यशस्वी होणं , कीर्तीच्या शिखरांवर जाणं, लक्ष्मी -सरस्वती घरात पाणी भारतात हे सत्यसृष्टीत येणं हे जगरहाटीनुसार काही यशाचे मापदंड आहेत.
अगदी सगळे यालाच यशस्वी होणं म्हणतात असं नाही. प्रत्येकाच्या यशस्वी होण्याच्या व्याख्या आणि लक्ष्य वेगळी असतात. बाबा आमटेंच्या मनातलं आनंदवन अपार कष्टानंतर जेव्हा प्रत्यक्षात आलं असेल त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या ध्येयामध्ये आपण यशस्वी झालो हीच भावना उमटली असेल किंवा आपला देश गुलामगिरीच्या विळख्यातून स्वतंत्र झाल्यावर प्रत्येक स्वातंत्र्यांसैनिकांच्या, क्रांतिकारकाच्या, पुढऱ्याच्या मनात आपण यशस्वी झालो हीच भावना निर्माण झाली असेल आणि अगदी तळागाळातून आपल्या जिद्द, ध्येय, मेहनत आणि कष्टाने शिक्षण घेऊन पुढे आलेल्या कुणाही विद्यार्थ्याच्या हृदयात अखेर आपण यशाला गवसणी घातली, अगदी हीच भावना उभी रहात असेल.
एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी शल्यविशारद, एक यशस्वी राजकारणी, एक यशस्वी खेळाडू , एक यशस्वी लेखक, यशस्वी उद्योजक, यशस्वी अभिनेता, यशस्वी वक्ता अशा अनेकविध क्षेत्रात यशस्वी होऊन काही व्यक्ती नावलौकिकास पात्र होत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या क्षेत्रात यशस्वी होऊन जगासमोर येते तेव्हा तिच्या यशाचा बोलबाला होतो, तिच्या अंगी असलेल्या हुनरला अमाप प्रसिद्धी मिळते. चारही बाजूनी त्या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव सुरु होतो. वर्तमानपत्रातून रकाने लिहिले जातात. अर्थात या सगळ्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही. परंतू हळुहळु या कौतुकामध्ये व्यक्तीपूजा सामील होऊ लागते. आपल्याकडे व्यक्तीपूजा, व्यक्तीचं उदात्तीकरण करताना तिला इतक्या उंचावर नेलं जातं की त्या व्यक्तीनेही याची अपेक्षा केलेली नसते. अर्थात कोणत्याही यशस्वी व्यक्तिमधल्या चांगल्या गोष्टी, त्याच्या यशस्वी्तेमागची कारणं, त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत इतरांना सांगणं यामध्ये काहीच गैर नाही, कारण त्यामधूनच अनेकांना प्रेरणा मिळू शकते. परंतू ज्या क्षणी त्यामधील सत्य वस्तुस्थिती नाहीशी होऊन फक्त स्तुती उरते ती त्या व्यक्तीलाही हळूहळु आवडायला लागते. अर्थात स्तुती, कौतुक कोणाला प्रिय नसतं? अगदी लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही स्तुतीप्रिय असते. फारच कमी व्यक्ती याला अपवाद असतात ज्यांना आपण स्थितप्रज्ञ् म्हणतो. यशाचा डंका चारही दिशांना वाजू लागतो, जनता -प्रसारमाध्यमं त्या व्यक्तीला सेलिब्रिटी बनवून त्याची प्रचंड जाहिरात करतात. आणि इथूनच त्या व्यक्तीचा कसोटीचा काळ सुरु होतो.
मित्रांनो ! मिळवलेलं यश, प्रसिद्धी, कौतुक, उदोउदो पचवणं ही खरच सोपी गोष्ट नसते. त्या यशाकडे एका ठराविक अंतरावरून पहाणं किंवा त्याला शरीरापासून ठराविक अंतरावरच ठेवणं ज्याला जमतं तोच या कौतुकसागरात न बुडता तरंगत राहू शकतो. जशा चिखलात उमलेलेल्या कमळाच्या पाकळ्या तो चिखल आपल्या अंगावर न घेता अलिप्तपणे तरंगत राहतात. या मोहमयी दुनियेत अपयश, दुर्लक्ष, ह्रास या गोष्टी प्रतिभावान व्यक्तींनाही चुकलेल्या नाहीत. ज्याने यश पचवलेलं असतं तोच अपयश स्थिरबुद्धीने पचवू शकतो. मुळात आपण शिकत असताना, ज्ञान ग्रहण करत असताना आपल्या गुरुजनांच्या ठायी पूर्णपणे लीन होऊन ते आत्मसात केलं असेल तर ती लिनता, नम्रता पुढेही कायम रहाते. मी जे ज्ञान मिळवतो आहे ते मला देणारी व्यक्ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीनी विद्वान आहे किंवा मी जे ज्ञान मिळवतो आहे त्याचा उपयोग फक्त धनवृद्धीसाठी नसून समाजाचे ऋण फेडण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग मी केला पाहिजे ही भावना जेव्हा मनात रुजते, तेव्हाच त्या व्यक्तीला स्वतःची नेमकी ओळख पटते.
वैद्यकीय शिक्षण घेताना जी रुग्णसेवेची शपथ घेतली जाते ती हा पेशा सुरु केल्यावर आणि पुढे त्यामध्ये यशस्वी झाल्यावर किती जणांच्या लक्षात रहाते ?
चंदेरी चमचमती दुनिया आणि त्यामधले स्वयंघोषित सेलिब्रिटी तारे आपल्या अढळ स्थानावर टिकून रहाण्यासाठी काय काय करतात? त्या भुलवणाऱ्या झगमगाटाचा, असंख्य चाहत्यांच्या प्रेमाचा, कौतुकाचा, सतत प्रसिद्धी शिखरावर राहण्याचा आनंद, नशा एक दिवस अचानक ओसरू लागते. कारण? आज त्याच चाहत्यांच्या हृदयात कुणी दुसरा/दुसरी आरुढ झालेला/झालेली असतो. आणि मग हे दुर्लक्ष पचवणं फार फार कठीण असतं. यामधूनच कुणी औदासीन्यात जातं, कुणी नशेच्या आहारी जातं, वेड्यासारखं वागू लागतं तर कुणी आयुष्यच संपवून टाकतं. यश पचवणं म्हणजे काय हे माझ्या मते अमिताभ बच्चन या महानायकाकडे पाहून लक्षात येतं. आज या वयातही तो प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही आपल्या वागणुकीला संयमीत आणि स्थिर बुद्धीने वापरत आपली मतं मांडत असतो, अत्यंत अदबीने समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत असतो. हे संस्कारातून येतं असतं. आणि यालाच म्हणतात यश पचवण्याची व्यवसायिकता.
कला क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्ती, गुरुजन मुलाखतीमधून जे उच्च विचार मांडत असतात ते प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात कुठेही जाणवत नाहीत. आपल्या शिष्यांनी आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाची वाहव्वा करू नये, दुसऱ्या कुणाचं सादरीकरण ऐकायला, पाहायला जाऊ नये असा भाव मनात बाळगणारे आणि आडून तशी समज देणारे प्रथीतयश आत्मकेंद्रित गुरु आहेत. तसंच मोठ्या मनाने आपल्या शिष्याला अनुभवसमृद्ध होण्यासाठी आपल्याकडे बांधून न ठेवता मोकळं सोडणारेही गुरु आहेत. मला मिळालेलं यश हे माझ्या गुरुजनांमुळे, मातापित्यांमुळे आणि समाजातील अनेक घटकांमुळे आहे ही भावना मनात दृढ झाली ना की सगळाच गोंधळ नाहीसा होतो, मनाची घालमेल थांबते.
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांना राज्याभिषेक करण्याचं ठरलं तेव्हा सिंहासनावर बसण्याची वेळ आल्यावर सर्वप्रथम त्यांनी आसनाला नम्र भावनेने वंदन केलं आणि म्हटलं की,
“हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून ज्या माझ्या साथीदारांनी आपले प्राण अर्पण केले केवळ त्यांच्यामुळे मी आज या सिंहासनावर आरूढ होतं आहे. हा मानसन्मान, ही श्रीमंती, हे यश माझं एकट्याचं नाही. मी या राज्याचा प्रतिपालक आहे.”
केव्हढं मोठं मन, थोरवी आणि निस्पृहता हवी या विचारांसाठी. असे विचार मनी बाळगणारे छत्रपती कुठे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे, लहानशा जहागिरीत आनंद मानणारे आणि आपणच सर्वेसर्वा असल्यासारखे वागणारे लहानमोठे सरदार, संस्थानिक कुठे.
आज खरच अनेक व्यक्ती आपल्या यशस्वीतेचा टेंभा जराही न मिरवता आपल्या कार्यात मनापासून मग्न आहेत. त्यांचं कार्य कदाचित लहान प्रमाणात असेलही परंतू आपलं उच्च शिक्षण, मिळू शकत असलेला पैसा याला बाजुला सरून या व्यक्ती वंचितासाठी काम करतायत. त्यांना पुढे आणण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करतायत. हे किती मोठ्या मनाचं लक्षण आहे. कित्येकजण आपल्या या कार्यात यशस्वी होऊन समाजासमोर एक आदर्श उभा करतायत. रतन टाटा सारख्या जागतिक यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्ती जेव्हा अगदी साधेपणाने जगून या वयातही समाजाचा विचार करताना माणुसकीचं दर्शन घडवतात तेव्हा खरच आपण नतमस्तक होतो. धनश्री लेलेंसारख्या प्रतिभावंत, व्यासंगी विदुषी अगदी साध्या,सोप्या, सुगम शब्दात आपल्याला लाभलेल्या शिक्षणाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी करतात आणि हेच आपल्या आयुष्याचं ध्येय ठेवतात तेव्हा खरोखर आदराने मान लवते. अशी आपल्या यशामध्ये बुडून न जाता निरलसपणे कार्य करणारी अनेक उदाहरणं आपल्यासमोर दिसत असतात.
एकाच वेळी किंवा नको त्यां वेळी भरमसाठ खाल्लं तर काय होतं?
सोप्पय, अपचन.
परंतू तेच थोड्या थोडया प्रमाणात आणि वेळच्या वेळी खाल्लं तर व्यवस्थित पचतही आणि अपचनही होतं नाही. अहो यशाचही तसंच आहे. मिळालेल्या यशाने धुंद होऊन तारतम्य न राखता, भान न ठेवता कौतुकसागरात वहात गेलो तर होतं काय? जेव्हा या यशाला, कौतुकाला ओहोटी लागते, तेव्हा मात्र ते अपयश पचवणं कठीण होऊ लागतं. कारण आजवर आपण ते पाहिलेलंच नसतं. त्याच्याशी एकदा का भेट झाली की धुंदी खाडकन उतरते, पायाला जमिनीचा स्पर्श होऊ लागतो. अर्थात आलेल्या अपयशातून प्रयत्नांच्या, जिद्दीच्या आणि सकारात्मकतेच्या पंखानी पुन्हा यशाच्या शिखरावर भरारी घेतलेली उदाहरणं आहेत. आणि हे करू शकणारी व्यक्तीच अपयशाने हरून, खचून न जाता उलट त्याला हरवून आणि पचवून पुन्हा एकदा उंच भरारी घेते. पण या वेळी मात्र त्या भरारीने अपयशाची चव चाखलेली असते त्यामुळे ती उंचावर जाऊन उतरते मात्र जमिनीवर.
यशस्वी होण्यासाठी शरीराचे सगळे अवयव धडधाकट असावेच लागतात हा समज व्याधीग्रस्त, अपंग, अनाथ, आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा अनेकांनी अक्षरशः खोटा पाडून दाखवलाय. यशस्वी होण्यासाठी हवं खंबीर मन, सकारात्मक मानसिकता आणि ते पचवण्यासाठी हवी सारासार विवेकबुद्धी.
म्हणूनच जो मिळालेल्या उत्तुंग यशाकडे त्रयस्थपणे पहातो आणि आलेल्या अपयशाला तितक्याच जोमाने भिडतो तोच जीवनाच्या प्रवाहात स्थिर बुद्धीने उभा राहू शकतो.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply