
संगणक, मोबाईल स्क्रिनच्या स्मार्ट हाताळणीच्या, व्हॉट्सप, फेसबुकच्या जमान्यात हस्ताक्षराचे अस्तित्व असणार की नसणार असा प्रश्न निर्माण होतो परंतु या काळात देखील हस्ताक्षराला अनन्य साधारण महत्व आहे. याचसाठी जगभरातील अक्षरप्रेमी २३ जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिवस म्हणून साजरा करतात.
जागतिक हस्ताक्षर दिवसाची पार्श्वभूमी
अरुण टिकेकर यांनी २०१३ मध्ये हस्ताक्षराचे काय होणार या त्यांच्या लेखात अक्षराबाबतची चिंता व्यक्त केली होती. ते असे म्हणाले होते की, “हस्ताक्षर इतिहासजमा होण्याची भीती प्रथम टाइप-रायटरमुळे आणि त्याच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगणकामुळे निर्माण झाली. पूर्वी पेन्सिल, टाक वा पेन हाताच्या बेचकीत कसे पकडायचे हेदेखील शिकवले जाई. अंगठा आणि पहिले बोट यामध्ये पेन धरून मधल्या बोटाने त्याला आधार द्यायचा, ही सर्वमान्य पद्धत. हस्ताक्षरामुळे स्वत:चे वेगळेपण सिद्ध होते. तसेच पेनने लिहितेवेळी बोटांची होणारी हालचाल ही ज्ञान-वृद्धीसाठी, भाषा-प्रभुत्वाच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या संदेश-वाहनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते, हे मानस-शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. हातात पेन किंवा पेन्सिल धरून बोटाची भोवऱ्यासारखी फिरणारी गरगर किंवा वक्राकार हालचाल करत एकामागोमाग एका ओळीत अक्षरे लिहीत जाण्याने लिहिणाऱ्याचा मेंदू कार्यरत होतो आणि भाषेची सफाई वाढण्यास मदत होते. स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिण्याने निर्मिती-क्षमता वाढते. आविष्कार-कुशलता वाढते. विचार-क्षमता, स्मरण-शक्ती आणि भाषा-प्रभुत्व यासाठी मेंदूचा जो भाग जबाबदार असतो, तो अधिक कार्यक्षम करण्यासाठी पेन्सिल वा पेन यांच्या साह्याने सरळ, वक्राकार, गोलाकार अशी एकेका अक्षराला पूर्णता आणत लिहिणे हे शिकण्याच्या प्रक्रियेला साह्यभूत ठरणारे आहे.
हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला ‘जागतिक हस्ताक्षर दिन’ साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात. आपल्याकडेही जळगावचे किशोर कुळकर्णी यांनी गेल्या वीस वर्षांत ४०० शाळांतून किमान २००० विद्यार्थ्यांना ‘घडवा सुंदर अक्षर’ या नावाने अक्षर-सुधाराचे धडे दिले आहेत. रामदास स्वामींनी ४५० वर्षांपूर्वी सुरेख हस्ताक्षरात लिहिलेली ‘दासबोधा’ची प्रत उपलब्ध आहे, त्यांच्या स्मृति-प्रीत्यर्थ ‘दास-नवमी’ला मराठी हस्ताक्षर-दिन पाळण्यात यावा, अशी त्यांची सूचना आहे. सुंदर हस्ताक्षराच्या बाबतीत समर्थ रामदास स्वामीसुध्दा आग्रही होते. ते म्हणतात-
ब्राह्मणें (बालके) बाळबोध अक्षर।
घडसुनी करावें सुंदर।
जें देखतांचि चतुर।
समाधान पावती।।
अक्षरमात्र तितुकें नीट।
नेमस्त पैस काने नीट।
आडव्या मात्रा त्या हि नीट।
आर्कुलीं वेलांट्या।।
अशा सुंदर हस्ताक्षरासाठीच किशोर कुळकर्णी हे वेगवेगळ्या प्रयोगांव्दारे आपली चळवळ राबवित आहेत. १९९६ पासून राज्यातील शाळा, महाविद्यालये, कारागृहे येथे त्यांनी प्रात्यक्षिकासह सुंदर हस्ताक्षराचे वर्ग घेतले आहेत आणि हजारोंचे हस्ताक्षर वळणदार करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आता विद्यार्थ्यांच्या अक्षरावर मेहनत घेणे शिक्षकांना शक्य नाही, पालकांनाही तेवढा वेळ नाही. ‘कॉन्व्हेंट’ स्कूलमध्ये शिकलेल्यांचे इंग्रजी हस्ताक्षर कसे घटवून-घटवून खास प्रकारे सुंदर केले जाते. मराठी माध्यमाच्या शाळांत तसे करून घेण्याचे मागेच थांबले आहे. ‘हस्ताक्षर’ या विषयावर जगभरच्या शिक्षण-तज्ज्ञांनी खूपच विचार केलेला आढळतो.
फिलिप हेनशर या ब्रिटिश प्राध्यापकाने आपल्या ‘द मिसिंग इंक’ (२0१२) या नव्या पुस्तकात लिहिण्याची कला आत्मसात केल्यापासून ते हस्ताक्षराचे महत्त्वच उरले नसल्यापर्यंतचा आढावा घेतला आहे.”
जागतिक हस्ताक्षर दिन्याच्या औचित्याने प्रत्येकाने हस्ताक्षरात लिहिलेली कविता, पत्र एकमेकांना द्यावी, किमान हातापेनाने पानभर लेखन तरी करावे. हस्ताक्षरामुळे अनेक आरोग्यविषयक फायदेही आपल्याला या निमित्त प्राप्त होती. आजच्या हस्ताक्षर दिनी आपण संगणकावर हस्ताक्षराने लिहिलेला स्कॅन केलेला मजकूर फेसबुक, ट्वीटर वा तत्सम सोशल मीडियावर अपलोड करू या आणि हस्ताक्षर संस्कृती जपू या तरच या हस्ताक्षर ठेव्याला आपण जपू शकू. हस्ताक्षर टिकवून ठेवण्यासाठी या नवतंत्राचा उपयोग करून घेता येऊ शकतो.
— किशोर कुळकर्णी.
(हस्ताक्षर मार्गदर्शक) जळगाव.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply