वन्यजीव शिकार थांबून जगातील सर्व वन्यजीव प्रजातींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने ३ मार्चला जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो.
१९७० च्या सुमाराला, वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते की त्यांपैकी बरेचसे कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीवन दिवस साजरा करण्याचे ठरविले. या दिवशी वन्यप्राण्यांचे रक्षण, त्यांचे निसर्ग साखळीतले महत्त्व आदी विषयांवर अनेक जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (CITES) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्व आहे. जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा आणि दुर्मिळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत सर्वप्रथम त्यांना समजावले पाहिजे. निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक किड्यांपासून सिंहापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे ही बाब सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे. वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे.
आज जगभरातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के लोकसंख्या तरूण आहे. विशेष म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल ५८ टक्के लोकसंख्या तरूण आहे. म्हणून वन्यजीव संवर्धन व संरक्षण करण्यात तरूणांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. तरूणांच्या हाती केवळ त्या त्या देशाच भविष्यच नसून जगभरातील सर्व वन्यजीवांच भविष्य त्यांच्याच हाती आहे.
गेल्या ४० वर्षांत जगभरातील अर्धे वन्यजीवन धोक्यात आले आहे. अधिवास धोक्यात येणे, वन्यजीव शिकार व त्यांची तस्करी अश्या अनेक अंगाने त्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. हस्तीदंतासाठी आजवर १ लाख आफ्रिकन हत्ती शिकार झालेत. खवले मांजर हा जगात सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी ठरला आहे. १० वर्षांत गेंड्याच्या शिकारीत ९ हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply