संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केल्यानुसार २००० सालापासून जगभर २२ मे हा दिवस ‘जागतिक जैवविविधता दिवस’ म्हणून साजरा केला जातो.या वर्षीची जैवविविधता दिनाची संकल्पना ‘आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर निसर्गात आहे’ ही आहे.
पृथ्वीवर वनस्पती व प्राण्यांच्या लाखो प्रजाती आहेत. जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे. प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेच्या जपणुकीचे महत्व आणि माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.
जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात. ‘जैवविविधता मंडळे’ स्थापन करून कामे वाटून घेतली जातात. स्थानिक पातळी वरील जैवविविधता मंडळे आपल्या परिसरातील वृक्ष, फुले, फळे, वेली, झुडपे, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी तसेच एकूण वृक्षाच्छादित प्रदेश यांची माहिती असणारी नोंदवही ठेवतात. परिसरात आढळणारे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचे प्रमाण, पिके, स्थानिक वाण, चवी, औषधी वनस्पती यांचीही माहिती संकलित केली जाते. जैवविविधतेला क्षती पोहोचवणाऱ्या बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. अधिवास जपणे, प्रदूषण कमी करणे, शाश्वत शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती अवलंबणे, हरित क्षेत्राची वाढ करणे, पशु पक्षांच्या प्रजाती जपणे इत्यादी पाऊले उचलून आपण जैवविविधता सांभाळू शकतो.
पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. आपण संकल्प करुया की तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी न जाता अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगू आणि पृथ्वीवरील जैवविविधता जपू. जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पुणे.
Leave a Reply