आर्किटेक्ट्सने केलेल्या कामाची कबुली आणि कौतुक करण्यासाठी आर्किटेक्ट दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जगभर साजरा केला जातो.२००५ मध्ये हा दिवस सर्वप्रथम साजरा झाला.
आर्किटेक्चर ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक अशी कला असून त्यात प्रगती होत गेली. बंगले, अपार्टमेंट्स, दुकाने, ऑफिसेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, मंदिरे, बँका, इंडस्ट्रीज, कॉलनीज, बागा, वसतिगृहे, मॉल, मल्टिप्लेक्स, क्रीडा संकुल, विमानतळ, शोरूम्स या मानवनिर्मित स्थळांमध्ये या वास्तुकलेने मोठे चैतन्य भरले आहे. या वास्तुकलेमध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते.
वास्तुकला ही कला आणि विज्ञान यांच्या संगमाने बहरत जाते. वास्तूंमध्ये कलात्मक चैतन्य भरण्याबरोबरच मजबूत बांधकाम शैली, सुयोग्य तंत्रज्ञान, साधनसामग्री अशा तांत्रिक बाबतीत असलेले नियोजनही वास्तुरचनाकाराकडून केले जाते. अशा प्रकाराच्या वास्तू निर्मितीतून वास्तुरचनाकारास उच्च प्रकाराचे मानसिक समाधान मिळत असते. त्याचबरोबर वापरकर्त्यांची धन्यवादाची पावतीही मिळत असते. फ्रँक लॉइड लाइट, वॉल्टर ग्रोपिअस, ला कार्बुझिए, मिज हँडर रोह, लुई कान्ह, लॉरी बेकर, चार्ल्स कोरिया यासह अनेक आर्किटेक्ट्स आपल्या प्रतिभासंपन्न वास्तू आाणि अवकाशनिर्मितीमुळे अजरामर झाले आहेत.
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या , वाढत्या गरजा , वास्तू तथा अवकाशनिर्मितीबाबतची समाजातील वाढती जागरुकता यामुळे प्रतिभावंत आर्किटेक्ट्सची समाजातील गरज वाढतच चालली आहे. पण भारताची एकूण लोकसंख्या पाहता वास्तुकला क्षेत्रात कळकळीने काम करणारांची संख्या अतिशय कमी आहे. पण या क्षेत्रात करिअरच्या उत्तम अशा संधी आहेत. शिक्षणानंतर सुरुवातीच्या अनुभवानंतर वैयक्तिक अथवा भागीदाराबरोबर प्रॅक्टिस, चांगल्या फर्ममध्ये सेवा असे अनेक पर्याय आहेत. जगाच्या पाठीवर कोठेही शहर व खेड्यातही सेवेच्या संधी उपलब्ध आहेत.
आजच्या आर्किटेक्ट दिवसाच्या सर्व आर्किटेक्टना शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply