आपल्या आहारातले ब्रेडचे महत्त्व बहुधा कधीच संपणार नाही. आज प्रत्येक देशात तिथे उपलब्ध असलेल्या धान्यांप्रमाणे, हवामानाप्रमाणे आणि रीती-रिवाजांप्रमाणे अनेक प्रकारच्या ब्रेडची चव आपण घेऊ शकतोय. प्रवास करताना ब्रेडचे सॅन्डविचेस् हे सर्वात उत्तम खाद्यपदार्थ ठरते. आजही सॅन्डविचेच्या शिवाय शाळेच्या पिकनिकचा विचारही आपण करू शकत नाही. इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की, इतर अनेक गोष्टींच्या प्रमाणेच सॅन्डविचचा शोधही चुकूनच लागला. अठराव्या शतकात ब्रिटन मधील ‘सॅन्डविच’ नावाने ओळखल्या जाणार्या भागाचे नोबल चीफ जॉन मॉनटॅगू यांना तासनतास पत्ते खेळायची आवड होती. खेळ सुरू असताना जेवणासाठी उठावे लागू नये म्हणून त्यांनी ब्रेडमध्ये मीट घालून खायची सुरुवात केली आणि सॅन्डविच जन्माला आले.
सॅन्डविच हा तर अगदी सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा खाद्यप्रकार आहे. हे सॅन्डविच काकडी,कांदा तसेच अनेक फळभाज्या वापरून तयार केले जाते. यामुळे जी मुले भाज्या खात नाहीत, त्यांच्या पोटात आपोआप सॅन्डविचच्या माध्यमातून हे पौष्टिक पदार्थ जातात. मसाला ग्रील आणि मेयोनीज सॅन्डविचलाही खवय्ये पसंती दर्शवतात. हा, सॅन्डविच असल्याने मुलं खूश आणि भाज्या खाल्ल्या जात असल्याने त्यांची आईही खूश असते.
मुंबई सारख्या शहरात तर गल्लोगली सॅन्डविचच्या गाड्या दिसतात. सॅन्डविचच्या दुकानात सॅन्डविचचे १०० हून अधिक प्रकार मिळतात. काहीजण सकाळी नाष्टय़ात रोज सॅन्डविच खाणे पसंत करतात. हल्ली बाजरात सॅन्डविचचा ब्रेड वेगळा मिळतो.
काही प्रकार सॅन्डविचचे.
व्हेजिटेबल सॅन्डविच
साहित्य. २ ब्रेडचे स्लाईस, काकडीचे पातळ काप ६-७, टोमॅटोचे पातळ काप, शिजलेल्या बटाटय़ाचे पातळ गोल काप ४-५, कांद्याची पातळ चकती १-२, १ टे स्पून बटर, चिमूटभर काळे मीठ, हिरवी चटणी- दीड कप कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून जिरपूड, किंचित साखर,चवीनुसार मीठ
कृती. सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दीड कप कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टि स्पून जिरेपूड, चवीनुसार मीठ, साखर आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी करावी. ब्रेडच्या कडा नको असतील तर काढून टाकाव्यात. दोन्ही ब्रेडच्या एका बाजूला आधी बटर आणि चटणी लावून घ्यावी. एका ब्रेडवर आधी काकडीचे काप पसरून लावावेत. त्यावर टोमॅटोचे काप ठेवावेत. त्यावर काळे मीठ भुरभुरावे. त्यावर बटाटय़ाच्या चकत्या लावाव्यात, किंचित मीठ पेरावे आणि त्यावर कांद्याची चकती ठेवावी. बटर आणि चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस यावर ठेवावा. सुरीने तुकडे करावेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सव्र्ह करावे.
त्रिकोणी सॅन्डविच
साहित्य. ८ ब्रेड स्लाईस, १ बटाटा, १ चमचा तिखट, १/२ चमचा जिरे पूड, १/२ चमचा धने पूड, १/२ चमचा आमचूर पूड, मीठ, तेल.
कृती. बटाटे किसून पाण्यात घाला. पाणी निथळून त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घाला. ब्रेडच्या कडा कापून टाका. प्रत्येक ब्रेडचा तुकडा एक-दोन सेकंद पाण्यात भिजवा व लगेच काढून त्यातील पाणी दाबून काढा. आता ब्रेडमध्ये बटाटय़ाचे मिश्रण घालून कडा दुमडून त्रिकोणी आकारात बंद करा. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ब्रेड तळा. ब्रेड खूप जास्तवेळ पाण्यात बुडवला तर त्याचा लगदा होईल व नीट आकार देता नाही येणार त्यामुळे पटकन पाण्यातून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे.
डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविच
साहित्य. ब्रेड, टोमॅटो, कांदा, काकडी, चीजच्या स्लाईस, ओले खोबरे, ३ ते ४ हिरवी मिरची, १ टेबल स्पून जिरे, २ टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट, थोडा पुदिना, आले, कोथिंबीर, मीठ, साखर, टोमॅटोचा सॉस.
कृती. प्रथम खोबरे, हिरवी मिरची, जिरे, आले, कोथिंबीर, पुदिना, दाण्याचा कूट, मीठ, साखर घालून चटणी करून घ्या. ही चटणी ब्रेडला लावता येईल अशी पातळ करा. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर ही चटणी लावून घ्या. मग त्यावर चीजची स्लाईस ठेवा. त्यावर कांदा, टोमॅटो, काकडीच्या स्लाईस ठेवा. आता दुस-या ब्रेडलाही ही चटणी लावून घ्या. हा ब्रेड त्या स्लाईसवर ठेवा. आता ब्रेडच्या वरच्या बाजूला टोमॅटो केचप लावा. आता त्यावर पुन्हा एक चीजची स्लाईस ठेवा, त्यावर काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या ठेवा. दुस-या ब्रेडला केचप लावून घ्या आणि ही स्लाईस पालथी ठेवा. आता त्रिकोणी आकारात हे स्लाईस व्यवस्थित कापून घ्या. कापताना स्लाईसच्या मध्ये घातलेले सॅलेड व्यवस्थित कापा. या सॅन्डविचला हिरवी चटणी आणि केचपमुळे चांगली टेस्ट येते.
रोल्ड सॅन्डविच
साहित्य. ब्रेड, चीज, जॅम किंवा मार्मलेडस.
कृती. ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुस-या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थित ठेवून घ्या. या ब्रेडचा रोल करा. हा रोल आपल्याला मोठा ठेवायचा असल्यास ब्रेड अख्खा रोल करा. नाहीतर मधून सुरीने व्यवस्थित कापून त्याचे छोटे-छोटे रोल करा. हे रोल टुथपिकच्या सहाय्याने पॅक करा.
ओपन सॅन्डविच
साहित्य. ब्रेड, फ्रेश भाज्या, तेल, लाल तिखट मोहरी, मीठ.
कृती. ब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करून घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत असल्यास बारीक चिरलेला पालक, बारीक चिरून कांदा, कांदा पात आदी भाज्या चिरून घ्या. आता एका कढईत तेल तापवून फोडणी करा त्यामध्ये या चिरलेल्या भाज्या घाला. त्यावर चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. या भाज्या मंद आचेवर तीन ते चार मिनिटं परतून घ्या. भाज्या टोस्टवर घालून खा.
मोझेरला व्हेजिटेबल टोस्ट सॅन्डविच
साहित्य. ब्रेड, भोपळी मिरची (हिरवी, लाल व पिवळी), ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स, चिझ स्लाईज किंवा मोझेरला चिझ, चिली फ्लेक्स, ओरिगानो, मीठ
कृती. प्रथम तिन्ही प्रकारच्या भोपळी मिरच्या, ब्लॅक ऑलिव्ह्स, कॉर्न, मशरुम्स किसलेल्या मोज्झरेल्ला चिझमध्ये तेलावर मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात चवीनुसार मीठ व चिली फ्लेक्स, ओरिगानो टाकावे. नंतर ब्रेड वर टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी लावून त्यावर चिझ स्लाईज ठेवावे आणि त्यावर वरील मिश्रण नीट पसरवावे. परत वरच्या बाजूस चिझ स्लाईज ठेवून वरील ब्रेडला टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी लावून ठेवणे. नंतर टोस्टरमध्ये टोस्ट करून किंवा तव्यावर भाजून सव्र्ह करणे.
क्लब सॅन्डविच
साहित्य. एक साधा लहान सॅन्डविच ब्रेड, एक लहान ब्राऊन सॅन्डविच ब्रेड, अर्धी वाटी कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी, अर्धी वाटी टोमाटो सॉस, काकडी आणि टोमॅटोचे पातळ काप, थोडं लोणी, चीज स्प्रेड.
कृती. क्लब सॅन्डविच बनविण्यासाठी सहा पांढ-या ब्रेड स्लाईस आणि तीन ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस घ्याव्या. तीन पांढ-या स्लाईसवर हिरवी चटणी लावावी, तर उरलेल्या तीन पांढ-या स्लाईसना टोमॅटो सॉस लावावा. प्रथम चटणी लावलेल्या स्लाईस मांडून त्यांवर काकडीच्या चकत्या पसराव्या. ब्राऊन ब्रेडच्या स्लाईसला लोणी किंवा चीज स्प्रेड लावून त्यानं झाकावं. त्यावर पुन्हा वरच्या बाजूला लोणी किंवा चीज स्प्रेड लावून त्यावर टोमॅटोच्या चकत्या मांडाव्या आणि त्या टोमॅटो सॉस लावलेल्या पांढ-या ब्रेड स्लाईसनं झाकाव्या. अशा रीतीनं प्रत्येकी तीन स्लाईसची चवड तयार होईल. आता ती हलक्या हातानं दाबून तिरकी कापून त्रिकोणी सॅन्डविच बनवावा.
व्हेज टोस्ट सॅन्डविच
साहित्य. बटाटे उकडून भाजी, ब्रेड, लोणी, टोस्ट बनवण्यासाठीचे इलेक्ट्रिक मशीन किंवा गॅसवर भाजण्यासाठीचे यंत्र, चीझ स्प्रेड किंवा चीझ स्लाइस.
कृती. बटाटय़ाची भाजी करून घ्यावी. बटाटय़ाच्या भाजीऐवजी कोणतीही कोरडी भाजी सॅन्डविचमध्ये भरली तरी चालते. शिळीभाजी संपवायचा एक मार्ग आहे. ब्रेडच्या कडा चाकूने कापून घ्यावात. आत बटर लावावे. व भाजीचा थर द्यावा. दुस-या स्लाइसलाही आतून बटर लावावे व तो भाजीवर उपडा ठेवावा. या ब्रेडना आतमधून कोणतीही कोरडी चटणी लावली तरी मस्त स्वाद येतो. टोस्टरला किंचित बटर लावून त्यात हे सँडविच ठेवावे व दोन्ही बाजूंनी हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
ग्रिल्ड कॉर्न सॅन्डविच
साहित्य. ३-४ वाटय़ा कॉर्न/स्वीट कॉर्न, २-३ कांदे, २-३ टोमॅटो, थोडी कोथिंबीर, पावभाजी मसाला, गरम मसाला, एक व्हाईट ब्रेड , एक चमचा तेल, जिरे, हळद, तिखट, हिंग, साखर, मीठ चवीप्रमाणे
कृती. कॉर्न दहा बारा मिनिटे उकडून पाणी काढून टाकणे व भरड मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून फिरवून घेणे. कांदे, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गॅसवर कढईत तेल गरम करणे. तेल गरम झाले की जीरे टाकावे. जिरे थोडे तडतडले की त्यात कांदा टाकावा. कांदा थोडा परतला की त्यात हिंग, हळद, तिखट टाकून परतावे. दोन चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला टाकून अजून दोन मिनिटे परतावे. मग टोमॅटो, मीठ, साखर टाकून परतावे. टोमॅटो शिजून तेल वेगळे होईपर्यंत परतावे. मग त्यात कॉर्न व कोथिंबीर टाकून ३-४ मिनिटे परतावे. झाले तुमचे सॅन्डविचचे सारण तय्यार. ब्रेडच्या दोन स्लाईस घेऊन एका भागावर सढळ हाताने सारण पसरावे. अरे हो.. साहित्यामध्ये लिहायचं राहिलं.. फक्त एक-दीड चमचा तेल, ग्रिल करताना बटर नाही.. तेव्हा हे सॅन्डविच जरा जरुरीपेक्षा जास्त हेल्दी होते असे वाटल्याने नव-याने ब्रेडबरोबर चीझ क्युब्स आणले होते. माझे आकारमान वाढतेय आणि कॉलेस्ट्रॉल पण, असा अंदाज असल्यामुळे फक्त नव-याच्या सॅन्डविचवर चिझ पसरले. वरती दुसरी स्लाईस ठेवून सॅन्डविच गरम ग्रिलरवर ठेवावे. साधारण ४-५ मिनिटात मस्त ग्रिल झाले की, सॅन्डविच तयार. गरमगरम सॅन्डविच सॉसबरोबर सव्र्ह करावे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply