1अपानवायु आणि ढेकर, 2मल, 3मूत्र, 4शिंक, 5तहान, 6भूक, 7खोकला, 8जांभई, 9उलटी, 10अश्रू, 11शुक्र, 12झोप आणि 13श्रमामुळे लागणारा दम, यांना वेग असे म्हटलेले आहे. यातील कोणाचेही अवरोध करू नये, किंवा मुद्दाम प्रवर्तन करू नये.म्हणजे निर्माण करू नये.
या प्रत्येक रोगाचा अवरोध केल्यामुळे काय काय लक्षणे दिसतात, ते वाग्भट या शास्त्रकारांनी अध्याय चार मध्ये वर्णन केले आहे.
या अध्यायाचे नावच मुळी रोगानुत्पादनीय असे आहे. म्हणजे रोग होऊ नये यासाठी आपण काय करावे, याचे वर्णन या अध्यायात केले आहे.
शरीरातील या वेगांचा अवरोध कधीही करू नये. जर असा अवरोध वारंवार होत असेल तर त्याची चिकित्सा काय करावी ते सुद्धा सांगितले आहे.
त्यातील तहान या वेगाचा अवरोध केल्यामुळे,( म्हणजे तहान लागली असता पाणी न पिल्यामुळे ) शोष, अंग ठणकणे, बहिरेपणा, मूर्च्छा, भ्रम, आणि ह्रदयरोग हे विकार होतात. चुकुन असे झाले तर त्याची चिकित्सा म्हणून शीत उपचार करावेत, असे ग्रंथकार म्हणतात. शीत उपचार म्हणजे थंड उपचार. जसे थंड गुणाचे चंदन, केशर, कांदा, वेखंड, धने जिरे इ. लेप लावणे, या द्रव्यांचे रस किंवा पाणी थोडेथोडे पिणे, थंड पाण्याचा अंगावर शिडकावा करणे, थंड वारा घालणे, गुलाब, वाळा इ. सुवासिक फुलांचा आणि मुळांचा सुगंध घेणे, अश्याच गुणांच्या तेलाचे मालीश करणे किंवा विधीवत बस्ती घेणे इ. उपचार करावेत.
आजच्या काळाचा विचार करता, चिकित्सातत्व तेच ठेवून तहान या वेगाचा अवरोध झाल्यामुळे वर वर्णन केल्याप्रमाणे जो त्रास होतो, त्याला प्रथम उपचार म्हणून अगदी असेच उपचार करतात. जसे सलाईन लावणे, कोल्ड स्पजींग, कोलन वाॅटरने पुसुन काढणे, आईस वाॅटर एनिमा, एसी खोलीमधे ठेवणे, इ.इ.
यासाठी आपली तहान आपल्याला समजली पाहिजे. पोटावर जबरदस्ती, अत्याचार होऊ नयेत. जेव्हा तहान लागते तेव्हा, तहान लागते तेवढेच पाणी वा तत्सम द्रवपदार्थ प्यायलाच पाहिजे. आणि जेव्हा भूक लागते तेव्हा, जेवण म्हणजे घन आहार त्याच वेळी पोटात गेला पाहिजे. असे केले नाहीतर काय होते, ते सुद्धा अभ्यासून लिहून ठेवले आहे. भावप्रकाश या ग्रंथात ग्रंथकार म्हणतात,
तृषितस्तु न चाश्नियात्क्षुधितो न पिबेज्जलम् |
तृषितस्तु भवेद्गुल्मी क्षुधितस्तु जलोदरी ||
सार्थ भावप्रकाश
तहान लागली असता पाणी न पिता जेवण्याने गुल्म, म्हणजे पोटात गोळा होणे हा रोग होतो, तर भूक लागली असता, न जेवता रिकाम्या, भुकेल्या पोटी पाणी पिण्याने जलोदर किंवा असायटीस म्हणजे पोटात पाणी साठून रहाणे हा रोग होतो.
कोणता रोग का होतो, याची कारणे शोधून काढून, अनुमान करून, ते वारंवार अभ्यासून, पुढच्या पिढीसाठी सर्व लिहून ठेवणाऱ्या, या सर्व ऋषींना साष्टांग दंडवत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.12.2016
Leave a Reply