नवीन लेखन...

या वयात

आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस‌ जमके‌ practice ‌केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही.

४ मे २४.. कोरमचा entrance hall अर्धाअधिक भरलेला, वरच्या मजल्यांवरुन डोकावणारे अनेक प्रेक्षक आणि विविध वयातल्या स्पर्धकांच्या २५-३० तरी जोड्या…असा एकूण माहोल होता. परीक्षक होते सोनिया परचुरे आणि रवी जाधव. बापरे: असं वाटून न घेता, आम्ही दोघी without tension २ मिनिटं थिरकलो. हंसता हुआ नुरानी‌ चेहरा.‌.. टाळ्यांचा गजर. चक्क उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. जमलेल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया एकच… या वयात कसल्या भारी नाचलायत तुम्ही! त्या स्पर्धेत भाग घेतांना‌, नको बाई लोकं काय म्हणतील? असा बाऊ केला असता तर हा आनंद मिळाला असता कां आम्हाला या वयात? मला सांगा वयाचा अडसर येतो का हो कुठे? मला तर नाहीच येत बाई. अलका; या वयात तू कसा ग झेपवतेस हा तडतडाट ? हा प्रश्न जेव्हां जेव्हां माझ्या समोर येतो तेव्हां तेव्हां मी टेचात सांगते….

काय झालं माझ्या‌ वयाची पंचाहत्तरी उलटली म्हणून? मनाने तर मी आहे अजून चिरतरुण!

आता देवाच्या कृपेने ७७ व्या वर्षीही‌ माझं शरीर मला साथ देतंय ही जमेची बाजू आहेच. ना शरीरात साखरेची पोती, ना माझी बिपीशी नाती की‌ ना दोन्ही डोळ्यात मोती.. मग सांगा मी वयाची बाळगू कशाला भिती? ह्यातली‌ कांही इस्टेट जरी कुणापाशी असली तरी झेपेल ते जिद्दीने करावं आपण. (या वयातला हा आकाबाईचा सल्ला) खरंतर तारुण्यात आणि प्रौढपणात (पन्नाशीत) सुध्दा चाकोरी सोडून स्वत:साठी जगायला वेळ कुठे असतो ? वेळ मिळतो तो ५५-६०च्या आसपास. वयाच्या ५५ व्या वर्षी‌ एक गंमत म्हणून आम्ही २-३ मैत्रिणिंनी‌ फाड फाड इंग्रजी टॉकिंचा‌‌ एक महिना क्लास केला. (पण आम्ही कधीही इंग्रजीज टॉकलो नाही तो भाग वेगळा) वर्गात नवतरुण मुलं मुली.. तेव्हांही ते म्हणायचे, काकू आता तुम्हाला काय करायचंय या वयात? आम्हाला कसा job मिळवण्यासाठी इंग्रजी बोलता येणं आवश्यक असतं. तुम्हाला कुठे जायचंय ? मी सांगायची अरे कुठे जायला कशाला हवंय? माणसांनी कसं विद्यार्थी दशेत असावं नेहमी. मैत्रिणींनो हे वाक्य आणि कोणत्याही कलेला वय नसतं …हे घिसेपिटे डायलॉग मारायला बरे असतात या वयात…असो.

पासष्टीला मी पोहायला शिकण्याचा प्रयत्न करुन बघितला पण …परिस्थिती पाण्याबाहेर गेली म्हणून सोडून दिलं. वयाच्या किती तरी उशीरा‌ विविध परिक्षा दिल्याची‌, विविध क्षेत्र‌ काबिज केल्याची, नवनविन गोष्टी शिकल्याची उदाहरणं आपल्या आसपास‌ दिसून येतात. त्यातलं आपणही एक व्हायचं. समर्थ म्हणतातच नं.. केल्याने होत आहे रे…आधी केलेचि पाहिजे.

कविता तर मी आधीपासूनच करत होते पण जवळपास जेष्ठ नागरिकचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर ललित लेख, कथा, निबंध इ. साहित्य प्रकार आवडीने अवगत केले आणि प्राविण्यही मिळवलं. सिध्द लेखिका आणि प्रारंभ सारख्या दिगज संस्थांशी जोडली गेले ती याच वयात. प्रारंभ मधे‌ नुकताच एका समुह‌ नृत्यात भाग घेऊन ६५+‌ च्या‌ आम्ही मैत्रिणिंनी तुफान वाहवा‌ आणि तृतीय क्रमांक पटकावला. या वयातला विलक्षण सुंदर अनुभव होता तो.

अर्थात या वयातील कुणाचा‌ आनंद अध्यात्म,‌ ईश्वरभक्ती,‌ पूजा, जपजाप्य एवढंच काय जीव ओतून समाजसेवा इ. मधे‌ असतो. प्रत्येकजण‌ आपापली‌ वाट चोखंदळत असतो. असो.

आपल्याला आवडेल ते करावं.. लोकं काय म्हणतील? हे जरा बाजूला ठेवलं आणि थोडी सकारात्मकता बाळगली की फुलपाखरासारखं जीवन होतं हो या वयात… शेवटी‌ काय! आपणच आपलं म्हणायचं झालं.. असं कितिसं वय झालंय माझं?

– अलका वढावकर

आम्ही सिध्दलेखिका ठाणे
दिनांक -१-१-२५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..