लेखक, दिग्दर्शक अशोक हांडे यांचा जन्म ५ जुलै १९५७ रोजी काळवाडी, जुन्नर, पुणे येथे झाला.
‘अशोक हांडे’ हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि उत्साह अशा अनेक गोष्टींची दंगल मनात उसळते.
अशोक हांडे आपल्या ‘चौरंग’ या त्यांच्या संस्थेमार्फत लोककलेला व नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत. अशोक हांडे यांनी ‘मंगलगाणी-दंगलगाणी’, ‘आवाज की दुनिया’, ‘आजादी पचास’, ‘गाने सुहाने’, ‘स्वरलता’, ‘गंगा जमुना’, ‘माणिकमोती’ ‘मराठी बाणा’ आणि यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील ‘मी यशवंत’, एका व्यक्तिमत्त्वात १० व्यक्तिमत्त्वे साकारलेले आचार्य अत्रे यांचा एक भव्यदिव्य कार्यक्रम ‘अत्रे, अत्रे सर्वत्रे’ असे अनेक कार्यक्रम मराठी रंगभूमीवर सादर करून स्वत:ची एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली. अशोक हांडे यांचे वडील किसनराव नथुजी हांडे, इयत्ता सातवीला म्हणजेच पूर्वीच्या व्हर्नाक्युलर फायनलला पुणे जिल्ह्यात दुसरे आले. तलाठ्याची नोकरी चालून आली. पण तलाठी झालास तर वाईट मार्गानं पैसा कमवशील म्हणून आजोबांनी त्यांना मुंबईला हमाली करायला पाठवलं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये हमाली करणा-या किसनरावांनी स्वत:च्या कर्तृत्वावर तिथेच जम बसवला आणि आंब्याचा व्यापार सुरू केला. अशोक हांडे यांचे वडील मुंबईला आणि आईबरोबर मुले गावाकडे अशी त्याकाळच्या जगण्याची अपरिहार्यता होती.
नशिबाचा भाग असा की, अशोक हांडे यांना लहान वयातच लोककलांचे बाळकडू त्यामुळेच मिळाले. भारुड, भजन, लळीत, नाटकं असा उत्सवी बाज तर जात्यावरची गाणी, मोटेवरची गाणी, बैलगाडीवरची गाणी, शेतात कामं करतानाची लयबध्द गाणी इथपासून उजाडता-उजाडता आलेला वासुदेव, लग्नानंतरच्या जागरणाला आलेली वाघ्या-मुरळी, गोंधळी, जोगवे, वैदिणी, भिकारी, लमाणांचे तांडे ते अगदी निर्जन ठिकाणच्या शिवमंदिरात एकटाच एकतारीवर भजनं म्हणणारा कोणी एक साधू असा मराठी संगीताचा अस्सल बाज या ग्रामीण जीवनात संस्कारक्षम वयात त्यांना पहायला, ऐकायला, शिकायला आणि अनुभवायला मिळाला, आणि नकळत ही शिदोरी घेऊन ते मुंबईत दाखल झाले. व शिक्षणा नंतर आपल्या आंब्यांच्या विक्रीच्या पिढीजात व्यवसायात लक्ष घालू लागले. लागल्यानंतरही रंगभूमीचे आकर्षण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.
लता मंगेशकर हा त्यांचा विक पॉइंट. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर ते त्या वेळी करतच होते, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखून ठेवलेला होता.
महाविद्यालयीन जीवनात एकांकिकेचे लेखन-दिग्दर्शन करता करता ते शेवटी रंगभूमीचे झाले. हिंदी, मराठी चित्रपटांतील गाण्यांचे गारूड काही उतरायला तयार नव्हते. त्यातून मिळणा-या ऊर्जेतूनच पुढे अशोक हांडे यांनी ‘मंगलगाणी-दंगलगाणी’, ‘आवाज की दुनिया’, ‘आझादी ५०’, ‘गंगा-जमुना’, ‘गाने-सुहाने’, ‘मराठी बाणा’, ‘मधुरबाला’ असे कार्यक्रम सादर केले. २००४ मध्ये लता मंगेशकर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करून ७६व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लतादीदींची ७५ गाणी सादर करणारा ‘अमृतलता’ हा कार्यक्रम त्यांनी ‘चौरंग’ संस्थेतर्फे सादर करायला लागले. ‘अमृतलता’ चा पहिला प्रयोग झाला २२ जानेवारी २००४ रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियममध्ये. त्यानंतर पुढचा प्रयोग प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर येथे केला. त्यानंतर इंदूर, उज्जैन, कोलकाता, झारखंड, दिल्ली, गोवा, रायपूर, पुणे, गांधीनगर असा प्रवास करत करत अमृतलता कार्यक्रमाने आता पाचशे हून अधिक प्रयोग केले आहेत. अमृत लता कार्यक्रम करायचा, असे जेव्हा ठरले; त्या वेळी कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी तसेच त्यात कोणकोणत्या गाण्यांची निवड केली आहे, याची कल्पना देण्याकरिता ते लतादीदींशी संपर्कात होते.
माणिक वर्मा यांच्या निधना नंतर भारती आचरेकर यांनी अशोक हांडे यांच्या कडे माणिक वर्मावर एखादा कार्यक्रम करा, अशी विनंती केली होती. त्यातून ‘माणिकमोती’ तयार झाला. तीच कहाणी ‘गंगा-यमुना’ या कार्यक्रमाची. आपल्याकडे ‘रुपेरी पडद्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न’ याच नजरेने मधुबालाकडे बघितलं जातं. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावं लागलं. ते सर्व अशोक हांडे यांनी ‘मधुरबाला’च्या रूपात मांडलं. ‘यशवंत’ या कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी त्यांना मिळाली. ‘मराठी बाणा’ हा १२५ कलाकारांना सोबत घेऊन मराठी रसिक प्रेक्षकांसमोर सादर अशोक हांडे सादर करतात हे कमालच आहे. ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘आवाज की दुनिया’, ‘मंगलगाणी दंगलगाणी’ इत्यादी कार्यक्रम सादर करता करता ‘मराठी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही ते सतत सादर करीत असतात. ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला ह्याचे कारण ‘मराठी बाणा’ आणि संस्कृती याबद्दलची त्यांची निष्ठा आणि प्रेम, त्यांच्या अंगातले मूलभूत नाट्यगुण, दिग्दर्शनकौशल्य, अभ्यासू वृत्ती आणि उत्कृष्ट व्यवस्थापन, या सगळ्यांचा हा परिपाक आहे. नर्तक, गायक आणि वादक असे सव्वाशे कलाकार एकत्र आणून त्यांना उत्तम तऱ्हेने नटवून, तीन तासांहून अधिक काळ एक क्षणही वाया जाऊ न देता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणे हे अत्यंत अवघड काम आहे. ‘मराठी बाणा’ मधून अशोक हांडे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन डोळ्यांसमोर उभे करतात. इथले सण समारंभ, मग लग्न असो वा मंगळागौर, दहीहंडी असो वा गणपती पूजन–साऱ्यांचा समावेश या कार्यक्रमात झाला आहे. आदिवासी, कोळी, पंढरपूरचे वारकरी ही सारी मंडळी इथे पहावयास मिळतात. यामध्ये कालीमाता आहे, गजानन गणपती आहे, विठ्ठलरखुमाई आहेत, संत तुकाराम भजनात गुंगवतात आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यातून प्रेरणा देतात. या कार्यक्रमातून जुन्यापासून नव्यापर्यंतच्या लोकसंगीताची चव चाखायला मिळते, शिवाय ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ ह्या भावगीतापासून ते ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ – सारख्या लावणीपर्यंत! प्रयोगातले नर्तक उत्तम नाचतात, गायक सुमधुर गातात, वादक अजोड वाद्यवादन करतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतः अशोक हांडे बिजलीसारखे चमकत राहून प्रयोगाला अथपासून इतिपर्यंत मुठीत पकडून ठेवतात. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजून तृप्त व्हावे अशा अनुभूतीत हा प्रयोग प्रेक्षकांना नेऊन सोडतो. या सर्व कार्यक्रमाचे लेखन आणि संपादन त्यांनी स्वतः केले आहे. ‘मराठी बाणा’ चे १६०० हून आधीक प्रयोग झाले आहेत. अशोक हांडे म्हणजे गाण्यांचे, संगीताचे दर्जेदार कार्यक्रम आणि अशोक हांडे म्हणजे हापूस आंबाही!
अशोक हांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
‘चौरंग’ या त्यांच्या संस्थेची website.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply