या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं
दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं
मंजूरच सार्या शर्ती, चला रे पीत बसूं
श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं ।।
ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं
ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं
ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं
ती नित्य देतसे स्फूर्ती , चला रे पीत बसूं
ती जगाचीच उद्धर्ती, चला रे पीत बसूं ।।
ती सार्यांची संस्कर्ती, चला रे पीत बसूं
अमुच्या भाराची धर्ती, चला रे पीत बसूं
ती राज्ञी चक्रवर्ती, चला रे पीत बसूं
प्राशकात होउन भर्ती, चला रे पीत बसूं
नच पर्वा, ‘को जागर्ती’, चला रे पीत बसूं
पोचूं स्वर्गीं वा गर्तीं, चला रे पीत बसूं
वाढेलच अंतीं कीर्ती, चला रे पीत बसूं ।।
गटारी : ‘गटारी अमावस्ये’चा सण
चुस्ती : चापल्य, चपळपणा
फुर्ती : शीध्रता, घाई
शर्ती : अटी
उद्धर्ती : उद्धार करणारी
संस्कर्ती : संस्कार करणारी
भाराची धर्ती : भार उचलणारी / वाहणारी
राज्ञी : राणी
प्राशक : पिणारे
भर्ती : प्रविष्ट, सामील
‘को जागर्ति’ : ‘कोण जागें आहे ?’
गर्तीं : खड्ड्यात , पाताळात
– सुभाष स. नाईक
# मद्यगान – २
Leave a Reply