जगातून पोलिओच्या उच्चाटनात जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती. जोनस सॉल्क या शास्त्रज्ञाच्या जन्मदिवसानिमित्त २४ ऑक्टोबर हा दिवस पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस पोलिओशी दिलेल्या यशस्वी लढ्याचं प्रतिक म्हणून बघितला जातो म्हणूनच, जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. लोकांच्या घरोघर जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवडय़ात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले गेले.
अमिताभ बच्चन, महम्मद कैफ इत्यादी व्यक्तींना हाताशी धरून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना भावनिक आवाहन केले गेले आणि लोकजागृती सुरू ठेवली. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल, राजकीय इच्छाशक्ती व हजारो स्वयंसेवकांच्या प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर भारत पोलिओ मुक्त देश झाला.
२७ मार्च २०१४ रोजी तसे प्रशस्तिपत्र जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिले. ही फार मोठी कामगिरी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडही पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे. सिरिया, अफगाणिस्तान व पाकिस्तानातील वझिरिस्तान प्रांतातही पल्स पोलिओचे कार्य चालू आहे व जगातून पोलिओ हटवण्याचा सोनियाचा दिस दूर नाही.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply