क्ष किरण म्हणजे एक्स-रे यंत्राच्या शोधाने वैद्यकीय जगतात फार मोठी क्रांती घडून आली यात शंका नाही. जर्मनीचा वैज्ञानिक विल्हेम राँटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला. १८९५ मध्ये त्याला अपघातानेच क्ष-किरणांचा शोध लागला. फोटोग्राफिक प्लेट विद्युतीकरण केलेल्या व्हॅक्युम ट्यूब जवळ ठेवले असता ती धूसर झाली. त्याचे कारण क्ष-किरण होते हे त्यांच्या नंतर लक्षात आलं. क्ष-किरणांच्या मदतीने शरीराचे छायाचित्र घेतले जाते त्याला रेडिओग्राफी असे म्हणतात व क्ष-किरण यंत्र चालवणाऱ्यांना रेडिओलॉजिस्ट असे म्हणतात.
राँटजेनने त्याच्या पत्नीचा हात क्ष किरणांचा स्त्रोत व फोटोग्राफिक प्लेटमध्ये धरला तेव्हा तिच्या हातातील हाडांचा फोटोच त्याला मिळाला.
आजही आपण हाडांचे फ्रॅक्चर शोधण्यासाठी, क्षयाची बाधा समजण्यासाठी एक्स-रे छायाचित्र काढतो. एक्स-रे च्या मदतीने छायाचित्र काढले जाते तेव्हा हे किरण वेगवेगळ्या घनतेच्या पदार्थांना वेगळा प्रतिसाद देतात. हाडांसारखे घटक जास्त क्ष-किरण शोषतात. ते रेडिओग्राफ मध्ये पांढरे दिसतात. राखाडी किंवा काळसर भाग जो दिसतो तो उतींचा असतो. त्यात क्ष किरण अंशतः किंवा पूर्णपणे आरपार जातात. त्वचा, स्नायू किंवा पाण्याची घनता असलेले घटक यात भुरकट पांढऱ्या रंगात दिसतात.
एक्स-रे मशीनमध्ये एक ट्यूब असते व तसेच फोटोग्राफिक प्लेट असते. ट्युबला असलेल्या खिडकीतून एक्स-रे चा झोत तपासणी करायच्या वस्तूवर किंवा शरीराच्या भागावर टाकला जातो. एक्स-रे ट्युबमध्ये अतिवेगवान इलेक्ट्रॉन द्रव्यावर आदळतात असतात. विद्युतीकरण केलेल्या व्हॅक्युम ट्यूबमध्ये तप्त वेटोळे असते. त्यातून इलेक्ट्रॉन्स सुटतात. उच्च व्होल्टेज हे धन व ऋण इलेक्ट्रोडच्या दरम्यान असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनच्या त्यांच्या लक्ष्यावर जाऊन आदळतात व एक्स-रे ची निर्मिती होते.
छातीचा एक्स-रे काढताना पूर्ण श्वास घेऊन छाती फुगवण्यास सांगितले जाते. कारण त्यामुळे एक्स-रे आरपार जाऊन पुरेसे स्पष्ट छायाचित्र मिळते.
एक्स-रे हा विद्युत चुंबकीय लहरींचा एक प्रकार असून, ते डोळ्यांना दिसत नाहीत.
आज वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी एक्स-रे मशीन चे महत्त्व कमी झालेले नाही. एक्स-रे तपासणी नेहमी करणे शरीराला हानीकारक ठरू शकते. त्यामुळे आवश्यक असेल त्या वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी तपासणी केली जाते. गर्भवती महिलांची एक्स-रे तपासणी दुष्परिणामांची शक्यता असल्याने केली जात नाही.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.
Leave a Reply