नवीन लेखन...

जागतिक अल्झायमर दिन

२१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. तो स्वत्व हरवतो, कार्यकारणाचा अभाव होतो व स्वत:कडे लक्ष द्यायला असमर्थ होतो. १९०७ मध्ये अॅलॉइस अल्झायमर यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो.

संपूर्ण जीवशास्त्रामध्ये मान्य झालेला ‘युज इट ऑर लूझ इट’ हा अलिखित कायदाही सर्वसामान्यांनानाही चांगलाच ज्ञात आहे. त्यानुसार आपल्या शरीरातील अवयवबाह्य तसेच अंतर्गतही पुरेपूर वापरात गेला नाही तर हळूहळू दुर्बल होऊ लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होऊन तो विकृत होऊ लागतो. या कारणानेच व आपली संपूर्ण शरीर प्रकृती उत्तम, निकोप राहावी यासाठी नित्य नियमित व्यायामाचे महत्त्व वैद्यकीय, आरोग्यतज्ज्ञ आपणास विशद करतात त्याबद्दल आग्रह करतात. योग्य व नियमित व्यायाम, योगासने, प्राणायामाने आपण खूपच निरोगी राहातो इतकेच नाही तर विकृत झालेले अवयव पण पुन्हा प्राकृत होऊ लागतात असा अनुभव येऊ लागतो. स्थूलता, मधुमेह, हृद्रोग यासारख्या दुर्धर कष्टसाध्य आजारातपण हाच अनुभव घेता येतो. आपला मेंदू हा पण एक अत्यंत महत्त्वाचा अंतर्गत अवयवच आहे. ‘युज इट ऑर लूझ इट’ हा सिद्घांत याबाबत लागू होतो. योग्य, अचूक व्यायामाच्या अभावामुळे मेंदूमधील चेतापेशींची कार्यक्षमता कालांतराने कमी होते व अंतिमत: त्या अकार्यक्षम, निकामी होतात. हे आता शास्त्रसंगत आहे.

अल्झायमर विकारातील चेतातंतूची स्थिती:

अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीस रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. यानंतर गोंधळलेली मनोवृत्ती व विसराळूपणा येतो. रुग्ण तोच तो प्रश्न विचारत राहतो, नेहमीचा रस्ताही विसरतो. स्थितिज्ञान जाते. हळूहळू भूतकाळ हरवतो. त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होत जाते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. शेवटी स्नायू र्हासामुळे सर्व हालचाली मंदावतात व रुग्ण बिछान्यात पडून राहतो. प्रतिकारशक्तीही हळूहळू क्षीण होते. बहुधा न्यूमोनियाने या रुग्णाचा अंत होतो.

अल्झायमर रुग्णांचे शवविच्छेदन केले असता पुढील बाबी आढळल्या आहेत: रुग्णाच्या मेंदूच्या विशिष्ट भागातील चेतापेशी कमी होतात. चेतापेशीच्या बाहेर अपसामान्य प्रथिने असतात आणि चेतापेशींमध्येही या प्रथिनांचे तंतू आढळतात. त्यात ए-६८/टाऊ नावाचे प्रथिन आढळते. हिप्पोकॅंपस व प्रमस्तिष्काचे बाह्यक यांत चेतापेशींचा र्हास जास्त झालेला आढळतो. बाह्यकातील अनेक प्रथिने कमी होतात, तसेच अॅसेटिल कोलीन हा चेताप्रक्षेपक कमी होतो. चेतापेशींच्या र्हासाबरोबरच चेतापेशींपासून निघणार्या अक्षतंतूंभोवती पिष्ठाभर्हास (अॅमिलॉइडर्हास) दिसतो. या र्हासात बीटा-अॅमिलॉइड प्रथिनांचा थर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर व अक्षतंतूंभोवती आढळतो. सामान्य वृद्धांत ही अॅमिलॉइड प्रथिने आढळत नाहीत.

अल्झायमर रोगाचे सुरुवातीस निदान करणे कठिण असते. वयपरत्वे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. चालताना पाय अडखळतात. स्नायूंचा ताठरपणा इतर हालचालींत अडथळा आणतो. वार्धक्य व आनुवंशिकता यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते. चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमादर्शन (एम्.आर्.आय्. – मॅग्नेटिक रेझोनन्स इमेंजिंग) व सी. टी. स्कॅन (कॉम्प्युटरराइज्ड टोमोग्राफी) या तपासण्यांमध्ये मेंदूच्या प्रमस्तिष्काच्या बाह्यकांचा र्हास दिसतो. पी.ई.टी. (पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी) चाचणीत मेंदूच्या दोन्ही बाजूंचा र्हास दिसतो.
लक्षणे:

आत्यंतिक भोळेपणा, सहज गोंधळून जाणे, अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहाणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नाविन्याबद्दल अनास्था वाटणे, ताज्या घटनांची विस्मृती होणे, स्वत:च्या विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने वारंवार अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते. अशा अवस्थेमधील रुग्णाची शुश्रुषा करणे किती कठीण असेल याची कल्पनाही येत नाही! एकदा जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे आणि अजून तरी हा रोग असाध्य आहे.

या रोगावर उपचाराचे खास परिणामकारक औषध उपलब्ध नाही. रुग्णाच्या कुटुंबियांना या रोगाची माहिती देणे आवश्यक असते. अशा रुग्णांची काळजी नीट घ्यावी लागते. हे काम कठिण व धीराचे असते. सध्या तरी टॅक्रीन हे एकच औषध या रोगावर आहे. ते सुरुवातीला दिल्यास रुग्णात परिणाम होऊ शकतो. यासोबत पूरक म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात.

या सर्व क्लेषकारक वर्णनास एक आश्वासक, सुखद किनार अशी आहे की प्रतिबंधक उपचारांनी या आजारापासून बचाव करून राहाणे शक्य आहे व ते उपाय पूर्णत: निर्धोक, सहज अवलंबनीय व विनामूल्य आहेत. म्हणून ते सर्वानी म्हणजे किमान वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींनी आचरणांत आणावेत असे वाटते. नित्य नवे विषय, मुद्दे समजून घेणे, समजलेले स्मरण, चिंतन करणे, दुसऱ्यास समजावून देणे, पाठांतर करणे- याविषयी माझा विशेष, व्यक्तीगत आग्रह आहे कारण भगवत्गीता, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी हे जगमान्य ग्रंथ सहज घरोघरी उपलब्ध असतातच, त्यांचा वापर करता येतो- मित्र परिवारांत गप्पा-टप्पा मारण्यासाठी अवश्य सहभागी होणे. हास्यक्लबमध्ये जाणे, सहलीस जाणे, कोडी सोडविणे, विश्वासू व्यक्तीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करणे असे विविध उपचार करण्याने आपल्या मेंदूमधील संबंधित चेता पेशींना चांगला व्यायाम घडून त्या कार्यक्षम राहतात.

सध्या जगभर माणसाची सरासरी आयुर्मर्यादा वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. सामान्यपणे ८५ वर्षांवरील सु. ५० % वृद्ध अल्झायमरग्रस्त आढळून येतात. विविध शासकीय आणि सेवाभावी संस्थांकडून अशा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..