१९५९ सालापूर्वी बालदिन ऑक्टोबर महिन्यात असायचा. १९५९ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच बालदिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे होता.
२० नोव्हेंबर हीच तारीख निवडण्याचे कारण असे की १९५९ मध्ये ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद (डिक्लरेशन ऑफ चिल्ड्रन्स राइट्स) स्वीकारली. शिवाय १९८९ मध्ये ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर सह्या झाल्या. हे हक्क आतापर्यंत १९१ राष्ट्रांनी मान्य केले आहेत. सर्वांत पहिला बालदिन ऑक्टोबर १९५३ मध्ये जगभर साजरा करण्यात आला. ह्यासाठी जिनीव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेचा पुरस्कार लाभला होता. त्यानंतर कै. श्री. व्ही के कृष्णमेनन ह्यांनीही आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पना उचलून धरली व १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ती स्वीकारली. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन मानला जातो. सर्व देशांनी लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढवावे तसेच जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना मान्य करून त्यादृष्टीने काम करावे असा हेतू ह्यामागे होता. भारतात पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्याी प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे.
बालकांनाही आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे आणि ह्या मुलांमधूनच देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने व शरीराने आरोग्यसंपन्न असे नागरिक तयार होणार आहेत. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या ह्या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply