्या फाटकातून बाहेर पडताना. झेंडे, खिशाला लावायचे बॅज, झेंड्याची भिरभिरं विकणारे उभे असायचे. घ्यायची इच्छा असूनही खिशात पैसे नसायचे. मन खट्टू व्हायचं.
पाचवी ते दहावी मी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडला होतो. आदल्या दिवशी गणवेशाची व्यवस्थित घडी घालून ती चादरी, सतरंज्यांच्या वजनाखाली ठेवली जायची. सकाळी तो गणवेश घालून मी धावत पळत शाळा गाठत असे. जानेवारीत थंडी वाजत असे. आमचे पीटी चे भागवत सर, सावधान-विश्रामच्या सूचना देऊन सर्वांना रांगेत उभे रहायला सांगत. ‘जण गण मन.’ झाल्यावर खाऊ वाटप होत असे. त्या दिवशी दांडी मारली तर दुसरे दिवशी वडिलांची, पाल्य न येऊ शकल्याबद्दलची चिठ्ठी द्यावी लागत असे.
शाळा झाल्यावर काॅलेजलाही झेंडावंदन असे. पुढे काही २६ जानेवारी, १५ ऑगस्ट तसेच गेले. मुलगा शाळेत जाऊ लागल्यावर पुन्हा आठवणींना उजाळा मिळत गेला. त्याला झेंडा घेऊन देऊ लागलो. बॅज घेतला. गणवेशला कडक इस्त्री करुन देवू लागलो.
एका २६ जानेवारीला तो जाऊ शकला नाही, म्हणून दुसरे दिवशी वर्गशिक्षकांना चिठ्ठी दिली. त्याचं काॅलेज सुरु झालं. २६ जानेवारी, १५ ऑगस्टला तो पांढऱ्या झब्बा-कुर्त्यात जाऊ लागला.
एव्हाना सोसायटीच्या मैदानात मुलं, मुली, पालक जमू लागले होते. लाऊड स्पीकरवर देशप्रेमावरची हिंदी-मराठी गाणी लावली जात होती. ‘सिकंदर ए आझम’ चित्रपटातील ‘जहाॅं डाल डालपर सोने की चिडिया करती है बसेरा. वो भारत देश है मेरा.’ गाणं लागल्यावर, मला न्यू इंग्लिश स्कूलचं स्नेह-संमेलन आठवलं. ‘है प्रीत जहाँ की रित सदा.’ हे ‘पूरब और पश्र्चिम’ चित्रपटातील गाणं ऐकल्यावर, मनोज कुमारबद्दल अभिमान वाटू लागला. या एकाच निर्माता-दिग्दर्शकाला देशप्रेमावर चित्रपट काढण्याची आस होती. भगतसिंगवरचा ‘शहीद’, ‘उपकार”, ‘पूरब और पश्र्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ या चित्रपटांच्या माध्यमातून त्याने देशप्रेम व्यक्त केले. या चित्रपटांतील गाणी ऐकली की, अंगात स्फुरण चढतं. ‘उपकार’ मधील ‘मेरे देश की धरती.’ गाण्यातील जेव्हा ‘रंग लाल है, लाल बहादूर से.’ या ओळीला लाल बहादूर शास्त्री पडद्यावर दिसले की, नकळत हात जोडले जातात.
‘हकीकत’ मधील ‘घर चले हम फिदा, जाने तन साथियों.’ हे शब्द कानावर पडले की, भारत-चीनची युद्धभूमी आठवते. चेतन आनंदचा हा चित्रपट अविस्मरणीय आहे.
‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.’ हे घरकुल चित्रपटातील गाणे लागल्यावर, मला माझं लहानपण आठवलं. गदिमांचे शब्द, सी. रामचंद्र यांचं संगीत. दोन कडव्यांमधील, ड्रमसह बासरीवर जी ट्यून वाजवलेली आहे, तिला तोड नाही.
‘जयो स्तुते, जयो स्तुते.’ हे गीत ऐकताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी जी काही शब्दरचना केलेली आहे ती ऐकून, भारत देशात जन्म घेतल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
एकापाठोपाठ गाणी मी ऐकत होतो. मन प्रसन्न झालं होतं. झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. तासाभराने सर्वजण आपापल्या घरी निघून गेले.
वर्षातील या दोनच दिवशी, देशभरात, देशप्रेम जागृत होते. आज स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊन गेली. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले, त्यांची पुढची पिढीही नामशेष झाली. आता देश प्रगतीपथावर न्यायचा आहे तर राजकारण्यांनी गोंधळ घातलेला आहे.
शहरातील पुलाखाली रहाणारी कुटुंबं, या दोन दिवसांत रस्तोरस्ती झेंडे विकताना दिसतात. सिग्नलला थांबलेल्या कारच्या काचेवर टकटक करुन झेंडा विकत घेण्याची विनंती करतात. एखादाच झेंडा घेतो. बाकीचे त्यांना झिडकारतात. खरंच आपला राष्ट्रध्वज इतका नकोसा वाटतो का? लहानपणी त्याच्याचसाठी हट्ट केलेला तो कारवाला, सिग्नल पडण्याची वाट पहात असतो.
मी मात्र कधीही एखाद्या शाळेसमोरुन जाताना. जर राष्ट्रगीत सुरु झालेलं असेल तर माझी पावलं, नकळत थांबतात.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-१-२२.
Leave a Reply