आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार नाही.
आपल्या शरीराला बरोबर कळते, आपल्याला पाणी किती हवे आहे ते. तेवढी तहान शरीर निर्माण करते. तेवढं पाणी जरूर प्यावं.
आपण जिथे रहातो, तेथील हवामानानुसार आपली तहान कमी जास्त होत असते. जमिनीनुसार धान्यातील द्रव्य, भाज्यांमधील क्षार बदलत असतात.
वाळवंटी प्रदेशात रहाणारा उंट एकदाच पाणी पिऊन घेतो. तेथील वनस्पतींना पाणी उत्सर्जित करणारी पाने कमी असतात. काटे जास्त असतात. त्यानेपानांचे देठ पाणी साठवण्यासाठी योग्य असे जाडजूड केलेले असतात. !
तेथील अरब लोक पायघोळ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात, जे उष्णता फेकून देणारे असतात.
इथे प्रत्येकातला तो वेगळा आहे. म्हणून प्रत्येकाची तहान वेगळी आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. जे उन्हात काम करतात, त्यांना पाणी जास्त लागेल. जे सावलीत काम करतात, त्यांना पाणी कमी लागेल, जे एसी मधे काम करतात, त्यांना पाणी लागणारच नाही.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत.
एक नियम पाण्याविषयी सांगितला जातो. तो म्हणजे 30 मिली पर केजी बाॅडी वेट. म्हणजे एक किलो वजनाला सर्वसाधारणपणे 30 ते 40 मिली पाणी प्यावे. नियम केला कि तो युनिव्हर्सल असावा. आणि नियम पाळण्यासाठी करावा. टाळण्यासाठी नको.
पण हा पण नियम, नियम म्हणून पाळू नये. कारण, मी सत्तर किलो वजनाचा आहे. सकाळ पासून सायंकाळच्या सातपर्य॔त एसी मधे बसून काम करतोय. आणि त्याचवेळी सत्तर किलो वजनाचा एक हमाल रस्त्यावर ओझे वाहातोय.30मिली /किग्रॅ. या नियमानुसार या हमालाने फक्त 2100 मिलीच पाणी प्यायचे, आणि गरज नसताना मी पण एवढे एकवीसशे मिली प्यायचे ?
हे दोन्ही चुकच आहे.
इथे प्रत्येकाची गरज वेगळी आहे.
मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातील वैश्विक नियम मात्र इथे आरोग्यशास्त्रातील पाण्यालादेखील तंतोतंत लागू पडतो !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.12. 2016
Leave a Reply