“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांची लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी. सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांच्या जागवलेल्या आठवणी त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१७ रोजी झाला.
नऊवारी साडी, उंच बांधा, ठसठशीत व्यक्तिमत्त्व असलेल्या सरोजिनीबाईंविषयी एकेकाळी पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आदरयुक्त दबदबा होता. स्त्रीवादी आणि विवेकवादी विचारसरणी हे सरोजिनी शारंगपाणी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. त्या काळी गुन्हेगारीसारख्या वेगळ्या विषयावर लेखन करणाऱ्या मोजक्या लेखिकांपैकी त्या होत्या. त्यांनी “सरोज प्रकाशन’ ही प्रकाशनसंस्थाही काढली आणि विविध विषयांवर व्याख्याने दिली. लेखन आणि वक्तृत्व या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. विवाहानंतर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मोठ्या जिद्दीने बी.ए. केले. त्या काळी विवाहित स्त्रीने असे शिक्षण घेणे काही सोपे नव्हते. घरकाम, मुलाबाळांचे करून दळणवळणाची फारशी साधने नसताना शिक्षणासाठी आणि लेखनासाठी वणवण करणारी आमची कणखर आई खरोखर विलक्षणच होती. अंध पती नि ओढगस्तीचा संसार. त्यातच भाऊबंदकीतून झालेल्या कलहामुळे डोक्यावरचे छप्पर जाण्याचे आणि संसार रस्त्यावर येण्याचे संकट ओढवलेले. त्या वेळी रणरागिणीप्रमाणे न्यायालयात हेलपाटे मारून तिने लढा दिला आणि जिद्दीने, अक्कलहुशारीने आपले घर मिळवले, म्हणूनच आम्ही बेघर होण्यापासून वाचलो. त्यांनी स्वत: संकटांशी दिलेली अविरत झुंज प्रेरणादायी आहे. ऐन तारुण्यात पतीला आलेले अंधत्व, भाऊबंदकीतून निर्माण झालेल्या कलहात हक्काचे घर गमावून बसण्याची आलेली वेळ, अपुरे असलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार या सगळ्या गोष्टी एखाद्या चित्रपटातील काल्पनिक वाटू शकतील. पण खरोखरीच आम्हा भावंडांसमोर घडलेल्या या घटना प्रेरणादायी नाही झाल्या तरच नवल. त्यांनी हक्काचे घर मिळवलेच, पण पतीच्या अंधकारमय आयुष्यात प्रगतीचा दीपही प्रज्वलित केला. त्या काळच्या महिलांसाठी सरोजिनीबाई मार्गदर्शक झाल्या. केवळ भाषणे देऊन त्या स्वस्थ बसल्या नाहीत, तर लीलाताई मर्चंट यांच्यासारख्या समाजसेविकांसमवेत चक्क वेश्यावस्तीत जाऊन कार्यही केले.
आपले शिक्षण आणि व्यवसाय ज्या क्षेत्रातील असेल त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये लेखन, प्रशिक्षण आणि काम करण्याची एक वेगळीच दिशा मला आणि इतर अनेकांना माझ्या आई=वडिलांकडून मिळाली. इंग्रजी विषयातील एम. ए. असूनही आईने सामाजिक क्षेत्रात काम केले आणि महाभारतातील स्त्रियांचा विशेष अभ्यास करून एक वेगळा दृष्टिकोण आपल्या कादंबऱ्यांतून मांडला. वडिलांनीही, मधुसूदन, इंग्रजी वाङ्मयाचे एम.ए. असताना मानसशास्त्र आणि मानवशास्त्र या विषयांवर ग्रंथ लिहिले. त्यातील अनेक विद्यापीठीय पाठ्यपुस्तके आणि संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले गेले. अण्णांनी आणि आईनेही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्तपत्रांतून लेखन केले. शुभ्र स्वच्छ धोतर, परीटघडीचा शर्ट, कोट आणि टोपी या वेशातल्या अण्णांचे चित्र आजही डोळ्यांपुढे तरळते. ते अंध असल्याने आपला मुद्दा जरा अधिकच हातवारे करून जोरकसपणे शिकवत. चर्मचक्षू नसले तरी अंत:चक्षूंनी ते विद्यार्थ्यांकडे पाहत. त्यांनी शिकवलेले शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, मिल्टनपासून ते शॉ, गाल्सवर्दीपर्यंत अनेक थोर इंग्रजी लेखक माझ्यासह शेकडो विद्यार्थ्यांच्या मन:पटलावर कोरले गेले आहेत. अण्णा अंध असले तरी ते स्वाभिमानी व स्वावलंबी होते. त्यांना कोणी मदत केलेली, दया दाखवलेली आवडत नसे.
आईने लेख, कथा, कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या, तर अण्णांनी कथा आणि लेख यांवर भर दिला. अण्णांनी विज्ञानकथाही लिहिल्या. संपूर्णपणे स्वतंत्र, पण विदेशी वातावरणात घडलेल्या अनेक कथा अण्णांनी लिहिल्या. त्यांच्या विदेशी वातावरणातील सुंदर कथांचा “गवाक्षगीत’ हा संग्रहही प्रसिद्ध झाला. आमच्या घरात नेहमी काव्यशास्त्रविनोदाच्या चर्चा होत. अमुक इझम, तमूक तत्त्वज्ञान यांवर खल चाले. अण्णा इंग्लिश, संस्कृत व मराठी शब्द, व्युत्पत्ती यांवर नवा प्रकाश टाकत. काही नवे शब्दप्रयोग, कोट्या करण्यात त्यांचा हातखंडा होता. आई-अण्णांमुळे आम्हा भावंडांत भाषेचे प्रेम व समज वृद्धिंगत झाली.
अण्णांच्या अंधत्वामुळे आईने वाचन करायचे आणि अण्णांनी त्यावर मनात नोंदी करून शिकवायचे अशा पद्धतीने काम चाले. अण्णांनी चरितार्थासाठी क्लासेस तर चालू ठेवलेच, पण अनेक पाठ्यपुस्तके, गाइड्ससुद्धा लिहिली. दोघांनीही अपार कष्ट करून आम्हा भावंडांना कसलीही कमतरता भासू दिली नाही. अण्णांच्या कडक शिस्तीने आम्हाला बरेच काही शिकवले. अण्णांच्या मृत्यूनंतर आईच्या लेखनाने वेग घेतला. माझी पहिली इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध होण्याआधी अमेरिकन प्रकाशकांनी पाठवलेला करारनामा जेव्हा आईने पाहिला तेव्हा ती दुर्दैवाने अस्थिभंगाने आजारी होती. तिने माझी पाठ तर थोपटलीच, पण तुझी इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध होईपर्यंत मला जगलेच पाहिजे, असे ती म्हणाली. अर्थात, विधात्याला ते मंजूर नव्हते. अण्णांची आणि आईची चिकाटी, संकटांवर मात करण्यासाठी लागणारे अभूतपूर्व धैर्य; विजिगीषू वृत्ती आणि प्रचंड ज्ञानपिपासा आम्हाला मार्गदर्शन करीत राहील यात शंका नाही.
सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे १३ नोव्हेंबर २००१ रोजी निधन झाले.
श्रीनिवास शारंगपाणी
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply