
दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले. तथापि, फोटोग्राफी या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे.
हजार शब्दांत जे सांगता येणार नाही ते एक छायाचित्र सांगते, असे म्हणतात. छायाचित्र म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू व घटनेची टिपलेली प्रति छायाचित्रणाचा शोध कोणत्याही एका शास्त्रज्ञाने लावलेला आहे, असे म्हणता येणार नाही. या कलेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांचे यात योगदान आहे.
चौदाव्या शतकात कॅमेरा आबस्कुरा किंवा कॅमेरा ल्युसिडा हा कॅमेरा लिओनार्दा दा विंची याने वापरला, हे सर्वज्ञातच आहे. पुढे अठराव्या शतकात कॅमेरा आबस्कुराचा उपयोग त्यावेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करत असत. या कॅमेर्यात सुधारणा करून कागदावर रासायनिक प्रक्रिया करून चित्र उमटवण्याची कल्पना पुढे आली. १७७५ मध्ये जे शुल्झ यांनी सिल्व्हर क्लोराइड प्रकाशामुळे काळे पडते हे दाखवले होते; पण त्यावेळी या माहितीचा उपयोग कसा करायचा याची कल्पना कोणालाच आली नाही. विल्यम लेविस (१७६३), जोसेफ प्रिस्टली (१७७२), के.डब्ल्यू. शेले (१७७७) यांनी यासंबंधी प्रयोग केले. टॉमस वेजबूड यांनी सिल्व्हर नायट्रेटमध्ये पांढरे कातडे व कागद भिजवून त्यावर सूर्यप्रकाशात पानांची व इतर चित्रे मिळवली. त्याविषयीची माहिती १८०२ मध्ये प्रसिद्ध केली. हेफ्री डेव्ही यांनी सिल्व्हर क्लोराइड प्रकाशाला जास्त संवेदनशील असते असे सुचवले.
तथापि, वर उल्लेख केलेल्या कॅमेरा आबस्कुराच्या साह्याने छायाचित्र काढण्याचे सर्व प्रयोग जास्त प्रकाशन काल व स्थिर करण्यासाठी लागणार्या रसायनाचा अभाव यामुळे अयशस्वी झाले. कॅमेर्याच्या मदतीशिवाय एका कोरीव कामाचे छायाचित्र घेण्यात झोझफ सिनेफॉर नेप्स यांना १८२२ मध्ये यश आले. हे कायम स्वरूपाचे पहिले छायाचित्र होते. नेप्स यांच्या छायाचित्रांना ‘होलियोग्राफ’ असे म्हणतात. १८२७ मध्ये त्यांनी लंडन सोसायटीकडे कॅमेरा आबस्कुराने सिल्व्हर क्लोराइडचा थर दिलेल्या कागदावर घेतलेले एक निसर्गचित्र व होलियोग्राफीचे वर्णन पाठवले. १८३९ मध्ये फोटोग्राफीची खरी सुरुवात झाली. फ्रांस ने १९ ऑगस्ट १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.
वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला जागतिक छायाचित्रण दिना’च्या रुपात साजरा करतात.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा.
— संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply