नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२१ फेब्रुवारी  हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ‘ म्हणून पाळला जातो.
बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. फक्त ‘एक संपर्काचे माध्यम’ इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. मानवी भाषेला सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय,वैयक्तिक असे अनेक पदर आहेत. आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे. आजूबाजूच्या जगातून मिळणार्या ज्ञानाला, सौंदर्याला,आनंदाला भरभरून प्रतिसाद देण्याचे एकमेव साधन म्हणजे आपली मातृभाषा. घरच्या अंगणात खेळावं इतकी सहजता आणि इतके आपलेपण मातृभाषेत बोलताना असते. म्हणूनच कदाचित सगळ्यांसाठी मातृभाषा हा इतका भावनिक पातळीवरचा विषय होऊन बसतो. ‘मातृभाषा आणि तिच्यावर येऊ घातलेली संकटं’ हा अनेकदा चर्चेचा विषय होतो. मातृभाषेशी नातं इतकं दृढ असतं की ‘आपली मातृभाषा हरवत चालली आहे’ अशा विचारानेही बहुतांश लोक अस्वस्थ होतात; आणि ते रास्तही आहे. इंग्रजीचा ‘किलर लँग्वेज’ म्हणून जगभर पडत चाललेला प्रभाव बर्यादच लोकांना चिंताजनक वाटतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषासमृद्धीचे व्रत घेतले होते. त्यातील अनेक शब्द आज पूर्णपणे मराठमोळे झाले आहेत.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे असंख्य खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।।
असं सुरेश भटांनी सांगितलं असलं तरी आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी, मराठी भाषेत बोलायला लाज वाटते, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. ‘ यू नो ‘ , ‘ यू सी ‘ हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत, असं होत नसतं. १९२४ मध्ये केसरीतून सावरकरांनी मराठी भाषेचे शुद्धिकरण ही लेखमाला लिहिली, त्यात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती. याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात झालेला वादही प्रसिद्ध आहे. ‘ परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का ?’ , असा प्रश्न दत्तोपंतांनी सावरकरांना विचारला. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘ ती काही आमची विजय-चिन्हं नाहीत ; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत .’ सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थानं योग्यही आहे. आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतानाही दुस-या भाषेचा आधार का घ्यावा ?
सावरकरांनी अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन निमीत्त सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द*
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..