आज सकाळी – सकाळी लवकर उठलो आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे वृत्तपत्र हातात घेतलं आणि ते वाचत असताना आज जागतिक टपाल दिन आहे हे लक्षात आलं. माझ्या बालपणीचा काळ डोळ्यांसमोर चटकन उभा राहिला. मी लहान होतो त्यावेळी मोबाईल नुकतेच भारतात प्रवेश करते झाले होते. त्याकाळी रेडिओला जसा अॅंटीना असतो तसा अॅंटीना असलेले मोबाईल भारतात आले होते. त्याचे कॉल दर इतके महाग होते की जनसामान्यांना ते परवडण्यासारखे नव्हते. त्याकाळी जे उच्च मध्यमवर्गीय होते त्यांच्याकडे दूरध्वनी (landline) असायचे. मग त्या एका व्यक्तीचाच नंंबर सगळ्यांकडे देण्यात यायचा, ज्यावेळी काही अत्यंत जरुरीचं काम असायचं त्यावेळी त्या दूरध्वनी क्रमांकावर नातेवाईक , इतर मंडळी संपर्क साधायची. पण आसपास अशी व्यक्ती कोणीच नसेल अशावेळी सर्वसामान्यांच एकमेव हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे ‘ भारतीय टपाल खातं. ‘ सर्वांच्या खिशाला सहज परवडणारं आणि आपला संदेश योग्य वेळेत पोहोचवणारं आशास्थान.
या खात्यांतर्गत बर्याच सेवा उपलब्ध असायच्या. त्यातली माझी सगळ्यात आवडती सेवा म्हणजे टपाल सेवा. यात एक वेगळीच मजा असायची. या कागदाच्या आडव्या पिवळसर तुकड्यात एक जादू असायची. त्यात बरेचदा माया , प्रेम , दु:ख , आनंद , राग , शुभेच्छा अशा स्वरुपाच्या अनेक भावना दडलेल्या असायच्या. पण कालांतराने तंत्राज्ञानाने खूप प्रगती केली आणि ती प्रगती इतकी झाली की त्यात टपाल पद्धत लोप पावत गेली. त्यामुळे झालं काय की, मूळ भावनांचा सुगंध दरवळेनासा झाला. पूर्वी जेव्हा टपाल यायचंं तेव्हा त्याला एक विशिष्ट असा सुगंध असायचा , मायेचा ओलावा असायचा , एका प्रकारचा धाक असायचा या सगळ्या भावनाच तंत्रज्ञानामुळे लुप्त पावल्या. हल्ली फोन उचलला लावला कानाला आणि हवं त्या व्यक्तीशी बोललो असं होतं पण त्यामुळे त्या जुन्या भावनांपासून आपण सगळेच दूर गेलो. मोबाईलमुळे तर कित्येक लोक खोट बोलायला शिकले, एका ठिकाणी असताना दुसर्या ठिकाणी आहे असं भासवू लागले. पण टपाल सेवेत तशी लबाडी , खोटेपणा कोणीही करु शकत नसत कारण टपाल कोण पाठवित आहे याच्या पत्त्यासकट तिथे माहिती द्यावी लागे.
मनोरंजन क्षेत्रात तर कितीतरी चित्रपट, गाणी, चित्रपटातील दृश्यंं या टपालावर प्रसिद्ध आहेत हे आपल्याला सांगणं नकोच. बरेचदा त्यातील प्रेमपत्रांसारखी आपणही प्रेमपत्र लिहिली असतील.
अद्यापही ही सेवा काही गोष्टींसाठी चालू ठेवण्यात आली आहे पण पूर्वी जेवढ्या प्रमाणात या सेवेचा लोक फायदा घेत तेवढा आता घेत नाहीत. मी जेव्हा कधी बाहेर पडतो तेव्हा बरेचदा गंजलेल्या स्वरुपातले उभे लाल डबे मला दिसतात. बिचारे एकलकोंडे भासतात मला. त्यांच्या नजरेच्या भावनांमधून मला ते कोणाची तरी आतुरतेने वाट पहात असल्याचं भासतं.
याला आपणच जबाबदार आहोत असं मला जाणवतं. मग मी मनाच्या समाधानाकरिता एक टपाल लिहितो आणि दुसर्या व्यक्तीचा पत्ता न टाकता ते टपाल त्या हिरमुसलेल्या उभ्या डब्यात टाकतो. त्यावेळी तो लाल डबा भावनाविवश होऊन रडत आहे असं मला भासतं मग मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून निघतो. त्यावेळी तो मला म्हणतो, ” मित्रा! पुन्हा भेट कधी?” मी ही त्याला हसत उत्तर देतो , ” लवकरच.”
मित्रांनो आजच्या टपाल दिनापासून तरी निदान आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींंना, मित्रमंडळींना एक महिन्याआड पत्र लिहूयात. त्या जुन्या भावना पुन्हा अनुभवूयात आणि येणार्या नवीन पिढीला या साहित्यप्रकाराची नव्याने ओळख करुन देऊ. इतर संस्कृती पाळताना ही संस्कृती पुन्हा कशी वृद्धींगत होईल याचा विचार करुया. चला तर मग लागू कामाला आणि इतरांनाही थोडं कामाला लावू.
— आदित्य संभूस
Leave a Reply