रजोनिवृत्ती दरम्यान आणि त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल जागृती करण्यासाठी १८ ऑक्टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिन’ म्हणून पाळला जातो.
रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे; ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे.
चाळिशी गाठल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनात रजोनिवृत्तीचा विचार डोकवायला लागतो. साधारणपणे पंचेचाळिशीनंतर कुठल्याही स्त्रीला नकोशा वाटणाऱ्या परंतु बदलता न येणाऱ्या या बदलाला सामोरे जाण्याची वेळ येते. चाळीस ते पंचावन्न हे रजोनिवृत्तीचे वय असू शकते. चाळिशीआधी रजोनिवृत्ती आली तर ती ‘अकाली’ म्हणता येते. तर पंचावन्न नंतर रजोनिवृत्ती आली तर ती ‘विलंबित’ म्हणावी लागेल. सत्तेचाळीस- अठ्ठेचाळीस हे रजोनिवृत्तीचे सरासरी वय मानण्यात येते.
रजोनिवृत्तीचा संक्रमण काळ स्त्रियांसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर त्रासाचा असू शकतो. प्रत्येक स्त्रीला सगळेच त्रास होतील असे नाही. कदाचित काहीही त्रास होणारही नाही. पण बहुतांश स्त्रियांना या संक्रमण काळात अंगातून गरम हवा वाहात असल्याचा अनुभव येणे आणि जीव कासावीस झाल्यासारखं वाटणे (हॉट फ्लशेस), रात्री झोपेतून जाग येणे आणि पूर्ण अंग घामाने भिजणे, शारीरिक थकवा जाणवणे, अंगदुखी, डोके दुखणे, कंबर आणि सांध्याच्या ठिकाणी वेदना होणे, अनुत्साह, आळस येणे, चीडचीड होणे, छातीत धडधडणे, झोप न लागणे, स्वभावाच्या वेगाने बदलणाऱ्या लहरी, नैराश्य यापैकी काही त्रास होऊ शकतो.
रजोनिवृत्तीनंतर आहाराकडे विशेष ध्यान देणे आवश्याक असते. पौष्टीक, सहज पचणारा, कमी तेलाचा व कमी तिखट, शक्तीवर्धक आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे यांचा आहारात समावेश करावा. या अवस्थेमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते, हे लक्षात घेऊन आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश ठेवावा. दूध, नाचणी या पासून कॅल्शियम मिळेल. ‘सोया’युक्त आहारामुळे शरीराला एक प्रकारे हिरवे इस्ट्रोजेन प्राप्त होत असते. जपानी स्त्रियांच्या शरीरात ‘सोया’युक्त पदार्थांचा समावेश अधिक असल्यामुळे त्यांना रजोनिवृत्तीनंतर विशेष त्रासांना सामोरे जावे लागत नाही. दही, पनीर यांचा आहारात समावेश करावा. मात्र मांसाहार कमीत कमी असावा. फास्ट फूड, फ्राइड फूड यापासून दूर राहायला हवे. शेंगदाणे, शतावरी, रताळे, हळद, लसूण, ज्येष्ठमध, गाजर, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, कडधान्ये यांच्या नियमित सेवनाने रजोनिवृत्ती काळातील, नंतरच्या त्रासांवर मात करता येऊ शकते.
वयोपरत्वे येणाऱ्या रजोनिवृत्तीला आणि त्यातील परिणामांना सामोरे जाण्यासाठी पस्तिशीनंतर विशेष लक्ष पुरवायला हवे. अर्धा ते एक तास नियमित व्यायाम व सात ते आठ तास पुरेशी गाढ झोप घेणे आवश्यवक आहे. धूम्रपान करणे टाळायला हवे. ताणतणावांवर योग्य नियंत्रण ठेवायला हवे. अति अपेक्षा आणि अति महत्त्वाकांक्षा यापासून स्वतःला दूर ठेवायला हवे. सकारात्मक विचारसरणी, नियमित शारीरिक तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पडताळणी या गोष्टी आचरणात आणल्यास रजोनिवृत्तीमुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना अधिक धैर्याने, उमदेपणाने सामोरे जाणे प्रत्येक स्त्रीला शक्या होईल. रोज किमान चाळीस मिनिटे चालण्याचा व्यायाम घ्यावा. त्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply