त्या दुकानातील नौकर दुकानाची सायकल ढकलत आणत होता. मालकाने विचारलं तर म्हणाला, सायकल पपंचर (puncture) आहे. मालकाने गल्ल्यातून 10 रुपये काढून दिले, 1 तासाने तोच नौकर, तीच सायकल, तशीच ढकलत आणत होता. पुन्हा मालकाने विचारलं, तर उत्तर मिळालं, दोन पपंचर होते, 10 रुपयांत 1 पपंचर काढतात, माझ्या कडे 10च होते म्हणून एकाच काढून आणलं..
नौकाराचे नाव होतं- ज्ञानेश्वर !!!
“आखें” चित्रपटात अमिताभ बच्चन 4जणांना ‘नेमबाजी’ शिकवत असतो, त्यात नेमका अर्जुन रामपाल चा नेम चुकतो आणि परेश रावल पटकन बोलून जातो, “ए, तेरा नाम अर्जुन किसने रखा?”
तर मूळ मुद्दा हा की, आपल्या आजूबाजूला 70-80 % लोकं अशी असतात की जी त्यांच्या नावाच्या अगदी विरुद्ध वागत असतात. “लेकराचे पाय पाळण्यात दिसतात” म्हणतात मग नावं ठेवताना ती का दिसत नाहित ?
* अनुजा तुझी कोण? तर उत्तर येतं ‘मोठी बहीण’.
* त्याने त्या 6 फूट उंच असलेल्या मित्राची ओळख करून दिली, हा ‘वामन’.
* मोठ्या भिंगाचा चष्मा असलेल्या व्यक्तीच नाव होतं, ‘संजय’
एका मित्राच्या वडिलांचे नाव ‘हनुमंत’ सुद्धा आहे.
‘कृष्णा’ नावाचा खूप सज्जन मित्र आहे माझा तर ‘राम’ नावाचा खूप वाह्यात मित्र सुद्धा आहे मला.
‘लक्ष्मी’ नावाची मोलकरीण कित्येक जणांच्या घरी असेल, तर ‘राजा’ नावाचा नौकर किती तरी दुकानात असतो.
एकाच मुली नंतर अपत्य न होऊ देण्याचा निर्णय, “कुंता” नावाच्या मैत्रिणीने घेतलाय.
‘मीना’ नावाच्या मुलीला पाण्याला घाबरलेलं पाहिलंय ‘अबोली’ला बडबड करताना पाहिलंय.
बरं नुसते नावं च नाही तर ‘आडनावात’ विसंगती असलेली कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात…
5 वर्षापूर्वी लग्न झालेला, “अष्टपुत्रे” 1 वर्षांपासून ‘वंध्यत्व निवारण केंद्रात’ जातो आहे.
“कुबेर” नावाचा माणूस पोटापाण्यासाठी छोटेखानी हॉटेल चालवतो आहे.
कधीच दारू न पिणारा “झिंगरे” नावाचा मित्र मला आहे.
Adv वैद्य नावाचे मोठे वकील आहेत.
“लोखंडे” आडनावाचे कोमल ह्रदयाची माणसं जशी आहेत, तशीच अतिशय शांत स्वभावाची ‘जमदग्नी’ आडनावाची माणसं सुद्धा आहेत……
लिहिता येईल अशी खूप खूप उदाहरणे सापडतील, पोस्ट चा आकार भला मोठा होईल म्हणून थांबतो.
जाताजाता- ज्यांच्या नावात काहीच आकार उकार नसतात ते माणसं साधी सरळ असतात, असं म्हणतात. पण ही देखील माझी अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणारा “उदय”नावाचा मित्र मला आहे तर तुमची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी “”श र द””हे एकच नावं पुरेसे आहे, असं मला वाटतं !!!
तळ टीप :- आमच्या परिसरात “डावरे” आडनावाचा खूप मोठा गोतावळा आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या या “डावरे” परिवाराची माझी देखील ओळख नाही. मग कुणीतरी नवीन ओळख झालेला मला विचारतो, आमका – तमका “डावरे” तुमचे कोण? मी ही बेधडक, “हो आमचे नातेवाईक आहेत.” असं ठोकून देत असे.
एकदा एकाने विचारलं, “विनय डावरे” तुमचा कोण? एका क्षणाच्या अवधीच्या आत बायको म्हणाली, ‘नाही, तो आमचा कुणी नाही’ घरी आल्याबरोबर मी विचारलं, तुला ग काय माहित त्याच्या बद्दल ???
ती म्हणाली, आहो तो कुणा “विनय डावरे” बद्दल विचारत होता. मला ठाम विश्वास आहे, “डावरे” मधे “विनय” असूच शकत नाही…!!!
विनोद डावरे, परभणी.
##सहजच सुचलं – 80
Leave a Reply