
२५ एप्रिल रोजी जागतिक पेंग्विन दिन साजरा केला जातो व २० जानेवारी रोजी अमेरीकेत राष्ट्रीय पेंग्विन दिवस National Penguin Day म्हणून साजरा केला जातो.
अंटार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सु. १२० सेंमी. व वजन सु. ४५ किग्रॅ. असते. लिटल पेंग्विनाचे शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सु. ३० सेंमी. व वजन सु. १•५ किग्रॅ. असते. अन्य जातींच्या पेंग्विनांची उंची ४५–९० सेंमी. व वजन २•३–६•८ किग्रॅ. असते. पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते.
पेंग्विनाचे शरीर पाण्यात राहायला अनुकूलित झालेले आहे. शरीरावर लहान व जाड जलरोधी पिसे असतात. त्या पिसांचा रंग काळा किंवा निळसर राखाडी असतो. पोटाकडील पिसांचा रंग पांढरा असतो. त्यांच्या काही जातींमध्ये डोके, मान आणि छाती यांवरील पिसे रंगाने पिवळी किंवा तांबडी असतात. चरबीच्या जाड थरामुळे त्यांचे शरीर उबदार राहते. तीव्र थंडीच्या प्रदेशात राहणाऱ्या पक्ष्यांच्या शरीरावर जलरोधी पिसांखाली लांब पिसांचा अतिरिक्त थर असतो. शरीर उंच असून पाय आखूड असतात. त्यामुळे ते बदकासारखे फेगडे चालतात. जमिनीवर चालताना ते बेडौल वाटतात. परंतु ते माणसाच्या वेगाने चालू शकतात. खडकाळ चढावर ते चढू शकतात. चोचीचा रंग काळा, लालभडक, जांभळा किंवा तांबडा असतो. पाय काळे, निळे किंवा गुलाबी असतात.
आकाशात पेंग्विन उडू शकत नाहीत. ते पाण्यात जसजसे जास्त वेळ राहू लागले, तसतसे त्यांचे पंख वल्ह्यासारखे झाले. यामुळे त्यांची उडण्याची क्षमता लोप पावली आहे. वल्ह्यासारख्या पंखांनी, पडदे असलेल्या पायांनी आणि सुकाणूसारख्या शेपटीने ते पाण्यात वेगाने पोहतात. समुद्रकिनाऱ्यावर हे पक्षी सावकाशपणे डुलतडुलत चालतात. वेगाने जायचे झाल्यास ते पोटावर पडून घसरत जातात. काही वेळा ते बर्फाचे उंच कडे चालत पार करतात.
मासे, खेकडे, कोळंबी व माखली हे पेंग्विनाचे प्रमुख अन्न आहे. ते बहुतांश काळ समुद्रात घालवितात. पोहताना त्यांची खूप ऊर्जा खर्ची पडते. त्यामुळे ते सतत खात असतात आणि ज्या ठिकाणी मुबलक खाद्य मिळेल अशा पाण्यात वावरतात. सील, व्हेल व सागरी सिंह हे पेंग्विनाचे नैसर्गिक शत्रू आहेत.
प्रजननकाळात पेंग्विन मोठ्या समूहाने एखाद्या बेटावर किंवा समुद्रकिनारी जमतात. त्यांच्या समूहात १,००० पेक्षा अधिक पेंग्विन असू शकतात. त्यांच्या वसाहतीत नेहमी कोलाहल असतो, कारण हे पक्षी एकमेकांना सतत साद घालत असतात. एकमेकांना ते त्यांच्या आवाजावरून ओळखतात.
पेंग्विन नर व मादी जोडीने आयुष्यभर एकत्र राहतात. विणीच्या हंगामात मादी एक किंवा दोन अंडी घालते. अंडी उबण्यासाठी ३०–६५ दिवस लागतात. अंडे घातल्याघातल्या ते उबवावे लागते. नर अंडे त्वरित पायावर घेतो. कारण अंडे जमिनीवर राहिले तर ते गोठून जाते. अंडे घातल्यानंतर मादी लगेच अन्न शोधण्यासाठी जाते आणि ती साधारणपणे दोन महिन्यांनी परत येते. या काळात नर अंडे पायांवर घेऊन उबवितो आणि खाली पडू नये म्हणून तो लहानलहान उड्या मारत वावरतो. या काळात तो काही खात नाही. मादी परतेपर्यंत अंड्यातून पिलू बाहेर आलेले असते. या पिलास नर त्याच्या पेषणीमधील द्रव भरवत राहतो. मादी परत आल्यानंतर नर अन्न शोधण्यासाठी समुद्राकडे जातो. दोन महिन्यांनी परत येईपर्यंत मादी पिलाचा सांभाळ करते. पिलांच्या समूहामधून आपले नेमके पिलू मादी त्याच्या आवाजावरून ओळखून काढते. ती तिच्या पेषणीमधील अन्न पिलास दररोज थोडे थोडे भरविते. नर परतेपर्यंत पिलू चांगलेच मोठे होते. नर परतल्यानंतर मोठे झालेले पिलू, मादी आणि नर असे सर्व कुटुंब समुद्राकडे प्रवास करतात. काही कारणाने मादीचा मृत्यू झाला, तर इतर माद्या पिलास सांभाळत नाहीत. पिलू प्रजननक्षम झाले की ते स्वतंत्र राहू लागते.
पेंग्विन हे पक्ष्यांच्या जुन्या गटातील पक्षी आहेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यापांसून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतींमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एके काळी तेल आणि त्वचा यांसाठी पेंग्विनाची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे.
Leave a Reply