नवीन लेखन...

शृंगाराच्या कहाण्यांचे गांव – यश चोप्रा !

हिंदी चित्रसृष्टीतील आद्य घराणे- कपूर ! त्यांच्यानंतर शृंगाराची बहुतांशी रूपे पडद्यावर उधळणारी फॅमिली म्हणजे चोप्राज !

नुकतीच राज कपूरचे वास्तव्य असलेला बंगलाही विकला गेल्याची बातमी वाचली. (आर के स्टुडिओ विकत घेतलेल्या गोदरेजनेच ही खरेदी केली हे त्यांतला त्यांत सुखद वृत्त ! अन्यथा धनाढ्य बाजारबुणग्यांनी त्या वास्तूला हात लावला असता तर समस्त कपूरांचे आत्मे तळमळले असते.)

त्या पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारीला वॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स ने ROMANTICS नांवाची चार भागांची वेब मालिका छोट्या पडद्यावर आणली. दीड महिन्याच्या धामधुमीत व्यस्त असतानाही गेले दोन दिवस ती बघण्यात घालविले.

“दाग ” ( ” प्रेमाची कविता” ही मला माहित नसलेली या चित्रपटाची टॅगलाईन ) घेऊन हे प्रेमाचे गांव स्वायत्तपणे पडद्यावर आले आणि ” जब तक हैं जान ” पाशी विसावले. त्या प्रवासातील माझी अभिरुची संपन्न करणारी गांवे म्हणजे- “कभी कभी” (संयत, प्रगल्भ ते धसमुसळे प्रेम), “सिलसिला” (उन्मादी, विरहग्रस्त प्रणय) , चांदनी “(खळाळतं आणि अबोल/ अव्यक्तही प्रेम)” आणि वीर -झारा (अशारीर प्रेम) वगैरे ! अजूनही त्या गावांमध्ये माझे शक्य तितके थांबे असतात. अजिबात छचोरपणा, उथळपणा नसलेल्या या प्रेमाच्या तसबिरी. उत्तुंग,भरभरून प्रेम कसे असते याचे हे आरसे. संगीत, कथा, दृश्यात्मकता, अभिनय सारं काही वरच्या इयत्तेमधील.

“कभी कभी ” खुद्द यश चोप्रांच्या पत्नीने लिहिलाय हे कळल्यावर त्यांतील खंबीर स्त्री-पात्रांचा (राखी, वहिदा, नीतू) मागोवा मला लागला. संपूर्ण सिनेसृष्टीच्या पिढ्या येथे मुलाखती दिसताना, त्यांच्याबद्दल भरभरून बोलताना आढळल्या. बाप-लेकांमधील कलावंती creative differences मोहक वाटले पण बापाचे काम मुलाने पुढे नेले (दिलवाले च्या टोलेजंग यशाने) हेही पटले. आधल्या-मधल्या अपयशांच्या खडकांना दोघांच्याही नावा थडकल्या, पण प्रवाह अद्याप सुरु आहे- त्यांना वळसा घालून ! स्वतःचे successor तयार करण्याचे बापाचे काम मुलाने हाती घेतले आहे, कारण माझी नवनिर्मिती क्षमता आटली तर YSR स्टुडिओ थांबू नये म्हणून पर्यायी, ताज्या नजरांचे दिग्दर्शक-निर्माते तयार करावेत हे मुलाने ठरवून करून दाखविले आहे.

कधीही प्रकाशझोतात न दिसलेला आदित्य चोप्रा यानिमित्ताने “सांगे वडिलांची कीर्ती” साठी कॅमेरासमोर तीन भागात आलाय आणि त्याने कर्तृत्वाचे पट उलगडून दाखवले आहेत. हे सगळं “दर्शन” हृद्य झालंय. मोठे बंधू (बी आर चोप्रा) यांच्या सावलीतून यश जसे बाहेर आले, तद्वत आदित्य वडिलांच्या सावलीतून योग्य वेळी उन्हात आला आणि चार पावले पुढे गेला.

मुलाच्या मागणीनुसार त्याला हयातीमधील सारी मिळकत खर्ची घालून भव्य स्टुडिओ निर्माण करून देणारे यश चोप्रा मोठे की त्यांना हवं होतं ते सारं त्यांनी याच जन्मात साध्य केलंय, कुठे थांबावं याचे निर्देश त्यांनी सुचविले आहेत तेव्हा त्यांच्या इतमामानुसार त्यांना निरोप द्यावा इतका प्रगल्भ मुलगा मोठा, यात मला ठरविता आले नाही.

वयाच्या एका टप्प्यावर अपरिहार्यपणे माणसे एकाकी होत जातात (आसपास समजून घेणारी, जीवापाड प्रेम करणारी, जपणारी माणसे असली तरी) हेही मला जाणवत असलेले सत्य काल ठक्कपणे भेटलं.

आपल्या अंतिम मुलाखतीमध्ये शाहरुखला ” मी स्वतःच्या अटीशर्तींवर जगलोय, आतल्या आवाजाला अनुसरून चित्रपट बनविले आहेत आणि आता मी थांबायचे ठरविले आहे” असे कणखरपणे सांगणारे यश चोप्रा मला भावले. “स्व-निर्मित ” (सेल्फ-मेड) माणसे अशीच असतात, हा माझा पूर्वानुभव आहे. त्यांना वाकविता येत नाही, तसा प्रयत्नही करू नये.

“जीवन त्यांना कळले हो ! ” यांवर कितव्यांदातरी पण नव्याने माझा विश्वास बसला.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

2 Comments on शृंगाराच्या कहाण्यांचे गांव – यश चोप्रा !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..