ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकाऊ असे लक्षात येते.
चार पदार्थ घरात बनवले आहेत.
आमटी भात चपाती आणि भाकरी.
हे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सर्वात पहिला फुकट जाणारा पदार्थ आहे आमटी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आमटीला आंबूस वास येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी रात्री भात फुकट जातो. तिसऱ्या दिवशी रात्री चपातीला वास येतो. चौथ्या दिवशी तर बुरशी येते. पण भाकरी मात्र पाचव्या दिवशीपर्यत तश्शीच असते.
असं का झालं ?
त्याचं उत्तर त्या पदार्थातील पाण्यात आहे. ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू.
ज्या पदार्थामधे पाणी जास्ती तिथे जंतुसंसर्ग जास्त. आजच्या भाषेत इन्फेक्शन ! या सूक्ष्म जंतुना देखील जगायला पाणी लागतेच ना.
या चार पदार्थांमधे नेमकं काय झालं असेल ?
आमटीमधे पाणी जास्त असल्यामुळे जंतुसंसर्ग पटकन होतो. म्हणून ती लवकर नासली. भातामधे त्यामानाने पाणी कमी. म्हणून जंतुसंसर्ग जरा उशीराने झाला. म्हणून आमटीनंतर फुकट गेला.
आता राहिली चपाती आणि भाकरी.
चपाती फक्त एक वेळा तव्यावर भाजली जाते, तर भाकरी दोन वेळा. भाकरीपेक्षा चपाती कमी वेळ भाजली जाते म्हणून लवकर फुकट जाते.
भाकरी एवढे दिवस का टिकली ?
खमंग भाजल्यामुळे !
भाकरी एकदा तव्यावर आणि परत अग्निवर थेट भाजली जाते.
जेवढे जास्त भाजले जाते, ज्यावर अग्निसंस्कार जास्ती, तेवढे त्यातील पाणी कमी होत जाते. पाणी कमी तेवढे टिकाऊ.
भाकरी जास्त दिवस टिकली कारण पाणी एकदम कमी केले गेले. भाकरी दोन वेळा भाजली जाते, शिवाय भाकरीत तेलही घातले नाही, त्यामुळे ती आणखीनच सुकी, खडखडीत होते. टिकते.
म्हणून आपला वैश्विक सिद्धांत परत सिद्ध होतो, ज्या पदार्थात पाणी जास्ती तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकावू.
शरीराचे देखील तसेच आहे. गरजेपेक्षा पाणी जास्ती झाले तर जंतुसंसर्ग होणारच ! आधीच शरीरात पाणी जास्ती असते, त्यात गरज नसताना आणखी घेतले तर होईल ना लोच्या !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.12.2016
Leave a Reply