नवीन लेखन...

जागतिक सर्कस दिन

‘जागतिक सर्कस दिन’ दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिस-या शनिवारी संपूर्ण जगभर साजरा केला जातो.

सर्कसबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण करणे, सर्कसची माहिती देऊन विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे व सर्कस कलावंतांचा गौरव करणे या हेतूने ‘सर्कस दिन’ साजरा करण्यात येतो.

सर्कस हा शब्द सर्क्युलस ह्या लॅटीन शब्दापासून बनलेला आहे. सर्क्युलस म्हणजे रिंगण. आधुनिक सर्कशीचा उदय व विकास अठराव्या शतकात झाला. इंग्लिश अश्वारोहणपटू फिलिप स्ट्ली (१७४२-१८१४) हा आधुनिक सर्कसचा जनक मानला जातो.रिंगणात कौशल्यपूर्ण कसरती व घोड्यांवरील खेळ करून दाखविणारा तो पहिला खेळाडू होय. अठराव्या शतकातील युरोपीय सर्कशींचे प्रयोग एकाच ठिकाणी, कायमचा तंबू लावून वा बंदिस्त हॉलमध्ये केले जात.मोठ्या कायमस्वरूपी इमारतींमध्येही त्यांचे प्रयोग केले जात. अमेरिकन सर्कसचालकांनी सर्कशीचे प्रयोग ग्रामीण भागात नेण्यासाठी फिरत्या सर्कस कंपन्यांची पद्धत सुरू केली. ह्या सर्कसमंडळ्या त्यांच्या साऱ्या लवाजम्यासह एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवासी वाहतुकीद्वारा नेल्या जात. हळूहळू जगात सर्कसने खूपच लोकप्रियता मिळवली. रशियामध्ये तर चक्क सर्कससाठी शाळा सुरु झाली. आपल्या भारतात देखील सर्कस सुरु झाली. १८८२ मध्ये चर्नी विल्सन ह्यांनी मुंबईमध्ये सर्कस आणली होती. त्या सर्कशीचा खेळ विष्णुपंत छत्रे ह्यांनी पाहिला.विष्णुपंत छत्रे हे आपल्या भारतीय सर्कसचे पितामह आहेत. त्यांनी २६ नोव्हेंबर १८८२ रोजी ग्रँट इंडियन सर्कस सुरु केली. मुंबईत सर्कशीचा जन्म झाल्याने पुढे आपल्या महाराष्ट्रातील अनेक गावांत सर्कसचे कलाकार तयार झाले, ज्यांनी परदेशात जाऊन देखील नाव कमावले. देवल, कार्लेकर आणि ‘परशुराम लायन’ या त्या काळातल्या भारतातल्या सर्वांत मोठ्या तीन सर्कस होत्या. ‘परशुराम लायन सर्कस’ ही परशुराम माळी यांनी १८९०च्या सुमारास तासगावला सुरू केली. लोकमान्य टिळकांनी परशुराम माळी यांना ‘द लायन ऑफ द सर्कसेस’ ही मानाची पदवी दिली आणि त्यावरून त्यांच्या सर्कसला ते नाव पडलं. या सर्कसमध्ये वाघ, सिंह, हत्ती, घोडे इत्यादी जनावरांचा मोठा भरणा होता. परशुराम लायन सर्कस १९५५ ला मिरज इथं बंद पडली. कार्लेकर सर्कसमधील शेलार यांनी स्वत:ची ‘शेलार्स रॉयल सर्कस’ १९१० मध्ये सुरू केली. ताराबाई शिंदे (सु. १८७५-१९८५) ही भारतातील पहिली महिला सर्कसपटू मल्ल होत्या. कार्लेकर ग्रॅण्ड सर्कसमध्ये शक्तिप्रदर्शनाची आणि साहसाची कामं त्या करीत असत, तसंच वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इत्यादी करीत असत. पुढे त्यांनी स्वतःची ‘ताराबाई सर्कस’ स्थापन केली . नारायणराव वालावलकर यांनी ‘दि ग्रेट’ भागीदारीत सुरू केली. त्या भारतात आणि परदेशांतही प्रेक्षणीय खेळ करून दाखवत असत.

यात २० व्या शतकात ‘देवल सर्कस’ अत्यंत नावारूपाला आलेली प्रसिद्ध सर्कस होती.मिरजेजवळ म्हैसाळ गावी १८९५ च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर महादेव देवल आणि त्यांच्या अजून २/३ भावांनी ‘देवल सर्कस’ ची स्थापना केली.पाहता पाहता तिची प्रसिद्धी आणि आवाका प्रचंड वाढला आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारताबाहेर अफगाणिस्तान, सिंगापूर, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा आदी ठिकाणी खूप मोठा यशस्वी दौरा झाला.त्याकाळी आशिया खंडातील ही सर्वात मोठी सर्कस समजली जात असे! सफाईदार कसरती, नेत्रदीपक रोषणाई , चित्तथरारक खेळ यासाठी ‘देवल सर्कस’ प्रसिद्ध होती!

गांधी हत्येनंतर मात्र जी भीषण जाळपोळ, लुटालूट झाली त्यात ‘देवल सर्कस’ चं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं.तंबू जाळले, जनावरे पळवली, त्यातील कलाकार, कामगारांना जिवंत जाळलं… आणि अखेर ही जगद्विख्यात सर्कस उतरणीला लागली!

पुढे इतर मनोरंजनाचे प्रकार जसे की रेडिओ टीव्ही इत्यादी आले तसतशी सर्कसची लोकप्रियता कमी होत गेली. सर्कसमधील प्राण्यांच्या वापराविरुद्घ, प्राणिहक्करक्षक कार्यकर्त्यांनी विरोधी आंदोलने करून कायदेशीर बंधने घातली आहेत. प्राण्यांचा छळ होतो म्हणून सरकारने देखील त्यांच्या वापरावर बंदी आणली. अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे व निर्बंधांमुळे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली सर्कस आता हळूहळू कायमची निघून जाण्याच्या मार्गावर आहे. रशिया व चीन येथे मात्र सर्कशीची लोकप्रियता अद्याप टिकून आहे. फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यातील तिसरा शनिवार हा ‘जागतिक सर्कस दिन’ म्हणून आजही पाळला जातो.

सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं जीवनविश्वही वेगळंच असतं. इथं काम करणारे कलाकार हे स्वयंप्रेरणेन आलेले असतात. ते विविध प्रांतांतून, देशातून आलेले कलाकार म्हणजे ते एक कुटुंबच असतं. त्यामुळं त्यांच्यात एक कौटुंबिक ओलावा असतो. सर्वसाधारणपणं रशियन सर्कस जागतिक पातळीवर श्रेष्ठ म्हटली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे शोमॅन दिवंगत राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटानंच सर्कशीचं अंतरंग उलगडून दाखवताना ‘दुनिया एक सर्कस है’ हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवलं. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला ‘दुनिया एक सर्कस है’, हे पक्कं ठाऊक आहे बरं!

आजच्या ‘जागतिक सर्कस’ दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..