जगातील पहिली ‘वॉर’ फोटोग्राफर
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ‘बाल छायाचित्रकार मुलगी’ म्हणून मागरिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले होते. विशेष म्हणजे, जगात त्यावेळी सर्वात उंच असलेल्या ख्रिसलर बिल्डिंग (Chrysler Building) मधील अगदी वरच्या मजल्यावर तिचा स्टुडिओ तिने उभारलेला होता. अचूकपणे छायाचित्रण करता यावे यासाठी तिने तेथे तोल सांभाळून आपला स्टुडिओ निर्माण केलेला होता.
मागरिटला आपल्या आईविषयी खास प्रेम होते. मातृप्रेमाच्या निष्ठेमुळेच तिने आपल्या वयाच्या बाविसाव्या वर्षी आपल्या आडनावापूर्वी आपल्या आईचे बॉर्क हे नाव आपल्या नावापुढे जोडले होते.
‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते !
इ.स. १९३० मध्ये पाश्चिमात्य छायाचित्रकारांपैकी मागरिट अशी पहिलीच छायाचित्रकार होती, की जिला त्या वेळच्या सोव्हिएट युनियनमध्ये छायाचित्रण करण्यासाठी जाण्यास परवानगी मिळू शकली होती. तेथे तिने औद्योगिक आणि सामाजिक परिस्थितीचे छायाचित्रण केले होते. ‘फॉरच्युन’ या नियतकालिकाने रशियात तिने काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. रशियाच्या औद्योगिक क्षेत्राची जी छायाचित्रे मागरिटने घेतली होती. तत्कालीन रशियातील औद्योगिक जगताचे चित्रण करणारे ते पुस्तक नावलौकिक मिळवून गेले.
इ.स. १९३०च्या मध्यकाळात मागरिटने मनुष्य हाच आपल्या छायाचित्रणाचा मध्यवर्ती विषय म्हणून निश्चित केला. इरेस्किन कॅल्डवेल (Erskine Caldwell) या लेखकाबरोबर प्रवास करीत मागरिटने काही महिने छायाचित्रण केले. प्रवासातील सहवासातून मैत्री झाली आणि मैत्रीतून ते दोघे विवाहबद्धही झाले. त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे अमेरिकेच्या डस्ट बाऊल विभागातील दुष्काळग्रस्तांचे आणि दक्षिण विभागातील शेतमजुरांचे चित्रण तसेच नाझी आक्रमणापूर्वीचे झेकोस्लोव्हाकियामधील जीवनाचे चित्रण शब्दांतून आणि छायाचित्रांतून केले.
मागरिट आणि इरेस्किन या पतीपत्नीने आपल्या सहप्रवासातून आणि परस्पर सहकार्यातून तीन पुस्तकांनाही जन्म दिला आणि कालांतराने ते विभक्तही झाले. जीवनाचा पुढील प्रवास स्वतंत्र वाटेने त्यांनी केला.
मागरिटने तिच्या इच्छेनुसार आपल्या ध्येयाचा पाठलाग चालू ठेवला. दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले आणि मागरिट अस्वस्थ झाली. युद्धाच्या ऐन खाईत छायाचित्रणासाठी जिवावर उदार होऊन ती धाडसाने झेपावली. रणांगणावरील धुमश्चक्रीत उडी घेतल्यावर तिच्यावर प्राण संकटेही ओढवली होती. उत्तर अफ्रिकेतील आणि इटलीतील युद्धाचे प्रत्यक्ष छायाचित्रण करणारी ती पहिलीच महिला छायाचित्रकार होती. परंतु हा सन्मान मिळविण्यासाठी तिला उत्तर आफ्रिकेच्या प्रवासात टॉरपेडोच्या प्राणघातक हल्ल्यास तोंड द्यावे लागले होते. तिच्यावर झालेल्या या हल्ल्यातून ती केवळ नशिबानेच बचावली होती. प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले.
१९४५ नंतर मागरिटने हाईन नदी पार करून जनरल पॅटॉन्सच्या लष्करासोबत जर्मनीमध्ये आपला मोर्चा वळविला. नाझी ‘डेथ कॅम्पस्’चे छायाचित्रण करणाऱ्या पहिल्या छायाचित्रकारांच्या चमूत मागरिटला अधिकृत स्थान मिळाले होते. हिटलरच्या गॅस चेंबरमधील माणसांच्या हाडांच्या सापळ्यांचे व मृतदेहांचे छायाचित्रण मागरिटने केले होते. या छायाचित्रांचा संग्रह ‘डिअर फादरलँड, रेस्ट क्वाएटली’ या मागरिटच्या ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. सैनिकांच्या दैनंदिन लढ्यांचे आणि नंतर मॉस्कोच्या वेढ्याचेही छायाचित्रण मागरिटने केले होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर मागरिट भारतात आली होती. म. गांधींचे छायाचित्रण तिने केले होते. कोरियातील भयानक युद्धाचेही तिने चित्रण केले होते.
१९५०च्या पूर्वार्धात मागरिट पार्किन्सनच्या विकाराने आजारी झाली. त्यामुळे छायाचित्रकार म्हणून तिच्या जगण्यावर मर्यादाच आल्या. तरीही आपला सारा वेळ लेखन करण्यात ती व्यतीत करीत असे आणि जेव्हा जमेल तेव्हा छायाचित्रणही करीत असे.
अखेर शेवटी इ.स. १९७१ मध्ये विसाव्या शतकाच्या महत्त्वपूर्ण घटनांचे छायाचित्रण करणारी मागरिट बोर्क-व्हाईट ही पहिली महिला ‘वॉर फोटोग्राफर’ जागतिक कीर्ती मिळवून अनंतात विलीन झाली.
— प्रा. अशोक चिटणीस
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply