लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जन्म १ जुलै १९५० रोजी झाला.
पिंपरी-चिंचवड मध्ये भरलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित झालेल्या डॉ. श्रीपाल सबनीस हे मूळचे मराठवाड्यातल्या एका जमीनदार कुटुंबातले.
डॉ. सबनीस यांचे गाव लातूर जिल्ह्यातील हाडोळी. निलंगा तालुक्यातील हे गाव हैदराबाद मुक्तिसंग्रामात गाजलेले आहे. श्रीपाल सबनीस यांचे वडील मोहन सबनीस यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभाग नोंदवला होता. जमीनदार कुटुंबातील निजामांविरुद्ध त्यांनी स्वतंत्र लढा उभारला होता. डॉ. सबनीस आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत. दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी…’ने प्रभावित होऊन ‘शुक्राची तू चांदणी’सारखे वगनाट्य त्यांनी लिहिले आहे. राजकारणावर आधारित ‘सत्यकथा ८२’ किंवा ‘क्रांती’ सारख्या राज्यस्तरीय पारितोषिकविजेत्या एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. आदिवासी पाड्यावर जाऊन डफावर थाप देत शाहिरीही त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी समीक्षेची वाट चोखाळली. डॉ. सबनीस यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. २६ पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या अनेक एकांकिका गाजलेल्या आहेत. ६० हून अधिक लेखक आणि कवींच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे. ग्रामीण, दलित, संत व स्त्री-साहित्य यांवरही त्यांनी प्रगल्भतेने लिखाण केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. महात्मा फुले, डी. डी. कोसंबी, न. चिं. केळकर, स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर, प्रबोधनकार ठाकरे, जाणिवा आदी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याशिवाय पुणे येथे झालेल्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. दुसऱ्या विदर्भ साहित्य संस्कृती संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply