काल दुपारी मुंबईहुन येताना लोकल मध्ये समोर बसलेल्या दोघा नोकरदारांचे संभाषण ऐकायला मिळाले. त्यांच्या ऑफिस मध्ये असलेली एअर कंडिशन सिस्टीम बंद पडल्याने सगळ्या स्टाफ ला लवकर सुट्टी दिल्याने दोघेही भलतेच खुश होते. दोघांच्या आनंदात दुपारी कमी गर्दीच्या वेळी गाडीत बसायला जागा मिळाली म्हणून आणखीनच भर पडली होती. ऑफिस मध्ये ac बंद झाला म्हणून अर्धा दिवस सुट्टी त्यात गाडीत बसायला जागा मिळाली यामध्ये सुख वाटणारी नोकरदार मंडळी.
थंडगार ac मध्ये दिवसातले आठ ते दहा तास काम आणि प्रवासात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार तास घालवणारे या नोकरदार मंडळींसारखे दुसरे सुख नसावे या कल्पनेने गावातील वाट्याला येणारी तुटपुंजी शेती आणि जमीन विकून शहरात येणारे तरुण शेतकरी जेव्हा शहरातल्या धावपळीच्या वातावरणात अड्जस्ट होत असतात तेव्हा त्या दोन चार वर्षांच्या कालावधीत त्यांना स्वतःचे गांव, घर आणि शेती सोडून आल्याचे विशेष काही वाटत नाही, वाटत नसण्यापेक्षा या सर्वांचा विचार करायला सवडच मिळत नाही.
पण जसजसे शहरात राहून तिथल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात नोकरीच्या मागे धावून धावून दमल्यावर स्वतःच्या मालकीची एखादी वन रूम किचन किंवा वन बी एच के पर्यंतच मजल पोहचते तेव्हा स्वतःची रूम असून सोसायटी किंवा गृहसंकुलात आपण मेंटेनन्स देऊन भाड्यानेच उपऱ्या सारखे राहतोय अशी भावना निर्माण होते, त्यावेळेस स्वतःच्या गावात, स्वतःच्या शेतात आणि शेतातल्या मातीत उन्हा तान्हा मध्ये का होईना पण राब राबून सुखाने पोट भर तरी खायला मिळत होते असे विचार येतात. विहरीचे थंडगार पाणी पिऊन जी तहान भागते ती सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कुठल्याही फळांच्या ताज्या रसाने भागत नाही. शेतात हातावर भाकरी घेऊन खाण्यात जी चव जिभेला लागते ती कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट च्या पदार्थाना येत नाही. शहरातला लखलखाट आणि झगमगाटापेक्षा गावात पडलेलं चांदणे जास्त सुखावह असते. शहरातील गोंगाटापेक्षा रात्री गावपाड्यांवर होणारी रातकिड्यांची किरकिर ऐकायला निश्चितच बरी वाटते.
ऑफिस मध्ये भलेही बसण्यासाठी फोम ने बनवलेल्या गुबगुबीत खुर्च्या, वर्क कल्चर काय किंवा वर्क एन्व्हायरमेन्ट आणि थंडगार ac असो पण त्यामध्ये सुद्धा काम करायला नकोसे होऊन जाते. अर्धा दिवस काय तासभर जरी लवकर घरी जायला मिळाले तरी सुख वाटावे अशी वेळ जर शहरात नोकरी करताना येत असेल तर, उन्हात, थंडीत, पाण्यात, मातीत, चिखलात, दगडात, ढेपळात आणि काट्या कुटात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी नावावर सातबारा आणि स्वतःचे घर आहे या गोष्टीतच सुख मानावे का ??
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply