पाण्याची शुद्धाशुद्धता
पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे.
त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही.
अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन आयुर्वेदात देखील, ज्या काळात दुर्बीणी, सूक्ष्मदर्शित्रे बहुधा नव्हती,( असं आपणाला आज वाटतं. ) त्या काळात आज न सांगितले गेलेले व्याधी पण सांगितले आहेत, हे नवल !
एवढेच नव्हे तर प्रदेशानुसार पाण्याचे गुण आणि दोषही सांगितलेले आहेत. जसे पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्राच्या दिशेत वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी हितकर असते, पण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी दोषयुक्त असते. ज्या नद्यांचे पाणी खळाळत वाहाणारे, दगडांवर आपटत इकडेतिकडे तुषार उडवित येणारे असते, ते पाणी पचायला हलके असते.
याउलट ज्या प्रदेशातील नद्या संथ वाहातात, पाणी हलताना पण दिसत नाही, अश्या नद्यांचे पाणी पिऊ नये. विषयाची व्याप्ती अधिक होऊ नये यासाठी हे फक्त माहितीसाठी सांगतो.
पाणी शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखावे या विषयी ग्रंथकार म्हणतात, जे पाणी साठवण्यासाठी दगडाचे कुंड किंवा डोणी असेल तर चांगले. किंवा दगडाच्या खोलगट भागात साठलेले पावसाचे पाणी उत्तम असते.
पण पहिल्या पावसाचे पाणी नकोच, असेही शास्त्रकार सांगायला विसरत नाहीत. त्यात वातावरणातील अशुद्धी जास्त प्रमाणात असतात. पहिले एक दोन पाऊस पडून गेल्यावर म्हणजे पाऊस चांगला सुरू झाल्यावर वातावरणातील दोष कमी होत जातात. पाण्यानेच ते धुवुन टाकले जातात.
सकाळी पाणी भरावे. दिवसभर वापरावे आणि सायंकाळी संपवून टाकावे. सूर्य असेपर्यंत पाण्यात दोष निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते. नंतर मात्र त्यात जंतुसंसर्गामुळे दोष निर्माण होतात.
स्वच्छ वस्त्राने गाळून घेतलेले, सोन्याच्या वा मातीच्या किंवा काचेच्या पात्रात जमवलेले पाणी चांगले. तांब्याच्या किंवा पितळीच्या कल्हई केलेल्या भांड्यात पाणी ठेवलेले असेल तर त्यातील अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव मरतात, असे आजचे एक संशोधन सांगते.
पण तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवणे आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी वापरणे चुक आहे. ते पाणी कळकते. पाण्याची चव पण बदलते.त्या पाण्यावर सूर्य किरणे पोचत नाहीत अश्या पाण्याने व्याधी वाढतात.
आजचे वाॅटर प्युरीफायर किती भरवंशाचे आहेत, हे सांगता येत नाही.
आजच्या जाहिरीतीच्या जमान्यात सचीन सांगतोय ते बरोबर कि हेमामालीनी ? कोणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.
धातुंचा पाण्याबरोबर संयोग होतो. साहचर्याचा परिणाम म्हणून ज्या धातुच्या भांड्यात पाणी ठेवणार, भले पाणी उकळले नसेलही, त्या धातुचे गुण अवगुण पाण्यात उतरणार हे नक्की आहे.
बरं आमच्या घरात लोखंडी नळात रात्रभर साठून रहाणारे आणि प्लॅस्टिकच्या टाकित साठवलेले पाणी तर आम्ही टाळू शकतच नाही.
आता आली का पंचाईत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.12.2016
Leave a Reply