रेबीजच्या विषाणूंवर ऑण्टि-रेबीज लसीचा शोध लावणाऱ्या फ्रांसचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांचा स्मृतीदिन आज असतो या निमित्ताने व या आजाराला आळा घालण्यासाठी व त्याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने हा जागतिक रेबीज दिवस साजरा केला जातो.
रेबीज हा विषाणुजन्य रोग आहे. रेबीज हा रोग फक्त कुत्रा चावल्याने होतो हे चुकीचे आहे. रेबीजचा प्रसार खालील बाबींमुळे होतो. रेबीजने बाधीत कुत्रा, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगुस आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर मज्जातंतूद्वारे मध्यवर्ती मज्जा संस्थेत प्रवेश करतात. रोगजंतूचा शरीरात प्रसार चावा घेतलेली (विषाणू बाधीत) जागा व मेंदूपासून अंतर यावर अवलंबून असते. मेंदू व बाधीत जागेतील अंतर जेवढे कमी तेवढी रोगाची लक्षणे लवकर दिसतात. तोंडाजवळ चावलेल्या जखमेपेक्षा पायावर चावलेल्या जखमेतून मेंदूचे अंतर जास्त असल्याने हा काळ बराच जास्त म्हणजे काही आठवडे किंवा काही महिने ते वर्ष इतका असू शकतो. एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरात, माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तिव्रतेने दिसू शकतात.
रेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे २० ते ३० दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.
जनावरात आढळणारे रेबीजचे प्रकार
१ ) मुका प्रकार २) चवताळलेला प्रकार
कुत्रा व गाई म्हशीत वरील दोन्ही प्रकार दिसून येतात. तर मांजर, कोल्हा, लांडगे या प्राण्यात चवताळलेला प्रकार अधिक असतो. आपल्या देशात मुख्यत्वेकरुन चवताळलेला रेबीजचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.
मुका प्रकार :- या प्रकारात कुत्र्याच्या हालचाली कमी होऊन ते सुस्त व आळशी बनतात. माणसापासून दुर राहतात. घराच्या कुठेतरी कोपऱ्यात किंवा फर्निचर खाली अंधाऱ्या जागेवर जाऊन बसतात. अशा कुत्र्यांना ओरडता येत नाही. कुत्र्यांचा खालचा जबडा लुळा पडतो व लाळ गळते. थरथर कापतात, त्यांना लुळेपणा येतो. जमिनीवर पडून राहतात. शांत अवस्थेत तीन दिवसात मृत्यू पावतात.
तीव्र प्रकारात जनावरे अतिशय उग्र होतात. माणसाच्या अंगावर धावून येतात. शिंगे व डोके झाडावर किंवा भिंतीवर आदळतात. डोळे लाल होतात, तोंडाला फेस येतो, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, बैल वारंवार थोडी थोडी लघवी करतात. जनावरे घोगऱ्या आवाजात ओरडतात. कमी तीव्र प्रकारात जनावराच्या कातडीला स्पर्श केला तरी त्याची जाणीव होत नाही.
चवताळलेला प्रकार :- या प्रकारात कुत्रे निरनिराळी लक्षणे दाखवतात. कुत्र्याचे खाण्यापिण्यावर लक्ष राहात नाही. रोजच्या सवयीत बदल होतो, कुत्रा मालकाचे आदेश पाळत नाही. एकाकी शांत राहतो, लाळ गाळतो. यापुढील अवस्थेत कुत्रा संबंधित माणसापासून दूर राहतो.
कुत्रा अतिशय उत्तेजित होतो. मोकळा सोडल्यास भटकंती मार्गात येणाऱ्या सजीव वा निर्जीव वस्तुंना चावा घेतो. विनाकारण भुंकतो. घोगरा आवाज येतो. अखाद्य वस्तू उदा. लाकडाचा तुकडा, दगड इत्यादी चघळतो किंवा गिळून टाकतो. खूप दूरवर पळत जातो. बऱ्याच वेळा घरी परत येत नाही. थोड्या थोड्या वेळाने लघवी करतो. लाळ गाळण्याचे प्रमाण वाढते, डोळे लालभडक होतात. पक्षाघात किंवा पंगू होण्याची अवस्था चार ते सात दिवसांपर्यंत राहते. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज घोगरा होतो किंवा आवाज बंद होतो, तोंडाच्या खालचा जबडा लुळा पडतो व जीभ बाहेर येते. मान खाली किंवा वाकडी होते. शेपटी सरळ दिसते, कुत्रा अडखडत झोकांड्या खात चालतो. नंतर चक्कर येऊन पडतो. मागचे पाय लुळे पडल्याने उभा राहू शकत नाही. शेवटी श्वासोच्छवास बंद पडल्याने मृत्यू होतो.
माणसातील लक्षणे
माणसात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 90 दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते. नाका-डोळ्यातून पाणी वाहणे / गळणे, घशाला कोरड येणे, जेवण न करणे व पाणी पिणे बंद होणे, पाण्याची भिती वाटायला लागते. चेहऱ्यावरचे स्नायू निष्प्राण होतात. जसजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो तसतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रवपदार्थ तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुध्द होतो आणि 7 ते 10 दिवसात मृत्यू पावतो.
प्रथमोपचार
कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्वरीत ती जखम धावत्या पाण्याखाली पकडून धुऊन टाकावी. त्यानंतर जंतूनाशक मलम लावावे. जखम स्वच्छ केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. जखमेतून रक्त जर जास्त प्रमाणात वाहत असेल तरच त्यावर पट्टी बांधावी. जखमेवर हळद, चुना किंवा इतर कुठलेली पदार्थ लावू नयेत. जखमेवर टाके देऊ नयेत. चावलेला कुत्रा जर माहितीचा असेल तर त्याला रेबीज प्रतिबंधक लसीकरण झालेले आहे की नाही याची सविस्तर माहिती घ्यावी. कुत्र्यावर 10 ते 15 दिवस बारकाईने लक्ष द्यावे.
रेबीज रोगप्रतिबंधक लस दिलेल्या कुत्र्यास जर पिसाळलेला कुत्रा चावला तर लसीची किमान अर्धी मात्रा तरी देऊन घ्यावी. पूर्ण मात्रा देणे उत्तम. कारण क्वचित प्रसंगी लसीकरण करतेवेळी कुत्रा आजारी / अशक्त असेल, लस योग्य त्या तापमानात साठवलेली नसेल, योग्य त्या मात्रेत लस न टोचली गेल्यास किंवा लसीची कालमर्यादा संपल्यानंतर जर दिली असेल तर त्या कुत्र्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत नाही. आपल्या कुत्र्यास रोगप्रतिबंधक लस न दिलेला, परंतू सर्वसामान्य दिसणारा एखादा कुत्रा चावला तरीसुध्दा लसीकरण करणे उचित असते. कारण वरवर सर्वसामान्य दिसणाऱ्या एखाद्या कुत्र्याच्या लाळेतही रेबीजचे जंतू असू शकतात.
वैद्यकशास्त्रातील प्रयत्नाने आता रेबीज नियंत्राणासाठी उच्च दर्जाच्या लसीची निर्मिती केली आहे. या लसी महाग आहेत. पण अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असतात. याची फक्त पाच इंजेक्शने ( 0,3,5,14,28 व्या दिवशी ) दंडात घ्यावी लागतात. कुत्रा जर 15 दिवसानंतर जिवंत राहिला नाही तर उरलेली दोन इंजेक्शन ( 60 आणि 90 व्या दिवशी ) घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
महानगर पालिका ग्रामपंचायत व नगर परिषदेमार्फत मोकाट/बेवारशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. ग्राम पंचायत व नगरपरिषदेमार्फत पाळीव कुत्र्यांचे नोंदणीकरण करावे. पिसाळलेल्या कुत्र्यांचे मृत शरीर जमिनीत खोल गाडून टाकावे. पाळीव कुत्रा व मांजर यास रेबीज प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करुन घ्यावे. ही लस सुरवातीला तीन महिने वयाच्या पिल्लास द्यावी व त्यानंतर दरवर्षी एक वेळ याप्रमाणे देऊन घ्यावी. दुधाद्वारे रेबीज पसरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, पण दूध नेहमी उकळूनच वापरावे. पिसाळलेला कुत्रा चावलेली गाय, म्हैस, शेळी, मेंढी याचे दूध हाताळते वेळी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा हातावरील बारीक ओरखड किंवा जखमांद्वारे रेबीज संक्रमण संभवते. दुधात असलेले विषाणू पोटात गेल्यास दूध पिणाऱ्यास रेबीज रोग झाल्याचे उदा. उपलब्ध नाही. परंतू अशा गाई, म्हशी, शेळी, मेंढीचे दूध उकळून वापरल्याने बाधा होत नाही.
रेबीज होऊच न देणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
कुत्र्या, मांजराने बारीकसा चावा जरी घेतला किंवा त्यांचा दात लागला आणि रक्त आले तर त्वरीत डॉक्टरांना भेटावे. या व्यतिरिक्त ससा, खार, मांजर, वटवाघूळ, उंदीर यांच्यापासून देखील रेबीजची लागण होऊ शकते. या प्राण्यांनी जर तुम्हाला चावा घेतला किंवा नखांनी ओरखडले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply