खारे वारे, मतलई वारे, व्यापारी वारे हे सर्व वारे आपण भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील रिकाम्या जागा भरण्यापुरतेच राहिल्याने हवा का बदलते याची उत्तरे अनुत्तरित राहतात.
पण अनेकदा ‘आज वातावरण असे का आहे,’ या प्रश्नावर एकच उत्तर असते ते म्हणजे वाऱ्याची बदललेली दिशा किंवा वेग किंवा वेळ.
वारा ही सदीश राशी आहे. त्याला वेग आणि दिशा दोन्ही आहेत. वातावरणाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वाऱ्याचा वेग व दिशा बदलत असतात. एकाच ठिकाणी जमिनीच्या लगत असलेली वाऱ्याची दिशा व वातावरणाच्या वरच्या पातळीवर असलेली दिशा वेगळी असू शकते व त्यामुळे हवामानावर परिणाम होतो. त्याचवेळी पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वाहणारे वारे व त्यांचा एकमेकांशी असलेला संबंधही अतिशय गुंतागुंतीचा आहे. मात्र आपल्या रोजच्या हवामानातील बदल समजून घेण्यासाठी एवढय़ा खोल बुडी मारण्याची गरज नाही.
वर्षभरातील आपल्या ऋतूंचे निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की डिसेंबर ते नोव्हेंबर अशा वर्षभरात वारे घडय़ाळाच्या काटय़ांच्या विरुद्ध दिशेने (अॅण्टिक्लॉकवाइज) आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे डिसेंबरमध्ये वारे उत्तरेकडून मुंबई व राज्यात येतात. उत्तर भारतातील कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी येथून वाहणारे हे वारे सोबत गारवा घेऊन येतात. जानेवारी-फेब्रुवारीत ही दिशा वायव्येकडून (घड्याळ्यातील दहा-अकरा दरम्यान) असते आणि त्यामुळे थंडीची तीव्रता वाढते. मार्चमध्ये वारे पश्चिमेकडून (घडाळ्यातील नऊचा अंक) म्हणजे समुद्राकडून जमिनीवर येण्यास सुरुवात होते. हाच हिवाळ्यातून उन्हाळ्याच्या स्थित्यंतराचा काळ. या वाऱ्यांमध्ये बाष्पाचे प्रमाण फारसे नसते आणि त्याचा प्रभाव जास्त नसल्याने राज्याच्या अंतर्गत भागातही उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होतो. जमीन तापून हवेचा दाब कमी होऊ लागतो. त्याचवेळी समुद्र मात्र फारसा तापलेला नसल्याने समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहण्याची प्रक्रिया सुरू होते. हळूहळू वाऱ्याच्या काट्याची सुई सात ते आठ या अंकाकडे येते. नैऋत्येकडून येणारे हेच ते पावसाचे वारे. मे महिन्याच्या अखेरपासून सुरू होणारे हे वारे सोबत प्रचंड बाष्प घेऊन येतात. यांचा वेगही अधिक असतो. तब्बल चार महिने या वाऱ्यांमुळे आपल्याकडे पाऊस पडतो. सप्टेंबरपासून या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. ऑक्टोबरच्या मध्यावर ते निष्प्रभ होतात. मात्र आता स्थिती उलट झालेली असते. जमीन थंड झालेली असते व तुलनेने समुद्र मात्र दमट, उष्ण असतो. त्यामुळे ईशान्येकडून समुद्राच्या दिशेने वारे वाहू लागतात. हेच वारे सध्या ईशान्य भारतात व तामिळनाडूमध्ये पाऊस पाडत आहेत. त्याचवेळी पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या अंतर्गत भागातही तापमान खाली गेले आहे. हे वारे कोरडे आणि मंद वेगाने वाहतात.
पश्चिम किनारपट्टीवरील समुद्री वारे व हे जमिनीवरील वारे एकमेकांना विरुद्ध दिशेने ढकलत राहतात. सकाळच्या वेळेस पूर्वेकडील वारे भारी पडले की पश्चिमेकडून सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत सुरू होत असलेल्या समुद्री वाऱ्यांची वेळ टळते. ही वेळ टळली की इथे सूर्यदेव डोक्यावर येऊन त्यांची ९० अंशातील किरणे कोणत्याही अडथळ्याशिवाय जमिनीवर पोहोचवतात व तापमान झरझर वाढते. त्यातच समुद्री वाऱ्यांमधील बाष्प या जमिनीवरील कोरडय़ा वाऱ्यांमध्ये नसते. त्यामुळे तापमान नियंत्रणात ठेवणारा बाष्पासारखा घटकच नसल्याने तापमान ३५ अंश से.ची पायरी सहजी ओलांडते. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये तापमान वाढण्याचे हेच कारण आहे.
या समुद्री वाऱ्यांचा किनाऱ्यावर असलेल्या शहरांमधील हवामानावर अतिशय प्रभाव असतो. त्यामुळेच या शहरात वर्षभर उष्ण व दमट (अनेकदा घाम काढणारे) हवामान असते. थंडी तर केवळ दोन महिने आणि तीही गारवा म्हणण्यापुरतीच पडते. दिल्लीकर रंगीबेरंगी शाली आणि धुक्याची मजा घेत असताना मुंबईकरांना मात्र ते केवळ सहलीतच अनुभवायला मिळते. या सगळ्यासाठी वाराच कारणीभूत आहे. मात्र या वाऱ्याचे आणखी एक महत्त्व आहे. दिल्लीपेक्षा जास्त नसले तरी दिल्लीएवढेच प्रदूषण मुंबई महानगरात होत असते. समुद्राकडून येणारा वारा नसता तर दिल्लीत या काळात वाराच नसल्याने प्रदूषणाची जी काही आपत्कालीन स्थिती ओढववते ती आपल्यावरही ओढवली असती.
प्राजक्ता कासले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply