भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच “०७ मार्च १९८७”रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या.
अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला.
पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत असतांना ‘एजाज फकी’ च्या गोलंदाजीवर स्लीप मधे बॉल ढकलुन एक धाव काढली आणि समोर(नॉनस्ट्राइकरएंड वर) उभ्या असलेल्या किरण मोरेनी धावत जाउन सुनीलचं अभिनंदन केलं. एक क्षण सुनीलला समजलच नाही की आपलं शतक झालं नाही तरी हा इतका खुश का झाला आहे. पण किरणनी जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत तेव्हा मात्र सुनील आपला आनंद लपवु शकला नाही. संपूर्ण भारतात आनंदाचं उधाण आलं. कारण साऱ्या भारतीयांचं स्वप्न सुनीलनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेक ठिकाणी पेढे/मिठाई वाटुन लोकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली, जणु काही स्वत:च्याच घरात काही खास घडलं होतं. याला कारण सुनील गावस्कर – तो होताच मुळी सर्वांचा लाडका.
सुनीलच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे भारताचा क्रिकेट जगतात दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेट आणि खेळाडु याबद्दल क्रिकेट खेळणाऱ्या देशातील रसिक आदराने पाहु लागले कारण सुनीलनी आपल्या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं होतं.
अशा या महान फलंदाजाचं आपण सारे मिळून कौतुक करुया!!!
Leave a Reply