प्रशंसनीय पाणी भाग चार
आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण…..
काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?
हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !
उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !
गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.
पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.
सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.
मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.
हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.
पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
मधे पाणी कशासाठी ?
मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.01.2017
Leave a Reply