मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील एक प्रतिक्रिया श्री. किशोर मांदळे यांची आहे .
( टीप : मोरे यांच्या लेखातील मुद्द्यांचा व त्यावरच्या विविध प्रतिक्रियांमधील मुद्दयांचा परामर्श मी एका वेगळ्या दीर्घ लेखात केलेला आहे. ज्यांना तो वाचण्यात रस असेल, त्यांना मी तो पाठवूं शकेन).
मांदळे यांचा एक मुद्दा फुलपाखरासंसबंधी आहे. इथें आपण त्याचा परामर्श घेत आहोत.
- ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं’ असें दुर्गा भागवत यांनी म्हटल्याचें सांगून मांदळे यांनी संस्कृतवर टीका केलेली आहे.
- ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला स्वतंत्र शब्द नाहीं’ असें कदाचित दुर्गा भागवत यांना अभिप्रेत असावें.
- एक गोष्ट नक्की. संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं हें logically सर्वथैव असंभव आहे. एखादी गोष्ट जर भारतात नसेलच, तर तिला संस्कृमध्ये शब्द नाहीं, हें बरोबर आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील कांगारू, एमू वगैरे प्राणी भारताताच काय, पण जगात इतरत्र कुठेही उपलब्ध नाहींत. त्यामुळे, संस्कृतच काय, पण जगातील इतर कुठल्याही भाषेत त्यांच्यासाठी शब्द नाहीं, सगळे जण त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियातील local शब्दच वापरतात. पण, फुलपाखराचें तसें नाहीं. तें तर भारतात उपलब्ध आहेच. तर मग, त्यासाठी संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये शब्द असणारच.
- मांदळे यांच्या मुद्द्याला वि.शं. ठाकर यांच्यासारख्या ‘Marathi-Marathi-English Thesaurus’ या अतिउपयुक्त ग्रंथाच्या विद्वान रचयित्यानें उत्तर दिलें , व फुलपाखराला ‘चित्रपतंग’ असा शब्द आहे, हें सांगितलें आहे. (लोकसत्ता, दि. २१ मे) . त्यांनी संदर्भ दिलेला आहे तो, व्ही. एस. आपटे यांच्या (इंग्लिश-संस्कृत) डिक्शनरीचा. आपटे यांच्या डिक्शनर्या गेली सव्वाशे वर्षें, या विषयाचें ‘बायबल’ म्हणून ओळखल्या जातात. इतिहासाचार्य राजवाडेही भाषाशास्त्रीय विवेचन करतांना आपटे यांच्या (संस्कृत-इंग्लिश) डिक्शनरीचे संदर्भ देतात.
- मला असलेल्या माहितीनुसार, फुलपाखराला संस्कृतमध्ये ‘पतंग’ हा शब्द आहे, व, ‘प्रजापति’ हाही शब्द आहे.
आपटे यांच्या ‘संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी’त, ‘पतंग:, पतंगम:, पतंगिका, पतंगिन्’ असे जे वेगवेगळे शब्द आहेत, त्यांतून Moth , एक लहान Bee , एक लहान पक्षी, grass-hopper वगैरेंचा बोध होतो, व butterfly हा अर्थ ध्वनित होतो. (याबद्दल आणखी थोडेसें, ज़रासें पुढे). - ठकार यांचें म्हणणें आहे की, आपटे यांच्या ‘इंग्लिश-संस्कृत डिक्शनरी’त ‘चित्रपतंग’ हा शब्द आहे. तें योग्यच असणार.
पण, आपटे यांच्या ‘संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी’मध्ये चित्रपतंग हा शब्द नाहीं. कदाचित तो कांहीं कारणानें राहून गेला असेल. - तसेंही,‘चित्रपतंग’ म्हणजे एका विशिष्ट टाइपचा ‘पतंग’च. त्यामुळे, पतंग व चित्रपतंग या दोन्ही शब्दांमध्ये समन्वयच आहे.
- गुजरातीमध्ये फुलपाखराला (butterfly) ‘पतंगियुं’ [म्हणजेच , संस्कृत पतंगिन् (पतंग) ] हा शब्द आहे. संदर्भ : ‘Gala’s Pocket Dictionary : English-Gujarati’ .
- हिंदीमध्ये फुलपाखराला ‘तितली’ म्हणतात, ‘तित’ हा शब्द, संस्कृत ‘तत्र’ या शब्दपासून निघाला आहे, असें प्रामाणिक हिंदी शब्दकोशाचे रचयिते सांगतात. यावरून असें दिसतें की, ‘तितली’ म्हणजे, ‘सारखें इत-तित, यत्र-तत्र, इथें-तिथें, इकडे-तिकडे जाणारें / उडणारें (लहान पाखरू)’ .
हिंदीत आणखी दोन general शब्द दिसतात , ‘फतिंगा व ‘पतंगा’. त्याचा उगम, अर्थातच, संस्कृत ‘पतंग’ हाच आहे, (व तसाच अर्थ शब्दकोशातूनही निघतो). - ‘Bhargava’s Dictionay : English-Hindi’ आणि ‘बृहत् भारतीय प्रामाणिक हिंदी कोश’ या दोन शब्दकोशांचें सहाय्य घेऊन ‘खणत’ गेलें तर, ‘पतंग’ या शब्दापर्यंत आपण पोचतो.
- ‘Bhargava’s Dictionay : English-Hindi’ हा शब्दकोश हिंदीतील आणखी एक शब्द देतो, ‘प्रजापति’.
- बंगालीतही फुलपाखराला ‘प्रजापति’ म्हणतात. अर्थातच, ‘प्रजापति’ हा संस्कृत शब्द आहे.
- मात्र, आपटे यांची डिक्शनरी ‘प्रजापति’ या शब्दाचा फुलपाखरू असा अर्थ डायरेक्टली देत नाहीं. तिथें अन्य बरेच अर्थ दिलेले आहेत.
- मराठीतील शब्द बघतांनाही संस्कृतचा प्रभाव दिसतो. संस्कृतमध्ये ‘फुल्ल्’ म्हणजे ‘फ्लॉवरिग’ व ‘ब्लॉसम्ड्’. त्यावरून फूल शब्द आला आहे. (प्रफुल्ल हा शब्द आठवावा. किंवा, ‘वंदे मातरम्’ या गीतातील, ‘फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्’ ही ओळ पहावी ).
- पाखरू हा शब्द ‘पक्षालु’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे.
[ पण, फुलपाखरू हा शब्द त्यामानानें आधुनिक वाटतो. यादवकालीन (ज्ञानेश्वरकालीन ) मराठीत हाच शब्द आहे की कांहीं अन्य, तें बघायाला हवें ] . - दुर्गाबाईंचा मुद्दा असा असावा की, moth, butterfly, grass-hopper वगैरेंसाठी संस्कृतमध्ये एकच शब्द ( ‘पतंग’ ) कां ? भिन्नभिन्न शब्द कां नाहींत ? (‘प्रजापति’ हा शब्दही इतर अन्य गोष्टींसाठी वापरला जातो) .
- पण , अशी उदाहरणें आपल्याला अन्य भाषांमध्येही सापडतात. मराठीच घ्या. फुलपाखरू म्हणजे एक विशिष्ट प्रकारचें पाखरू. मधमाशी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची माशी. गांधिलमाशी म्हणजेही एक अन्य प्रकारची माशीच. इंग्रजीतील butterfly म्हणजे एक विशिष्ट तर्हेची Fly (माशी).
- संस्कृतमध्ये व संस्कृतोद्भव मराठीसमान प्रादेशिक भाषांमध्ये , भुंग्याला , भ्रमर, मधुकर, मधुप, वगैरे एकाहून-अधिक भिन्नभिन्न शब्द आहेत. मराठीत भुंगा, हिंदीत भौंरा, असे additional (derived) शब्दही आहेतच. पण इंग्रजीत त्याला Bee असेंच म्हणतात, त्याला वेगळा शब्द नाहीं. खरें तर, भुंगा म्हणजे एक विशिष्ट प्रकारची Bee च आहे.
म्हणून, संस्कृतमध्ये ‘पतंग’ हा शब्द वेगवेगळ्या जीवांसाठी, (आणि सूर्यासाठीही ), वापरत असल्यास कांहीं बिघडत नाहीं. (आणि, ठकारांनी ‘चित्रपतंग’ हा विशेष शब्द तर दिलेलाच आहे).
तसेच ‘प्रजापति’ शब्दाचेंही आहे.
फुलपाखराबद्दल शब्द पहातांना, उत्तरेकडील व पूर्वेकडील कांहीं अन्य प्रादेशिक भाषांमध्येही डोकावूं या.
– पंजाबीत फुलपाखराला ‘तितली’ म्हणतात.
– ‘डोगरी’ भाषेतही फुलपाखराला तितलीच म्हणतात.
(या दोन भाषांतील शब्दांवर हिंदीचा प्रभाव स्पष्ट दिसतो).
– सिंधीमध्ये फुलपाखराला ‘पतंग’ किंवा ‘पोपटु’ / ‘पोपट’ म्हणतात.
(पोपट हा शब्द मराठीजनांना माहीत आहे ; मात्र त्याचा मराठीत अर्थ आहे ‘पॅरट्’. गुजरातीमध्येही हाच अर्थ आहे. (संस्कृतमधील, ‘शुक’ ). मात्र. पॅरट काय अन् फुलपाखरू काय, दोन्हीही ‘उडणारे जीव’च आहेत.
-उडियामध्ये ( बंगालीप्रामणेंच ) ‘प्रजापति’ म्हणतात.
दक्षिणी भाषांमध्ये पहा :
-तमिळमध्ये फुलपाखराला म्हणतात ‘पत्तामपूची’ ( Pattaampoochee ).
Pattaam : Honour ; Silky or Beautiful . Poochee : Insect.
(‘पूची’ या शब्दाचें संस्कृत ‘पुच्छ’ या शब्दाशी साम्य आहे ; पण त्यापासून पूची शब्द आला असेल काय, याची कल्पना नाहीं . तमिळ शब्दाची इटिमॉलॉजी पाहिल्यावरच तें कळूं शकेल).
– कन्नडमध्ये फुलपाखराला ‘पात्रिहित्ती’ म्हणतात. ‘पात्रि’ शब्दाचा उगम संस्कृत ‘पात्र’पासून असूं शकेल. ( संस्कृतमधील ‘पात्र’ चा एक अर्थ आहे : Worthy ) .
-तेलगुमध्ये फुलपाखराला ‘सीताकोकाचिलुक/का’ असा शब्द आहे. (म्हणजे, ‘ए बर्ड हू वेअर्स ए साडी’).
इथें, संस्कृतचा प्रभाव दिसतो. सीता हा शब्द आपल्या सर्वांनाच परिचित आहे. कोका म्हणजे ‘चक्रवाक पक्षी’ , व ‘चिल्’ म्हणजे वस्त्र नेसणें. (सीता या शब्दाचा तेलगुमध्ये काय अर्थ आहे, कल्पना नाहीं, मात्र शब्द संस्कृत आहे ).
-मलयालम भाषेत फुलपाखराला ‘चित्रशलभम्’ म्हणतात. आपल्याला दिसून येतें की, हा पूर्णपणें संस्कृत शब्द आहे. ‘शलभ’ हा संस्कृत शब्द grass-hopper आणि moth यांच्यासाठी वापरला जातो.
*म्हणजेच, जसें चित्रपतंग तसेंच चित्रशलभ . पतंग किंवा शलभ या generic शब्दाला ‘चित्र’ हा शब्द लावून फुलपाखरासाठी शब्द बनलेला आहे.
• या चर्चतून आपल्याला हें दिसून येतें की, संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द तर आहेच ;
एवढेंच नव्हे तर, अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमधील , फुलपाखरासाठी असलेल्या शब्दांनाही संस्कृतचा आधार आहे.
– सुभाष स. नाईक
eMail : vistainfin@yahoo.co.in
website : www.subhashsnaik.com
www.snehalatanaik.com
धन्यवाद श्रीमान सुभाष नाईक. तुमच्या विस्ताराने केलेल्या वावरणारे माझ्या ज्ञानात भर पडली.