तहान तर लागली आहे आणि अनावश्यक पाणी प्यायचे पण नाहीये, अशा वेळी काय करावे?
साधे उदाहरण घेऊ.
दुपारच्या वेळी भर उन्हात बाजारात गेलाय, आजच्या भाषेत शाॅपिंगला !
प्रचंड तहान लागली आहे. आणि तुम्हाला थंडगार पाणी ऑफर केले, तर एक ग्लास थंडगार पाणी अगदी एका दमात पिऊ शकाल. पण तहान भागली, असं वाटणार नाही. पाणी साधे असेल तर, एक ग्लास प्यायले जाईल पण तेवढा आनंद मिळणार नाही. उकळून गार केलेले असेल तर अर्धे ग्लासच पाणी प्यायला होईल. हेच पाणी गरम गरम असेल तर अर्धे ग्लास कुठचे, पाव ग्लास पण जाणार नाही. आणि याच पाण्यात उकळताना सुंठ, धने, जिरे आले, यापैकी एक तिखट फ्लेवर दिला असेल तर ? चार घोट सुद्धा पिणार नाही आणि पुरे म्हटले जाईल.
तहान लागली असता, तहान भागली तर पाहिजे आणि पाणी कमी प्यायचे ठरवले तर काय करावे लागेल, हे स्पष्ट होत गेले.
मनाची तृप्ती करत, आवश्यकता असेल तेवढे पाणी घेतले गेले आणि प्रमाणात पण कमी गेले. त्यात मिसळलेल्या औषधांचा, मिळणारा फायदा अतिरिक्तच !
म्हणजेच हे मसाला पाणी अल्प प्रमाणात जाऊन मस्त काम करते. मधुमेह, ह्रदयरोग, संधीवात यासारख्या आजारात असे मसालाजल अधिक चांगले काम करते.
व्यवहारात हा योग जुळवून आणायचा असेल तर काय करावे लागेल ?
दररोज एक मसाला पिण्याच्या पाण्यात घालून ठेवावा. जसे जिरे, दालचिनी, वेलची, मिरी, तमालपत्र, आले, बडिशेप, सुंठ…. झाली आठ. आठवड्यातील सातही दिवशी रोज एक मसाला वापरायचे ठरवले तरी पुरतील.
अर्थात आधी आपली प्रकृती, आपला रोग पाहून औषधाची निवड वैद्याच्या देखरेखीखाली करावी.म्हणजे परफेक्ट गुण दिसेल.
अर्धा ते एक चमचा एक मसाला लीटरभर म्हणजे तांब्याभर साध्या पाण्यात घालून तसाच ठेवला तर त्याला आयुर्वेदीय परिभाषेत हिम असे म्हणतात.
गरम पाणी घेऊन त्यात एखादा मसाला घालून ठेवला तर या संकल्पनेला फांट म्हणतात.
पाणी घेऊन त्यात मसाला घालून उकळले तर त्याला काढा म्हणतात. जसजसा अग्नि संस्कार जास्त तसतसा पचायला तो पदार्थ हलका होतो, हा आपला नियम आहे. या वैश्विक नियमानुसार क्रमशः या औषधांचा पाण्यात उतरणारा अर्क आणि फ्लेवर बदलत जाईल. पाणी पचायला हलके होत जाईल.
मधुमेहासारख्या आजारात हळकुंड, मेथीदाणे, आवळा, दालचिनी, तमालपत्र इ. ह्रदयरोगामधे ओवा, मिरी, वेलची, बेलपान, संधीवातामधे जवस, बडिशेप, लघवीच्या त्रासासाठी धने जिरे, पित्त आजारात दुर्वा, बेलपान, लवंग अशा प्रकारे मसाले आणि पाने यांचा वापर हिम फांट किंवा काढा करून वापरू शकतो.
साध्या पाण्याऐवजी, किंवा साध्या पाण्याबरोबर हे मसाला पाणी प्यायचे !
मसाल्याऐवजी फुलांचा वापर केला तरी चमत्कारिक गुण दिसतात. जसे वाहाणारी सर्दी असेल तर झेंडूची फुलांचा हिम, पायाची टाच दुखत असेल तर दुर्वा कुस्करून हिम इ.
युक्ती वापरून आयुर्वेदातील लुप्त होणाऱ्या या संकल्पना दैनंदिन जीवनात वापरून, औषधाची तहान पाण्यावर भागवता येते.
आयुर्वेदही जगेल, आपल्याला जगवेल.
फक्त योजकस्तत्र दुर्लभः ।
इथे योजना करणाऱ्यांची वानवा आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
16.12.2016
Leave a Reply