नवीन लेखन...

या चिमण्यांनो परत फिरा रे

(ओल्या मातीला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना सादर समर्पित !)

संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती .
खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती .
कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते .
फारच वेगळ्या घोषणा होत्या .

‘ आम्हाला आमची शाळा , मिळालीच पाहिजे .’
‘ शिक्षण आमच्या हक्काचं ! ‘
‘ आधी परीक्षा घ्या , मग मार्क्स द्या .’
‘ शाळेचं मैदान आम्हाला खेळायला मिळालंच पाहिजे .’
‘ नको ऑनलाइन , हवं ऑफलाईन .’
‘ मोबाईल नको पुस्तक द्या , वर्गखोलीत बसू द्या .’
‘ विषय निवडीचं स्वातंत्र्य द्या , प्रगतीची दारं उघडू द्या .’
‘ दडपण नको , घरपण द्या .’

अशा अनेक घोषणा .

” इथं कशाला आलात ? ”
गुरुजींनी विचारलं .

” इथं गर्दी करून , ठिय्या देऊन , घोषणा दाखवून काय मिळणार आहे तुम्हाला ? त्यापेक्षा घरी जा . पालकांना सांगा . आता आलाच आहात तर गोष्ट सांगतो .”

” नको ! ”
सगळी मुलं एकसुरात ओरडली .

” आम्हाला तुमची गोष्ट नको , उलट आम्हीच तुम्हाला गोष्ट सांगतो .”

एक छोटी चुणचुणीत मुलगी म्हणाली .
” तुम्हाला ऐकायलाच हवी गोष्ट . ”
गुरुजींच्या होकार नकाराची वाट न बघता ती गोष्ट सांगू लागली …

” गोष्ट आहे आमच्या गुरुजींची . आज आम्ही त्यांना हळूच , लपून छपून भेटायला गेलो होतो शाळेत . तर आमचे गुरुजी शाळेत एकटेच बसले होते . त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती . डोळ्यात पाणी होतं आणि मधल्यावेळी खाण्यासाठी उघडलेला डबा तसाच उघडा होता . ते जेवलेच नव्हते . आम्ही त्यांना विचारलं , तर म्हणाले ,
” आज मला वेगळा यती दिसला . त्याने त्याची हकीगत सांगितली . त्याला एक सिद्धी प्राप्त होती . तो म्हणेल ती गोष्ट त्याला सहज समजायची , मिळायची . मग मी त्याला म्हटलं , आज मी जेवणाचा डबा विसरलोय . तर त्याने त्याचा उजवा हात एवढा लांब केला , एवढा लांब केला की , तो हात पाच मैल दूर असलेल्या माझ्या घरातून क्षणार्धात डबा घेऊन आला . मी बघत राहिलो . यती माझ्यासमोर , पण त्याचा हात मात्र लांब, लांब होत जाणारा . पण मला जास्त विचार करू न देता , तो यती म्हणाला , मी पूर्वी शिक्षक होतो , चांगले विद्यार्थी घडवले , तेव्हा मला ही आगळी वेगळी सिद्धी प्राप्त झाली . ज्या गुरूनं मला ती दिली तो म्हणाला , तुला मोक्ष हवा असेल तर चांगले विद्यार्थी घडवणारा शिक्षक शोध , त्याला चमत्कार दाखव . मग तुला मोक्ष मिळेल . आता मला मोक्ष मिळणार .आणि तुला मोक्ष हवा असेल तर , चांगले विद्यार्थी घडव आणि त्यांच्यातील जो शिक्षक होईल त्याला ही सिद्धी सांग . इतकं बोलून तो यती गुप्त झाला ‘
गुरुजी म्हणाले , मला सिद्धी प्राप्त व्हायला नको , पण शाळेत किमान विद्यार्थी तरी येऊ देत . त्यांची वाट बघतोय मी . मला त्यांना शिकवायचं आहे . घडवायचं आहे . पण तुम्ही आहात कुठे सगळे ? तुम्ही शाळेत येत नाही , त्यामुळं माझं स्वप्न अपूर्ण राहणार . म्हणून जेवलो नाही …”
बोलताना गुरुजी अवघडले .रडू लागले . पण थोडा वेळच , मग ते म्हणाले , तुम्ही सर्वजण या , आपण आपली शाळा सुरू करू , मी शिकवतो तुम्हाला …पण … जाऊ दे . आमची गोष्ट संपली . आता काय ते बोला ..”

ती मुलगी खाली बसली .

” माझीच गोष्ट तुम्ही मलाच सांगताय . खरं ना . ”

ते कसंनुसं हसले पण विचारात गुंतले .

वर्तमान आणि भविष्य त्याच्या नजरेसमोरून तरळून गेलं .

— एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड गोंधळ , गुंता करून ठेवा . देश केव्हा उद्ध्वस्त होईल हे कुणाला कळणारही नाही .
हे कुणी म्हटलं होतं कुणास ठाऊक , पण ते सत्य होतं .
अगदी पूर्वनियोजित कारस्थान असावं तसंच चाललं होतं .
विद्यार्थी केंद्रीभूत शिक्षणव्यवस्था , बक्कळ पैसा देणारी इंडस्ट्री केव्हा झाली , हे धुरीणांच्या लक्षात सुद्धा आले नाही .
त्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे स्थान केवळ कच्चा माल या स्वरूपाचे झाले आणि त्यांचे पालक कच्च्या मालाचे वाहक झाले .

त्यात विद्यार्थी कुठं होता ?
त्याच्या मनाचा , बुद्धीच्या स्तराचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कुठं होता ?
त्याच्या अंगभूत गुणांचा विचार कुणी , कधी केला होता ?
शारीरिक विकासासाठी मोकळी मैदाने लागतात , त्याचा विचार कुठं होता ?
चार भिंतींची शाळा आणि एकत्रित शालेय सहजीवन खूप काही शिकवत असते , याचा विचार कुठं होता ?

छापील पुस्तकं , प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकं , खांद्यावरची वजनदार ओझी , पहाटेपासून रात्री झोपेपर्यंतचं क्लासेसचं आणि शाळेचं टाईट शेड्यूल्ड , निःसत्व खाणं , जंक फुडचा मारा , निसर्गापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न , विकेंडची , महागड्या खेळण्यांची , नामांकित महागड्या क्लासेसच्या प्रतिष्ठेची मिरवायची हौस , करिअर नावाच्या घोड्यावर बसवण्याचा अट्टाहास , कमकुवत होत जाणारे नातेसंबंध , अजाणत्या वयातले भावनिक कल्लोळ , मानसिक ओढाताण आणि यासगळ्यात विद्यार्थीच हरवून जात असल्याची न होणारी जाणीव , याचा विचार कुठं होता ?

स्मार्टफोनच्या आक्रमणाने महाभयानक व्हायरस विद्यार्थ्यांच्या शरीरात , मनात घुसवण्याचे एक षडयंत्र नक्की यशस्वी होत आहे . आधी मन पांगळं केलं , मग शरीर पांगळं केलं आणि त्यानंतर मुलांची इच्छाशक्ती संपवली . बुद्धिभेद , मनभेद आणि आत्मकेंद्री वृत्तीतून संवाद संपवला . शिकण्याच्या , खेळण्याच्या वयात , विद्यार्थी अकाली ‘ वयात ‘ येऊ लागले .
या तंत्रज्ञानाच्या भस्मासुराला डोक्यावर घेऊन नाचण्याच्या नादात विद्यार्थी , पालक, शाळेच्या भिंती , खडू फळा आणि शिक्षकांना विसरू लागले .
हे फार भयावह होतं . वर्तमानकालीन भीषण वास्तव होतं .
हे गुरुजींना जाणवलं .

राष्ट्र उभं राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विधायक मनोवृत्तीला आवाहित करण्यासाठी …
शाळा सुरू व्हायला पाहिजेत .
मैदानं फुलली पाहिजेत .
विद्यार्थ्यांना निसर्गाकडे घेऊन जायला पाहिजे .
त्यांच्या अंगभूत गुणांना उत्तेजन , जिज्ञासेचं शमन , प्रतिभेचं संवर्धन आणि स्व-तंत्र निर्माण करण्यासाठी त्यांना आवाहन करायला हवं .

हे शिक्षकांनी , पालकांनी आणि राष्ट्राविषयी आस्था असणाऱ्यांनी मनावर घेतलं पाहिजे …

गुरुजींनी बोलण्यासाठी तोंड उघडलं . पण ते गप्प बसले .

सावलीतली मुलं हसत होती .

” आम्हाला कळलं सगळं . आम्ही ऐकत होतो तुमच्या मनातलं . ”

सगळी मुलं उठली .
काही मुलांनी एक मोठा खड्डा खणला होता .
जात जाता प्रत्येकजण त्यात आपला स्मार्टफोन टाकत होता .
शेवटी जाणाऱ्या मुलाने त्यात आपला फोन टाकला आणि त्यावर माती लोटली .

काही सेकंद गुरुजी उभे राहिले .
मोबाईलला श्रद्धांजली वाहण्यासाठी !
आणि त्यांच्या लक्षात आलं …

सगळ्या मुलांनी त्यांना घेराव घातला होता .
आणि सगळी मुलं गुरुजींना घेऊन जिल्हा परिषदेच्या , रिकाम्या , बंद पडत चाललेल्या शाळेकडे घेऊन निघाली होती .

काही मुलं नाचत होती .
त्यांच्या हातात शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारे फलक होते .

गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं .

शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा होत होता .
——–
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 121 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..