लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला.
सध्या मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे.
पुणे जिल्ह्यातील, जातेडे गावाच्या, शेतकरी कुटुंबातील प्रवीण तरडे यांनी एमबीए आणि पुढे आयएलएस महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी घेतली आणि पुढे एक नोकरी देखील सुरु केली. पण मुळचा कलोपासक प्रवीण तरडे तिथे रमलेच नाही. घरी, थिएटर किंवा चित्रपटसृष्टी संदर्भातली कोणतीही पार्श्वभूमी नसतांना देखील प्रवीण तरडे यांची आवड त्यांना आपोआप ह्या क्षेत्रात घेऊन आली. सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.
प्रवीण तरडे यांचे लहानपणापासूनच, बोलणं खूप प्रभावी होतं. कॉलेज मध्ये असतांना १९९७ मध्ये प्रवीण तरडे यांनी पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पातळीवरच्या वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने नुसती ती स्पर्धा गाजवलीच नाही तर जिंकली सुद्धा, तेही राष्ट्रपतींच्या हातून प्रथम क्रमांक घेऊन! त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली. पुरुषोत्तममध्ये – लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी सर्व बक्षिसे घेऊन ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पुढे त्यांनी अनेक एकांकिका केल्या. शिवाय अनेक events आणि अनेक मालिकांचं बहारदार लेखन केलं. पहिल्यांदा प्रवीण तरडे यांनी ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी लिहिलं. ह्या मालिकेसाठी प्रवीण तरडे यांनी तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली! पुढे ‘पिंजरा’, ‘अनुपमा’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘तुझं माझं जमेना’, ‘असं हे कन्यादान’ अश्या अनेक यशस्वी मालिका प्रवीण तरडे यांनी लिहिल्या. अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. मग चित्रपटाच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं – शिवधनुष्य त्यानं उचललं आणि पेललं देखिल! ‘देऊळबंद ‘ ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपट सृष्टीला ‘देऊळबंद’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला. ‘स्टॅंडबाय’, ‘कुटुंब’, ‘अजिंक्य’, ‘पितृऋण’, ‘रेगे’, ‘सुरक्या’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ आणि ‘देऊळबंद २’ व ‘मुळशी पॅटर्न’ हे चित्रपट त्यांचे गाजले आहेत.
दरम्यान, प्रवीण तरडे यांनी पुण्यातील कलाकारांना घेऊन, ‘एक सूचक बाकी वाचक’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. ही संस्था पुस्तक वाचणाऱ्या हौशी लोकांसाठी आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या ह्या संपूर्ण योगदानमुळे प्रवीण तरडे यांची ‘भरत नाट्य संशोधन मंदिराच्या’ नियामक मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली आहे. प्रवीण तरडे यांच्या प्राविण्यांचे कौतुकही वेळोवेळी झाले आहे.
प्रवीण तरडे यांना आत्तापर्यंत २५० च्या वर पारितोषिके, मिक्ता अवॉर्ड, संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि दोन वेळा मानाचा झी गौरव असे अवॉर्ड मिळाले आहेत, प्रवीण तरडे त्यांच्या यशाचं श्रेय आई-वडील, व पत्नी स्नेहल आणि त्याच्या मित्रपरिवारालाही आवर्जून देतात.
प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल या सुद्धा पुरुषोत्तम स्पर्धेत, सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून दोनदा सन्मानित झाल्या आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply