नवीन लेखन...

वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड

मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे.

अशोक कोरगावकर यांचे कुटुंबिय अस्सल मुंबईय्या. अशोक हेदेखील भावंडांसह वरळीतील चाळीतच वाढले. तेथूनच शाळेत जाणे, परिसरातील मित्र सवंगडींसोबत खेळणे, गणेशोत्सवात धमाल करणे अशा वातावरणात ते मोठे झाले. पण अशोक यांच्या अंगी एक वेगळा गुण होता, तो म्हणजे सुरेख व रेखीव चित्रे काढण्याचा. सुंदर चित्र काढू शकत असल्याने शाळेत ते मास्तरांच्या विशेष कौतुकास पात्र ठरत होते. बस्स, हीच चित्राची कलाच त्यांना पुढे त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेली.

तो काळ साधारण १९७० च्या दशकाचा होता. वरळी भागात काही प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या होऊ लागल्या होत्या. या गगनाला भिडणाऱ्या इमारती अशोक यांना कायम भुरळ घालत. त्यांच्यात चित्र काढण्याची हौस निर्माण करीत. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका युवकाला आर्किटेक्चर पूर्ण करून अमेरिकेत नोकरी मिळाली. यापासून प्रेरणा घेत अशोक यांनीही आर्किटेक्चर करायचे ठरवले. पण त्यावेळी वाणिज्य, कला व विज्ञान या पारंपरिक अभ्यासाखेरीज अन्य अभ्यासाला महत्त्व नव्हते. यामुळे आर्किटेक्चर करण्याच्या अशोक यांच्या निर्णयाला घरूनही फार सहकार्य मिळाले नाहीच. पण अशोक यांनी तो ध्यास घेतला आणि अभ्यास सुरू केला.

अशोक यांनी प्रभादेवीतील रचना संसद आर्किटेक्चर अकादमीत प्रवेश घेतला. पाच वर्षांचा अभ्यासक्रम शिकताना त्यांची ओळख आरती यांच्याशी झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. याच आरती पुढे अशोक यांच्या जीवनसाथी झाल्या आणि त्यांनी दिलेला भक्कम पाठिंबा आणि दाखवलेला विश्वास, यामुळे अशोक-आरती या दोघांनीही दुबईची वाट धरत यशाची शिखरे गाठली.

आर्किटेक्ट झाल्यानंतर अशोक व आरती यांनी विवाह केला. त्यावेळी मुंबईत आर्किटेक्ट म्हणून फार नोकऱ्या नव्हत्या. अशोक यांचा भाऊ बहारिन येथे नोकरीनिमित्ताने होता. त्याच्या मदतीने अशोक-आरती हे दोघेही सन १९८० मध्ये दाखल झाले. तेथे दोघांनीही एका अंतर्गत सजावट करणाऱ्या कंपनीत नोकरी सुरू केली. दोन वर्षांनी दोघेही नोकरीसाठी दुबईला रवाना झाले. त्यांनी दहा वर्षे नोकरीही केली. पण अद्यापही अशोक स्वतःबाबत समाधानी नव्हते. एका कंपनीसाठी काम करायचे, हे त्यांना पटत नव्हते. त्यामुळे १९९२ मध्ये त्यांनी स्वतःची आर्चग्रुप कन्सल्टन्ट ही कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारे छोट्या-मोठ्या कॉम्प्लेक्सचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे येत होते. १९९९ मध्ये त्यांना अमिरात एअरलाइन्सने अल् अकाह बीच रिसॉर्टच्या आराखड्याचे काम दिले. त्याआधी अशोक यांनी हॉटेलचा आराखडा कधीच तयार केलेला नव्हता. पण याच कामाने त्यांना पुढे आगळा असा विक्रम करण्यासाठी प्रोत्साहित केले.

गिनीज बुकात नोंद
१९९९ ला अमिरातकडून मिळालेल्या कामानंतर अशोक यांनी मागे वळून पाहिलेच नाही. विविध हॉटेल्सचा आकर्षक असा आरखडा तयार करताना २००७ मध्ये एमिरात एअरलाइन्सने त्यांना दुबईतील जेडब्ल्यू मॅरिएटच्या हॉटेलचा आराखडा तयार करण्याचे काम दिले. दोन जुळ्या टॉवरचा समावेश असलेले हे आराखड्याचे काम अशोक-आरती कन्सल्टन्ट्सने यांच्या आर्चग्रुप अवघ्या वर्षभरात पूर्ण केले. ३५५ मीटर उंचीच्या या टॉवरची २०१२ मध्ये जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्याचा विस्तृत आराखडा व आखणी केल्याबद्दल अशोक कोरगावकर यांच्या नावे या विक्रमाची नोंद झाली आहे.

‘आयुष्यात कुठलेही काम पहिल्यांदा करताना ते नवेच असते. पण ते आव्हान स्वीकारले की ते पहिल्यांदा करत असल्याचे जाणवत नाही. १९८० मध्ये वरळीतून बहारिनला येताना व तेथून दुबईला जाणे, दुबईत स्वतःची कंपनी स्थापन करणे, अमिरातसाठी रिसॉर्टचा आराखडा तयार करणे, हे सारे काही नवे होते. पण हे आव्हान मी दरवेळेस स्वीकारत गेलो आणि वरळीच्या चाळीतून सुरू केलेला प्रवास आज इथवर करू शकलो आहे.’

– अशोक कोरगावकर

संकलन : मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..